दुनियेच्या आणि माझ्या आड सद्गुरू उभा ठाकायला तयार असतो खरा, पण माझा तो भावही टिकत नाही. दुनियेचा मोह सुटणं इतकं सोपं नसतं. इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, दुनिया सोडायची नाही, दुनियेचा मोह, दुनियेची आसक्ती सोडायची आहे. कारण तीच गुंतवत असते. दुनिया आपल्याच पद्धतीने वागते. तिच्या वागण्याची रीत कधीच बदलत नाही. मीच आपलेपणाने त्या दुनियेत जखडून राहतो आणि त्यामुळे दुनियेकडून मला अपेक्षाभंगाचा आघात सोसावा लागतो. श्रीमहाराजही म्हणतात ना, ‘आघात जगाचे नाहीत, आपलेपणाचे आहेत.’ त्याचा अर्थ तोच आहे. तेव्हा हा दुनियेचा मोह सुटता सुटत नाही, कर्मप्रारब्धाने मी या चक्रात आहे. ते कर्मही चिवट आहे. तेही सुटता सुटत नाही. तेव्हा तूच सोडवणूक कर. श्रीतुकाराम महाराजांचा एक अभंग आहे. तो असा-
मी अवगुणी अन्यायी। किती म्हणोन सांगों काई।
आतां मज पायीं। ठाव देईं विठ्ठले ।।१।।
पुरे पुरे हा संसार। कर्म बळिवंत दुस्तर।
राहों नेदी स्थिर। एके ठायीं निश्चळ ।।२।।  
अनेक बुद्धीचे तरंग। क्षणक्षणां पालटती रंग।
धरूं जातां संग। तंव तो होतो बाधक ।।३।।
तुका म्हणं आतां। तोडीं माझी अवघी चिंता।
येऊनियां पंढरीनाथा। वास करीं हृदयीं।।४।।
हे भगवंता, मी किती अवगुणी आहे आणि किती अन्यायी आहे ते किती सांगू! कितीही सांगितलं तरी त्यांची यादी संपणार नाही. तेव्हा आता तुझ्याच पायी मला ठाव दे. हा कर्मबीजातून उत्पन्न झालेला आणि सदोदित पसरतच जात असलेला संसार आता मनातून आवरू दे. या संसाराच्या ओढीचा जो सागर मनात उसळत आहे तो फार दुस्तर आहे. तो पार करणं माझ्या आवाक्यातलं नाही. तो पार करायचा निश्चयही स्थिर राहू शकत नाही. या संसाराच्या झंझावातात मीदेखील अस्थिरच आहे. मनात बुद्धीचे अनेक तरंग उमटत असतात आणि मनाचा रंग त्यामुळे सतत पालटत असतो. तर्कवितर्ककुतर्क, विचारअविचारकुविचार असा झंझावात सारखा उत्पन्न होत असतो. दुनियेचा संग सोडू म्हणता सुटत नाही आणि तो संग बाधक होतो. त्या दुनियेची बाधा होते आणि दुनियेचं भूत सदोदित माझ्या मानगुटीवर बसतं. त्यानं जिवाला अहोरात्र भौतिकाची चिंता लागते. वाळवीच जणू. ती अंतरंग पोखरत राहते. हे पंढरीनाथा, ज्या हृदयात या दुनियेची चिंता मला डसत आहे त्या हृदयात येऊन तूच वास कर. त्यामुळेच माझी अवघी म्हणजे मला माहीत असलेली आणि माहीत नसलेलीदेखील चिंता तुटेल. तुकाराममहाराज आर्त पुकारा म्हणजे काय, हेच आपल्याला या अभंगातून शिकवतात. नाम सुरू झालं, स्वतचे अवगुण कळू येऊ लागले की साधकाची ही मनोदशा होते. ती टिकत नाही, हाच एक धोका आहे. ती टिकली पाहिजे; तरच आधी अवगुण संपतील आणि मग गुणांच्याही पलीकडे जाऊन त्या निर्गुणात मिसळून जाता येईल.