चोखा म्हणे मज कांहींच न कळे। विठ्ठलाचे बळें नाम घेतो।। या चोखामेळा महाराजांच्या चरणाचा जो अर्थ पुढे आला, त्यानं हृदयेंद्रच्या मनात सद्गुरुंविषयीचे भावतरंग उमटले..
बुवा – आजच्या जगात गुरूपदाचा जो बाजार जागोजागी भरला आहे, तो पाहिला तर ज्या भावानं संत आणि भक्त सद्गुरूंची महती गात होते, ती हृदयापर्यंत पोहोचतच नाही.. पण खऱ्या सद्गुरुशिवाय या जगात काहीच नाही.. कोणताच खरा शाश्वत आधार नाही.. गुरूगीतेत या सद्गुरू समर्पण भावाचं परमोच्च दर्शन आहे.. त्या भावनेनं जगणारा सद्शिष्यही आज दुर्लभ आहे! त्याच भावनेनं चोखामेळा महाराज सांगत आहेत.. या देहाकडून कोणतंच काम होत नाही, या पंचमहाभूतांतून उत्पन्न झालेल्या आणि पंचमहाभूतांतच मिसळून जाणाऱ्या या देहात कसलीच शक्ती नाही.. या देहावाटे ज्याच्या शक्तीद्वारे बोललं जातं, या देहावाटे ज्याच्या शक्तीद्वारे पाहिलं जातं, या देहावाटे ज्याच्या शक्तीद्वारे ऐकलं जातं त्याचं दर्शन झालं ना, तर देहभाव तीळमात्रही उरणार नाही! डोळियाचा देखणा पाहतां दिठी। डोळाच निघाला देखण्या पोटी।। देहभावच उरला नाही की मग या जगात देहभावानं जो वावर सुरू होता त्याची ओढही खुंटेल.. डोळ्याचा देखणा पाहिला डोळा। आपोआप तेथें झांकला डोळा।। .. नव्हे! अंतर्दृष्टी जागी होऊन त्या दर्शनातच दृष्टी विरून जाईल.. चोखा म्हणे नवलाव झाला। देखणा पाहतां डोळा विराला।।
बुवांच्या या भावपूर्ण निरूपणानं हृदयेंद्रसह सर्वाचीचं मनं भारावली.. सर्वाची भावतंद्रा भंग करीत कर्मेद्र म्हणाला..
कर्मेद्र – अरे! किती वाजलेत लक्ष आहे का? दुपारच्या चहानंतर जे बोलतोय ते आता संध्याकाळ टळायची वेळ आल्ये.. हृदूच्या घरी बरेचदा असंच होतं.. एकातून एक गोष्टी निघत राहातात आणि किती वेळ गेला काही कळत नाही..
बुवा – आणि भगवंताच्या गोष्टीच मुळात किती गोड असतात.. या खोलीत साधनेचाही काही प्रभाव असलाच पाहिजे..
अचलदादा – (दादा प्रथमपासूनच हृदयेंद्रनं कोणत्याही स्तुतीला वश होऊ नये, यासाठी काळजी घेत. त्यामुळे ते पटकन म्हणाले..) या हृदयची किंवा आम्हा कोणाही गुरुबंधूंची कसली आल्ये हो साधना? सद्गुरूंच्या कृपेचा प्रभाव आहे हा!
हृदयेंद्र – (हसत) हो खरं आहे.. माझे एक गुरुबंधू दुनियादारीत अगदी पक्के गुंतले होते.. समाजात त्यांचा दबदबा, नावलौकिकही मोठा होता.. मोठमोठे नेते, अधिकारी त्यांना दबून असत.. पण दिवसरात्र चालणाऱ्या उलाढालींनी एकदा ते कंटाळले होते.. मन स्थिर नव्हतं.. त्यांनी मला एकदा दूरध्वनी केला, म्हणाले, कुठे आहेस? मी म्हणालो, घरीच आहे.. तर येतो, म्हणाले.. आले आणि काही क्षणांत निवांत झाले.. मी म्हणालो, चला गुरुजींना दूरध्वनी करू.. आम्ही दूरध्वनी लावला.. ते गुरुजींना म्हणाले, ‘‘गुरुजी, इथे येण्याआधी अगदी चिंतेत होतो.. मन स्थिर नव्हतं.. इथे आलो आणि काही वेळात किती शांत वाटलं!’’ गुरुजी हसून म्हणाले, ‘‘हृदयची ती खोली मी अशीच जगापासून दूर ठेवली आहे! तिथे जाताच तुला निश्चिंत वाटेल आणि तिथून बाहेर पडलास की पुन्हा चिंता पाठोपाठ येतील!’’ हे ऐकून मला खूप आनंद झाला की गुरुजींनी मला अशा खोलीत ठेवलं आहे!!
बुवा – आणि खरं सांगू का? सद्गुरू आपल्या प्रत्येक शिष्याच्या अंतर्मनालाच साधनेचा गाभारा बनवू इच्छितात! जगाच्या धकाधकीत वावरणाऱ्या प्रत्येक शिष्यासाठी ते अशी एक आंतरिक व्यवस्था निर्माण करतात जिचा आधार घेतला तर जगाच्या प्रभावापासून मन मुक्त होऊन वावरू शकेल.. उपासनेत अग्रेसर होऊ शकेल.. जेव्हा या चित्तात नाम गोंदवलं जाईल तेव्हाच खरं गोंदवलं आपल्यातच गवसेल.. जेव्हा अहंकाराचं शिर सद्गुरुचरणी वाहिलं जाईल तेव्हाच खरी शिर्डी दिसेल.. शेकडो इच्छांच्या जंगलातून सुटून आपलं खरं गाव गावेल तेव्हाच शेगावी पोहोचता येईल.. देहाशी जखडलेल्या अकलेचा कोट ढासळेल तेव्हाच स्वस्वरूपाच्या अक्कलकोटात जाता येईल.. नाहीतर नकाशावरच्या तीर्थस्थळी कितीही खेपा घाला तुम्ही आहात तिथेच राहाल!!
चैतन्य प्रेम