शब्दांचा अर्थ आचरणात उतरत नाही म्हणून जगण्यात उच्चार आणि आचाराची विसंगती पदोपदी जाणवते. यामुळे धर्मग्रंथांपासून संतांच्या रचनांपर्यंत शब्दांचीच भेट होते, अर्थाची नव्हे, असं हृदयेंद्र उद्गारला.. त्यावर योगेंद्र म्हणाला..
योगेंद्र : म्हणूनच तर आपल्या या वर्षभराच्या गप्पांतून आपल्याला बरंच काही गवसलं! मला आता उत्सुकता आहे ‘आनंदाची डोही आनंद तरंग’च्या उरलेल्या चरणांचा अर्थ जाणण्याची.. हृद् आपले राहिलेले चरण आहेत, ‘‘आनंदाचे डोहीं आनंद तरंग। आनंदचि अंग आनंदाचें.. तुका म्हणे तैसा ओतलासे ठसा। अनुभव सरिसा मुखा आला।।’’ आनंदाच्या सरोवरात आनंदाचेच तरंग उमटणार.. लताबाईंच्या स्वरात ऐकतानासुद्धा मन कसं आनंदानं उचंबळून येतं!
हृदयेंद्र : योगा इथे ‘आनंदाचे डोही’ असं म्हटलंय.. ‘डोह’ शब्द फार सूचक आहे बरं का!
कर्मेद्र : डोह म्हणजे तळं ना?
हृदयेंद्र : डोह म्हणजे अगदी छोटंसं पण खोल डबकंच म्हणा ना! तुकाराम महाराजांनी अत्यंत चपखल शब्द योजला आहे.. सर्वसामान्य माणसापासून सद्गुरुमय भक्तांपर्यंतच्या आंतरिक प्रवासाचंच सूचन यात आहे..
कर्मेद्र : म्हणजे?
हृदयेंद्र : कोणत्याही संताचं जीवन बघा.. भक्तिपंथाला लागला आणि जीवनाचं बाहय़रूप पालटलं.. अगदी गरीब होता तो कोटय़धीश झाला.. जीवनातल्या सर्व अडीअडचणी संपल्या असं कधीच झालं नाही.. अनेकांच्या आयुष्यात अखेपर्यंत लोकनिंदाही सोबतीला होती.. उपेक्षा, अवमान होता.. पालट बाहय़ात झाला नाही, अंतरंगात झाला! लोकांच्या दृष्टीनं त्यांच्या बाहय़ जगण्यात सुखाचा वाटा असं काही नसेलही, पण त्यांचं जगणं पूर्णत: सुखाचं होतं, यात शंका नाही! ‘डोह’ हा काही विराट, विस्तीर्ण, अथांग आणि नयनमनोहर भासत नाही.. तसं भक्ताचं भौतिकातलं, दृश्यातलं जगणं नयनमनोहर भासेलच, असं नाही.. ‘डोह’ म्हणजे जणू अंत:करण.. सर्वसामान्य जीवभावानं जगत असताना अंत:करणाच्या या ‘डोहा’त भवदु:ख भरून होतं आणि त्यामुळे त्यातले तरंगही दु:खाचेच होते! सद्गुरुकृपेनं आणि त्यांच्या बोधाच्या आचरणानं अंत:करणातलं भवदु:ख ओसरलं.. अंत:करणाचा डोह अखंड आनंदानं भरून गेला आणि म्हणूनच त्यातले तरंगही आनंदाचेच आहेत!
योगेंद्र : वा! हे रूपक खरंच मनाला भिडणारं आहे.. सर्वसामान्य जीवभावानं जगताना जीवनाचं दृश्यरूपही ‘डोहा’सारखंच होतं.. सर्वसाधारण, संकुचित, सामान्य.. जीवभावाच्या जागी शिवभाव आला, पण म्हणून जगण्याचं दृश्यरूप काही बदललं नाही.. ‘डोहा’चा समुद्र झाला नाही! वा!. पण तरी हृद् एक शंका येतेच..
हृदयेंद्र : कोणती?
योगेंद्र : जीवनाचं दृश्यरूप बदलत नाही, असंही म्हणवत नाही.. कारण भले गरीब असोत, संतांइतकं औदार्य कुठेच दिसत नाही! मग ज्या जीवनात औदार्य, कारुण्य ओसंडून वाहातं त्याचं दृश्यरूपही तर बदलेलच ना?
हृदयेंद्र : दृश्यरूप हा शब्द मी वस्तुमानदृष्टय़ा किंवा ऐहिक सांपत्तिकदृष्टय़ा वापरला आहे.. औदार्य, कारुण्य, सहृदयता, प्रेम, वात्सल्य हे सर्व ‘दिसत’ असलं तरी हे अंत:करणातले सूक्ष्म स्थायीभाव होतात.. ते तर संतांच्या जीवनात दिसतातच, पण त्यांचं भौतिक जीवन काही फारसं बदललेलं दिसत नाही..
ज्ञानेंद्र : तरंग या शब्दात आभासीपणाही नाही का? कारण तरंग उमटले तरी ते प्रत्यक्षात नसतातच!
योगेंद्र : वा! हाही एक वेगळा मुद्दा आहे..
हृदयेंद्र : (हसत) तरंग नसूनही ‘दिसतात’! अगदी त्याचप्रमाणे सद्गुरुमय साधकाच्या अंत:करणातला आनंद लोकांना दिसत नाही तरी त्याच्या वावरण्यातून, बोलण्यातून.. नव्हे साध्या पाहण्यातूनही त्या आनंदाची झलक मिळते! कल्पना करा, पाण्यानं काठोकाठ भरलेला घडा आहे.. तो वाहून नेताना त्यातलं पाणी डचमळत बाहेर पडतंच ना? अगदी तसं ज्याचं अंत:करण आनंदात ओतप्रोत भरून आहे त्यातून आनंदाच्या छटा बाहेर पडल्याशिवाय राहणार नाहीत..
योगेंद्र : माणसाच्या चित्तात, मनात, बुद्धीत अनेक तरंग उमटत असतात.. विचारांचे, कल्पनांचे, भावनांचे तरंग! देहबुद्धीनं जगणाऱ्याच्या मनात, चित्तात, बुद्धीत उमटणारे हे तरंग भवभय स्पर्शितच असतात.. पण जो पूर्ण तृप्त भक्त आहे त्याच्या अंत:करणातले विचारांचे, कल्पनांचे, भावनांचे तरंगही आत्मतृप्त, आनंदमयच असतात..
हृदयेंद्र : अगदी बरोबर.
चैतन्य प्रेम