जेन ऑस्टिनच्या ‘प्राइड अँड प्रेज्युडिस’ या इंग्रजी साहित्यातल्या पहिल्या स्त्रीवादी कादंबरीचे हे जन्मद्विशताब्दी वर्ष आहे. २८ जानेवारी १८१३ रोजी जेनची ही कादंबरी पुठ्ठा बांधणीत तीन भागांत प्रकाशित झाली. सभ्यता, नैतिकता, शिक्षण आणि लग्न या विषयांविषयी या कादंबरीची  नायिका एलिझाबेथ बॅनेट आपली मते मनमोकळेपणाने व्यक्त करते. एलिझाबेथच्या बाकीच्या बहिणींना स्वत:चं असं काही व्यक्तिमत्त्व नाही. लग्न करून छान सुखाचा संसार करावा, अशाच मताच्या त्या आहेत. पण एलिझाबेथ त्या सर्वापेक्षा वेगळी आहेत. तिला तिची स्वतंत्र मते आहेत, आग्रह आहेत आणि नियमअटीही. बरे, ती कादंबरीची नायिका असली तरी ती काही मोठी बहीण नाही. ती धाकटी. म्हणून मराठी शब्द वापरायचा तर ‘धाकटी पाती’ अधिक वरचढ असतात. एलिझाबेथचंही तसंच आहे.
तर जेनची अशी ही कादंबरी घडते एकोणिसाव्या शतकातल्या इंग्लंडमध्ये. त्या काळात स्वत:चा असा स्वर स्त्रीला असणं ही बंडखोरीच होती. ती जेनने या कादंबरीतून आणि एलिझाबेथच्या माध्यमातून केली. त्यामुळे या कादंबरीने इंग्रजी साहित्यात अल्पावधीत लोकप्रियता मिळवली. ‘प्राइड अँड प्रेज्युडिस’पासून अनेक लेखिकांनी प्रेरणा घेऊन आपल्या कथा-कादंबऱ्या लिहिल्या.  तिची अनेक नाटय़रूपांतरे झाली. तिच्या काही चित्रपट आणि टीव्ही मालिकाही बनवल्या गेल्या. शिवाय गेल्या दोनशे वर्षांत या कादंबरीच्या दोन कोटी प्रती विकल्या गेल्या आहेत. हा सारा इतिहास सांगणारे ‘सेलेब्रेटिंग प्राइड अँड प्रेज्युडिस – २०० इयर्स ऑफ जेन ऑस्टिन्स मास्टरपीस’ हे सुसान फ्ल्युलरटोन (र४२ंल्लल्लंँो४’’ी१३ल्ल) यांचे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे. त्यात त्यांनी या कादंबरीची आस्वादात्मक समीक्षा केली आहे आणि तिच्या प्रभावाविषयीही लिहिले आहे. कादंबरीची रचना, त्यातील पात्रे, तिची भाषांतरे, रूपांतरे यांचा सविस्तर आढावा घेतला आहे. ही कादंबरी आवडणाऱ्या सर्वासाठी हे पुस्तक आहे. पण पुस्तक आवडतं म्हणजे एलिझाबेथ आवडते. तिचा ‘से’ आवडतो. हे पुस्तक अजून पेपरबॅकमध्ये यायचे आहे. त्यामुळे त्याची किंमत सध्या जरा जास्त आहे. पण काही दिवसांनी ते लवकरच येईल, अशी आशा करू या.
सेलेब्रेटिंग प्राइड अँड प्रेज्युडिस – २०० इयर्स ऑफ जेन ऑस्टिन्स मास्टरपीस :
– सुसान फ्ल्युलरटोन, व्होयेजर प्रेस,
पाने : २४०, किंमत : १४८७ रुपये.