हृदयेंद्रनं दोन दिग्गज गायकांच्या जुगलबंदीची जी उपमा वापरली होती, ती अगदी चपखल आहे, असं सर्वच मित्रांना जाणवत होतं.. कर्मेद्र हसून म्हणाला..
कर्मेद्र – परदेशात ते आकाळपाळणे असतात ना? एकदम चक्राकार वेगानं वर जातात आणि खाली येतात त्यात बसल्यावर जशी चक्कर येते किंवा माणूस गांगरून जातो, तसं झालंय माझं.. मला हेच कळेनासं झालंय की नेमका कोणता अभंग तुम्ही चर्चेसाठी घेतलात आणि नेमक्या कोणत्या अभंगावर सध्या तुम्ही चर्चा करत आहात.. (सगळेच हसतात) हसू नका.. ही तुमची नेहमीची चलाखी आहे.. आता अगदी शेवटचा घास, असं म्हणत आई जशी आणखी घास भरवतच राहाते ना? तसा ‘आता शेवटचा अभंग’ म्हणत तुम्ही इतके अभंग चिवडत आहात..
हृदयेंद्र – (हसत) कम्र्या, चर्चा एकाच अभंगावर सुरू आहे आणि त्याच्या एकेका शब्दाच्या पुष्टय़र्थ इतर अभंगांचे दाखले समोर येत आहेत..
कर्मेद्र – कोणी मागितल्येत का ते दाखले? पटकन काय ती चर्चा करून टाका ना.. चारच ओळी असतात ना अभंगाला.. मग किती चारताय.. कोणता मूळ अभंग सुरू होता सांग?
हृदयेंद्र – ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग आहे.. तूच सुचविलेला.. म्हणजे तुझ्या तोंडून चुकून चुकीचा म्हटला गेल्यानं सुचलेला!.. ‘‘सगुणाची शेज निर्गुणाची बाज। सांवळी विराजे कृष्णमूर्ति।। मन गेलें ध्यानीं कृष्णचि नयनीं। नित्यता पर्वणी कृष्णसुख।। हृदयपरिवारीं कृष्ण मनोमंदिरीं। आमुच्या माजघरीं कृष्ण बिंबे।। निवृत्ति निघोट ज्ञानदेवा वाट। नित्यता वैकुंठ कृष्णसुखें।।’’
कर्मेद्र – मग आता यातल्या किती चरणांची चर्चा संपली?
हृदयेंद्र – फक्त पहिला चरण सुरू आहे अजून.. ‘‘सगुणाची शेज निर्गुणाची बाज। सांवळी विराजे कृष्णमूर्ति।।’’ यातल्या सगुण, निर्गुण आणि कृष्णमूर्तीच्या अनुषंगानं सद्गुरूंची चर्चा सुरू आहे..
बुवा – तर विष्णुसहस्त्रनामातही कृष्ण हा शब्द आहे आणि वैकुंठ हा शब्दही आहे.. कृष्णाचा अर्थ ‘कर्षयति इति कृष्ण:’ असा आहे.. म्हणजे जो आकर्षित करतो आणि आकर्षित होतो तो कृष्ण! तो भक्तांना आकर्षित करतो आणि शुद्ध भक्तीकडे आकर्षित होतो! त्याचं एक नाम वैकुंठ असंही आहे.. ‘‘वैकुंठ: पुरुष: प्राण: प्राणद: प्रणव: पृथु:।’’ या वैकुंठची उकल ‘श्रीमद्भागवता’त आहे. त्यात म्हटल्याप्रमाणे शुभ्र ऋषी आणि त्यांची पत्नी विकुंठा यांच्या ठिकाणी भगवान स्वत: अवतीर्ण झाले आणि वैकुंठ या नावाने प्रसिद्ध झाले.. आद्य शंकराचार्यानीही ‘‘विगता कुंठा यस्य स विकुंठो विकुंठ एवं वैकुठ:’’ या व्याख्येशी समांतर वर्णन केलं आहे. विविध कुंठा म्हणजे गती, त्यांच्या अवरोधास विकुंठा म्हणतात. आपल्या मनाच्या गती या भौतिकाकडे खेचणाऱ्या असतात आणि त्या आपली मती कुंठीत करीत असतात.. या कुंठांचा जो आवेग आहे तो रोखणारा भगवंत हा वैकुंठ आहे! तर असा हा जो वैकुंठ आहे, कृष्ण आहे त्याच्या ठिकाणी सर्व काही मावळतं.. हे जे मावळत जाणं आहे ना, ते डोळ्यासमोर आणा! प्रकाश मावळत आहे आणि अंधारही पसरलेला नाही.. किंवा अंधार मावळत आहे आणि प्रकाश पूर्ण पसरलेला नाही.. तेव्हाचा रंग हा ‘सावळा’ आहे!! हा सावळा कृष्ण सगुण आणि निर्गुणही मावळतं ना तेव्हा त्यापुढेही विराजमान असतो..
योगेंद्र – वा!
बुवा – ना या कान्ह्य़ाला तुम्ही गोरं म्हणू शकता, ना काळं म्हणू शकता! त्या सावळ्या रंगात असं काही तरी आहे जे तुम्हाला मिसळवून टाकतं.. हे जग आम्ही काळ्या आणि गोऱ्या अशा दोन रंगांत वाटून टाकलंय आणि काळं ते वाईट आणि गोरं ते चांगलं, अशी भ्रामक विभागणीही केली आहे.. सद्गुरूनं काळ्यातलं चांगलं आणि गोऱ्यातलं वाईटही दाखवलं.. त्या चांगल्या आणि वाईटाच्या पलीकडे नेलं आणि आपल्या रंगात रंगवलं.. असा हा सावळा हरि आहे.. उत्पत्ति, स्थिती व लय.. जागृत स्वप्न व सुषुप्ती.. कायिक, वाचिक व मानसिक.. आदि, मध्य व अंत.. सत्त्व, रज व तम.. उच्च, मध्यम व नीच असे तिन्ही लोक या सद्गुरुरुपी कृष्णानं पादाक्रांत केले आहेत म्हणून तो ‘त्रिविक्रम:’ आहे.. या सावळ्या कृष्णाची भक्ती कशी करायची, हे पुढील ओवीत सांगितलं आहे..
चैतन्य प्रेम