मराठीत लोक दृश्यकलेचा विचार करत होते, लिहीत होते. स्वातंत्र्यपूर्व काळात तर, ‘भारतीय कला’ आणि ‘भारतीयांनी अंगीकृत केलेली पाश्चात्त्य चित्रणशैली’ हा मोठाच चर्चाविषय ठरला होता. त्या वेळच्या नियतकालिकांमधून जे कलाविषयक लिखाण होई, त्याचा आढावा अभ्यासकांनी घेतलेला आहे. तसाच स्वातंत्र्योत्तर काळाचा आढावा आपण घेतला, तर काही हाती येईल का?
सोबतच्या चौकटीत चित्राऐवजी छापलेलं अवतरण हे ‘मराठी नियतकालिकांतील दृश्यकलाविचार’ या नावाचं, मोठय़ा आकाराच्या २१४ पानांच्या पुस्तकातून घेतलेलं आहे. हे पुस्तक म्हणजे रमेशचंद्र पाटकर यांनी एकंदर १२६ लेखांचा अनेक संदर्भग्रंथांच्या मदतीने साकारलेला सखोल अभ्यास. या पुस्तकाचा गाभा आणखी वेगळा आहे.. स्वातंत्र्यपूर्व काळात ‘हिंदी कला’ किंवा ‘भारतीय’ कला अस्तित्वात यावी आणि वाढावी- म्हणजेच पाश्चात्त्यांचं अनुकरण करू नये आणि इथल्या कलेचा संबंध इथल्याच संस्कृतीशी असावा असं किती मोठय़ा संख्येनं लेखकांना (चित्रकला-समीक्षकांना) वाटत होतं, याची कल्पना यावरून येते. रावबहादूर धुरंधर, शिल्पकार वि. पां. करमकर, शं. वा. किलरेस्कर, ज. द. गोंधळेकर, नी. म. केळकर, भाई माधवराव बागल, हे सारे जण मराठीत नियमितपणे लिहीत होते, तर शि.म. परांजपे, आचार्य अत्रे, दत्तो वामन पोतदार यांनीही चित्रकलाविषयक मते एकदा तरी व्यक्त केलेली आहेत. यापैकी अनेक जण आधुनिक कला (किंवा पाश्चात्त्य ‘मॉडर्न’ कला) समजून घेण्याचा प्रयत्न अगदी एकांडेपणानं करत होते. त्या वेळच्या त्या लेखकांपाशी अभ्यास करण्यासाठी फार साधनं नव्हती. युरोपात कुणी जाऊन आलं, बरीच पुस्तकं वाचली, एवढाच स्रोत. आज इंटरनेट दिमतीला असतं, तसं अजिबात नाही. तरीही हे सारे लेखक बहुश्रुत होते, अभ्यासू होते आणि मुख्य म्हणजे भारतीय कलेचा स्वतंत्रपणे- म्हणजे पाश्चात्त्यांवर अवलंबून न राहाता- विकास झाला पाहिजे ही (राष्ट्रवादी?) भूमिका अनेकांनी आपापल्या लिखाणांतून मांडलेली होती.
या पुस्तकापासून थोडे दूर, स्वातंत्र्योत्तर काळात  जाऊ. साधारण १९६० च्या दशकापर्यंत मराठीत कलाविषयक लिखाणाची परंपरा कायम होती. याच साठच्या दशकात कलेसंदर्भात स्वायत्ततावादी भूमिका मांडणारे अनेक जण होते आणि चित्रकारांपैकी त्यात संभाजी कदम हे अग्रणी होते. साठच्या दशकात मराठीत तरी जे समकालीन कलाविषयक लिखाण झालं त्यात व्यक्तिवादी विचाराला प्राधान्य आहे. त्यामुळे देश, भारतीयता यांचे संदर्भ वाचकाला फारच दूरान्वयानं समजून घ्यावे लागतील. शिवाय, समाजाला कलेचा मार्ग दाखवून सुसंस्कृतपणाची नव्यानं फेरमांडणी करू पाहणारे वारे या दशकात जगभर वाहात होते. या नव्या सुसंस्कृतीचे ‘अव्हां गार्द’ म्हणजेच ‘अग्रदूत’ होण्याची रग या दशकात दिसत होती.
भारतातल्या कलेनं भारतीय असावं, तसं झाल्यास ती अधिक लोकांपर्यंत पोहोचेल, अशी सदिच्छा मांडणारं संचित अगदीच लयाला गेलेलं नाही. आपल्या देशाला सामायिक सौंदर्यदृष्टी असायला हवी, अशा अर्थाचं अपेक्षावजा मत (जिथं समान नागरी कायदाही आणणं अशक्य आहे, त्या आपल्या देशाबद्दल) हल्ली जेव्हा रवी परांजपे व्यक्त करतात, तेव्हा ते या भारतीयतावादाचंच पुढलं पाऊल टाकू पाहात असतात. सुहास बहुळकर जेव्हा चित्रकारांच्या रंगवेल्हाळ आठवणी सांगतात, तेव्हा जेजेच्या शिक्षणाला भारतीयांनी कसं अंगीकृत केलं आणि अखेर त्याचं भारतीयीकरणच कसं झालं, याचा पट वाचकासाठी उलगडतो. हे काम बहुळकरांच्या आधी महाराष्ट्रीय चित्रकारांबद्दल स्फुटलेख लिहू लागलेल्या बाबूराव सडवेलकरांनी, त्या व्यक्तिचित्रवजा लेखांमधून केलं होतं. याच सडवेलकरांनी ‘वर्तमान चित्रसूत्र’ या पुस्तकात जपानी वा अन्य देशांतील कलेचेही संदर्भ दिले आहेत. पाश्चात्त्य शिक्षणपद्धतीच्या भारतीयीकरणाबद्दलचा आणखी निष्कर्ष वाचकाला काढता येईल, असे अभ्यासू दुवे दीपक घारे यांच्या लिखाणातून वाचकापर्यंत पोहोचतात. पण घारे काही भारतीयतावाद्यांचे उत्तराधिकारी नव्हेत.
ज्यांनी भारतीयता हे ‘साध्य’ मानलेलं नाही, अशा समीक्षकांचा भूतकाळ आणि वर्तमानही मराठीत सशक्त आहे. यापैकी दोन महत्त्वाची नावं इथं घेणं आवश्यक आहे. पहिलं नाव ज्ञानेश्वर नाडकर्णी यांचं. जर कधी त्यांनी स्वतंत्रपणे लिखाण केलं, तर ते भारतीयता काय किंवा अन्य काही काय, कुठल्याच वैचारिक भूमिकेचा बडिवार न माजवता थेट चित्रकाराच्या नैतिकतेकडेच पाहायचे आणि तिचं फक्त आरस्पानी दर्शन घडवून, कोणतीही भूमिका न घेता थांबायचेच. एरवी त्यांची समीक्षा काय दिसतंय यावर अवलंबून असायची. नाडकर्णीच्या त्या रूपवादी समीक्षेवर, त्यांनी आधी किती काय काय पाहिलंय याचा पगडा असायचा. मग, कुणी निसर्गचित्र काढताना जरा फराटेबाजी केली तर नाडकर्णीना लगेच ऑस्कर कोकोश्का आठवायचा! आपल्या या निसर्गचित्रकाराला तोवर कोकोश्का कदाचित माहीतसुद्धा नसायचा.. असो.
दुसरं नाव प्रभाकर कोलते यांचं. कलेबद्दल देशीवादी भूमिका यापूर्वी अनेकदा घेणारे प्रभाकर कोलते हे रूढार्थाने भारतीयतावादी ठरत नाहीत, असं त्यांच्या लिखाणातून लक्षात येईल. भारतीयतेपेक्षा मोठी आशियाई- पौर्वात्य मूल्यं कोलते यांना माहीत आहेत. ‘भारतीयांनी अंगीकृत केलेला पाश्चात्त्य कलाशिक्षण संस्कार’ हा काही कोलते यांच्या कौतुकाचा भाग नाही. उलट, दीनानाथ दलालांसारख्या लोकप्रिय चित्रकारांबद्दल अगदी स्मृतिलेख लिहितानाही दलाल कधीच ‘समकालीन कलावंत’ का ठरले नाहीत, याचं कठोर परीक्षण कोलते करतात. अव्वल मॉडर्निस्टांनी सौंदर्यतत्त्वांचा जसा विविधांगी आणि रसरसून विचार केला, तसं कार्य प्रत्येकाला आपापल्या देशकालसंदर्भात करता येईल आणि यावं, असा कोलते यांचा अपेक्षाव्यूह असावा असं त्यांच्या लिखाणातून लक्षात येतं. यावर खुद्द कोलते यांचं म्हणणं निराळं असू शकतं. पण कोलते यांची समदृष्टी लक्षात घेता, ‘आमची कला भारतीयच’ अशा अस्मितेशी कोलते सहमत होणार नाहीत.
कलेचा इतिहास त्या-त्या कालखंडातल्या घडामोडी, त्या-त्या वेळची विज्ञान-तंत्रज्ञानाची प्रगती यांच्या संदर्भात पाहिला पाहिजे असं मत वारंवार व्यक्त करणारे आणि मांडणशिल्पांच्या (इन्स्टॉलेशन आर्टच्या) इतिहासाबद्दल मराठीतला पहिलावहिला लेख १९९८ मध्ये लिहिणारे दिलीप रानडे आणि ‘लोकसत्ता’त अनेक र्वष चित्रसमीक्षा करणारे माधव इमारते, विसाव्या शतकातल्या महत्त्वाच्या टप्प्यांचा धांडोळा सुमारे ५० लेखांच्या मालिकेतून १९९९ सालीच घेणारे (पण हल्ली फार काहीच न लिहिणारे) नितीन कुलकर्णी, सध्या नितीनप्रमाणेच कलाशिक्षणात कार्यरत असलेले परंतु अवचित कधी समीक्षाही करणारे महेंद्र दामले, इंग्रजी साहित्य वा चित्रपटांबद्दल अधिक आणि चित्रकलेबद्दल मोजकंच लिहिणारे शशिकांत सावंत, अशा काही जणांना आणखी निराळं काढावं लागेल. यांना कलाशिक्षणानंतर विचारांच्या/अभिव्यक्तीच्या जगात कलाकार काय करतो, हे अधिक महत्त्वाचं वाटतं आणि आपण कलेबद्दल बोलत असू तर भारतीयता वगैरेसारखे मुद्दे फार तर अनुषंगानं यायला हरकत नाही, अशा मताचं साधम्र्य यांच्या लिखाणांत आणि विचारांत आहे. मेक्सिकन कला किंवा अन्य विषयांवर चित्रकार सुधीर पटवर्धन जेव्हा मराठीत लिहितात, तेव्हा त्यांचाही मतप्रवाह हा असाच असतो. पटवर्धन यांना ‘कलाप्रयत्नांचा सामाजिक उपयोग’ म्हणजे काय हे उमगलेलं आहे, हे तर त्यांच्या चित्रांप्रमाणेच त्यांच्या मराठी लिखाणातूनही जाणवतं.  
थोडक्यात, ‘मराठी नियतकालिकांतील (आणि वर्तमानपत्रांतील) दृश्यकलाविचारा’चा स्वातंत्र्योत्तर काळातला आढावा कुणी घेतलाच, तर चित्रकलेतल्या भारतीयतेविषयी जेवढी चर्चा स्वातंत्र्यपूर्व काळात व स्वातंत्र्याच्या उष:कालात (सन १९४६ ते ५०) होत होती, तेवढी नंतर उरली नाही, असं ठाशीवपणे लक्षात येईल.
पण मग, स्वातंत्र्योत्तर काळात जो काही ‘दृश्यकलाविचार’ झाला असेल त्याचं एखादं वैशिष्टय़ सांगता येईल का? स्वातंत्र्यपूर्व काळात किमान ‘हिंदी कला’ (कलेतली भारतीयता) हा मोठा विषय होता आणि चित्रकलेतलं स्त्रीदेहदर्शन, चित्रकलेचा उदात्त हेतू, असे उपविषय त्याच्याशी जुळलेले होते. ‘संवेदना’ या शब्दाचा साठच्या दशकापासून भरपूर प्रमाणात झालेला वापर किंवा ‘अमूर्तचित्र’ याविषयी मराठीत लिखाणाचा गुंफला गेलेला गोफ हे वगळता मराठीत वर्षांनुवर्षांना व्यापणारा ‘डिस्कोर्स’ (भले तो विद्वत्तापूर्ण नसेना का..!) मराठीतल्या चित्रकलाविषयक लिखाणात नाही.
गोंधळेकर यांनी आपला समाज आणि कला यांच्या स्थितीचं जे निदान केलेलं आहे, ते आजही वा आधीच्या कोणत्याही काळात लागू पडणारं आहे. साठच्या दशकात मर्मज्ञ अधिक होते, म्हणू. मात्र दुखणं आहे आणि त्याची कारणं ही आहेत हे पक्कं आहे. गोंधळेकरांच्या वेळी भारतीयतेचा विषय तरी लोकांना- फक्त लेखकांनाच नव्हे तर वाचकांनाही- चित्रकलेबद्दलच्या चर्चेसाठी होता. आज तसा सामायिक विषय आहे का? नसल्यास का नाही? तुम्हाला उत्तरं सुचताहेत का?
(१) चित्रकार व सामान्य जनता यांच्यातील अंतर वाढले आहे. चित्रकार व त्यांच्या कलाकृति आणि सामान्य जनता यांच्यांत अेक समान भूमिका राहिली नाही हें सत्य आहे.
(२) .. सामान्य जनाता अजून जीवनापेक्षा नुसत्या जगण्याच्या प्रश्नातील अवघडपणामुळें कलेसारख्या जीवनातील आवश्यक अशा आनंदाबद्दल आस्था दाखवेनाशी झाली आहे.
(३) या दोन्हींतील (म्हणजे कलावंत व सामान्य जनता) दुवा म्हणून असावयास पाहिजे असलेला कलामर्मज्ञांचा वर्ग अजून वस्तुत अस्तित्वात यावयाचा आहे.
(४) .. सामाजिक परिस्थिती ही नेहमीच कलाप्रकारावर नकळत पण हमखास ठसा उमटवित असतें आणि ज्यावेळीं हे अन्योन्य संबंध तुटता किंवा दुरावतात त्यावेळीं चित्रकला ही निव्वळ तांत्रिक व प्रयोगात्मक होअूं लागते. पण हें अंतर एका विवक्षित मर्यादेपेक्षा ताणले गेल्यास चित्रकार हा समाजघटक ही आपली भूमिका सोडून देतो आणि त्याच्या कलाप्रयत्यांचा सामाजिक उपयोग (निव्वळ अैहिक उपयोग नव्हे) नाहीसा होतो.
– ज. द. गोंधळेकर, ‘मनोहर’ मासिकाच्या डिसेंबर १९४९च्या अंकातील ‘संधिकालातील चित्रकला’ हा लेख (शुद्धलेखन मूळ उताऱ्याप्रमाणे), संदर्भ- पान ८२, ‘मराठी नियतकालिकांतील दृश्यकलाविचार’- रमेशचंद्र पाटकर, ज्योत्स्ना प्रकाशन, मुंबई