हृदयेंद्रची विचारमग्न स्थिती पाहून योगेंद्रनं विचारलं, ‘‘कसला विचार करतोयस?’’ हृदयेंद्र हसला, पण काही बोलला नाही. तोच लिंबूचहा आला.. खास बंगाली पद्धतीचा.. आंबट, खारट, गोड अशी स्वादाची सरमिसळ असलेल्या त्या गरम चहाचे घोट घेता घेता हृदयेंद्र आपल्या मित्रांकडे पाहू लागला.. सर्वजण हास्यविनोदात रमले होते.. अवांतर विषय अलगद सुरू झाला होता.. हृदयेंद्रला वाटलं, सद्गुरू प्रेम आणि सद्गुरू आज्ञापालन यासारख्या विषयावर आपण सतत एवढं बोलत असतो.. ते यांना ऐकायला तरी आवडत असेल का? नाही म्हणायला योगेंद्रला गुरुतत्त्वाची महती मान्य आहे.. ज्ञानेंद्रला माणसानं दुसऱ्या माणसाच्या वैचारिक गुलामगिरीत असू नये, असं वाटतं, तरी आध्यात्मिक क्षेत्रातल्या सत्पुरुषांच्या ज्ञानाबद्दल त्याला आदरही आहे.. कर्मू सर्वानाच होत जोडतो आणि कुणी त्याला आपलं मानून आपल्या पंथात ओढण्याचा प्रयत्न सुरू केला, की कोपरापासून हात जोडून दूर होतो! तरी मित्रत्वाच्या नात्यानं सगळे आपल्या बोलण्यात मोडता घालत नाहीत, एवढं खरं.. कर्मेद्रनं हातानं त्याला किंचित गदगदा हलवलं आणि विचारलं, ‘‘तुला थोडी विश्रांती घ्यायच्ये का?’’ हृदयेंद्रनं नकारार्थी मान हलवली..
कर्मेद्र – मग बोलत का नाहीस?
हृदयेंद्र – काही नाही.. असंच..
कर्मेद्र – ख्यातिनं टीव्ही लावलाय म्हणून रागावलास का?
हृदयेंद्र – (भानावर येत) नाही.. मला कळलंसुद्धा नाही..
ख्याति – (हसत) चहा पिईपर्यंत पाहते हं.. माझा आवडता सिनेमा लागलाय.. ‘दुई पृथिबि’
कर्मेद्र – मी पाहून पाहून कंटाळलो..
ख्याति – किछु बोलो ना.. जीत आणि देव आमचे टॉपस्टार एकाच सिनेमात.. मी गोष्ट सांगते हं..
मग ख्याति चित्रपटाचं सार सांगू लागली.. जग एकच आहे, पण जणू प्रत्येक माणूस त्याच्या त्याच्या जगात वावरतोय आणि त्या जगातच कसा बंदिस्त आहे, याची जाणीव करून देणारी कथा.. एक अतिश्रीमंत तरुण त्याच्यापासून दुरावलेल्या त्याच्या गरीब प्रेयसीला परत मिळवण्यासाठी दुचाकीवरून निघालाय आणि त्याच्या दुचाकीवर नजर गेल्यानं एक दुचाकीचोर त्याच्याशी मैत्री करीत त्याच्याबरोबर निघालाय.. दोघांचं जग वेगळं, पण प्रवास एक! या प्रवासात जगाचं दिसणारं रूप वेगवेगळं, पण प्रत्येकातली प्रेमाची ओढ, शाश्वत नात्याची ओढ एकच! हळुहळू दोघांच्या दोन जगांवरची आवरणंही गळून पडतात.. एकमेकांचं अस्सल माणूसपण समोर येतं.. हृदयेंद्रला वाटलं की आपण आणि आपले मित्रही असेच वेगवेगळ्या जगात वावरतो आहोत, पण या अभंगांच्या निमित्तानं एकाच प्रवासात एकत्र आलो आहोत.. चहापान आटोपलं आणि ख्यातिनं शब्द दिल्याप्रमाणे टीव्ही बंदही केला.. आता सर्वाच्या नजरा हृदयेंद्रवर खिळल्या.. त्या नजरांची जाणीव झाल्यानं हृदयेंद्र संकोचला आणि म्हणाला..
हृदयेंद्र – चला, अभंगावर चर्चा पुन्हा सुरू करू..
योगेंद्र – आतापर्यंत झालेल्या चर्चेनुसार आणि तुझ्या क्रमानुसार पुन्हा अभंग एकदा सांग.. थांब नाहीतर, मीच वाचतो त्या क्रमानुसार.. हं.. आनंदाचे डोहीं आनंद तरंग। आनंदचि अंग आनंदाचें।। १।। तुका म्हणे तैसा ओतलासे ठसा। अनुभव सरिसा मुखा आला।।४।। गर्भाचे आवडी मातेचा डोहाळा। तेथींचा जिव्हाळा तेथें बिंबे।। ३।। काय सांगों झालें कांहीचिंया बाहीं। पुढें चाली नाहीं आवडीनें।। २।। असा तुझा अभंगाचा क्रम आहे.. आणि ‘‘गर्भाचे आवडी मातेचा डोहाळा। तेथींचा जिव्हाळा तेथें बिंबे।।’’ या तिसऱ्या चरणाच्या अर्थावर आपण चर्चा केली आहे.. आता तुझ्या क्रमानुसारचा पुढचा चरण म्हणजे ‘‘काय सांगों झालें कांहीचिंया बाहीं। पुढें चाली नाहीं आवडीनें।।’’ त्यावर आता काहीतरी सांगायला सुरुवात कर..
हृदयेंद्र – (हसत) मातेला डोहाळे कधी लागतात? तर बाळ पोटात असेपर्यंत.. मग त्या काळात ती तिला न आवडणारंही आवडीनं खाते, कारण डोहाळे! पण एकदा का मूल जन्मलं की मग तिला डोहाळे लागत नाहीत.. मग तिची आवड वेगळी नि बाळाची आवड वेगळी होऊ शकते.. सद्गुरूप्रेमाचा तंतू ज्याच्या अंत:करणात रुजला आहे ना, त्याची अवस्था मात्र फार वेगळी होते.. काहीच्या बाही होते.. त्याची आधीची आवड उरतच नाही!
चैतन्य प्रेम