भारतीय इंग्रजी कवी आदिल जस्सावाला यांच्या ‘ट्राइंग टू से गुडबाय’ या कवितासंग्रहाला नुकताच साहित्य अकादमीचा मानाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यानिमित्ताने या कलंदर कवी आणि मनस्वी कलावंताविषयी..

आदिल जस्सावाला यांच्या ‘ट्राइंग टू से गुडबाय’ या कवितासंग्रहाला नुकताच साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला आहे. हा त्यांचा कवितासंग्रह आधीच्या संग्रहानंतर ३५ वर्षांनी म्हणजे २०१२ साली प्रकाशित झाला. त्यानंतर ‘द राइट काइंड ऑफ डॉग’ (२०१३) आणि त्याही आधी ‘लँडस एन्ड’  (१९६२) व ‘मिसिंग पर्सन’ (१९७६) असे आजवर त्यांचे एकंदर चार कवितासंग्रह प्रकाशित झाले आहेत. गेली पन्नासेक वर्षे कवी म्हणून आदिल यांचा दबदबा कायम राहिला आहे. याचे कारण आदिल हे कवितेचे चालतेबोलते विद्यापीठ आहे. अरुण कोलटकर, गिव्ह पटेल, दिलीप चित्रे अशा कवींचे पहिले कवितासंग्रह आदिलने काढले. त्यांच्या घरातच क्लीअरिंग हाऊस या प्रकाशन संस्थेचे कार्यालय होते. त्यांनी काढलेल्या प्रत्येक कवितासंग्रहाचे मुखपृष्ठ अरुण कोलटकर यांनी केले आहे. चौरस आकारातले हे छोटेखानी कवितासंग्रह म्हणजे दुर्मीळ पुस्तके जमवणाऱ्यांचा एक छंदच बनला आहे.

Naima Khatoon, Vice-Chancellor,
शंभर वर्षं… आणि नईमा खातून यांची कुलगुरूपदी निवड
Sham Kurle
बालसाहित्य शाम कुरळे बेपत्ता; कोल्हापुरात दिसल्याचे काहींचे दावे
out there screaming book
बुकबातमी: ‘भयप्रेमीं’साठीचा दस्तावेज..
Why frequent allegations of political infiltration in Sahitya Akademi
विश्लेषण: साहित्य अकादमीत राजकीय घुसखोरीचा आरोप वारंवार का?

आदिलनी अनेक वर्षे ‘डोबोनेर’ या प्लेबॉयच्या धर्तीवर आपल्याकडे सुरू झालेल्या मासिकाचे संपादन केले. काही काळ ते त्याचे संपादकही होते. स्त्रियांच्या नग्न छायाचित्रांसाठी हे मासिक प्रसिद्ध असले तरी विनोद मेहता, अनिल धारकर, अमृता शहा या संपादकांचे आणि सुधीर सोनाळकर, वीर संघवी, अबू अब्राहम, निस्सीम इझिकेल अशा अनेक लेखक-कवींचे साहित्य त्यातून प्रसिद्ध होई. त्यातील दोन पानांचा कविता विभाग अनेक वाचक आधी उघडत. (अर्थात सेंटर स्प्रेड पाहून झाल्यावर!) काळ्याकुट्ट पानावर पांढऱ्या रंगात कवींचे स्केचेस आणि त्यांच्या कविता.. हे एक मानाचे पान होते.
आदिल आता ७४ वर्षांचे आहेत. प्रसिद्ध डॉक्टर जसावाला यांचे ते मुलगे. लहानपण प्रशस्त घरात, पारशी वातावरणात गेलेले. आर्किटेक्ट होण्यासाठी ते लंडनला गेले. तिथेच त्यांना फारुक धोंडी, माला सेन इत्यादी मित्र भेटले. एका मुलाखतीत ते सांगतात, ‘‘मला त्या काळात अनेक भास होत. एकदा मला वाटलं की, आपलं रूपांतर सरडय़ात झालेलं आहे की काय? आणि मग वाटलं की, हे असं विक्षिप्त शापित मन घेऊन आपल्याला जगावं लागणार.’’ इथे आदिलना आपल्यातील कवी गवसला. त्यांनी आर्किटेक्टचा कोर्स अर्धवट सोडून लेखन करायला आणि इंग्रजी शिकवायला सुरुवात केली. पुढे त्यांनी फ्रेंच मैत्रिणीशी लग्न केले आणि ते भारतात परतले. अनेक ठिकाणी त्यांनी साहित्य संपादक म्हणून काम केले. ‘ट्वेल्व इंडियन पोएट’ या एम.ए.च्या अभ्यासाला लागलेल्या पुस्तकामुळे कवी म्हणून ते भारतभर सगळ्यांना माहीत झाले. अरुण कोलटकर, दिलीप चित्रे, गिव्ह पटेल असे समविचारी मित्र भेटल्यावर त्यांनी क्लीअरिंग हाऊस ही प्रकाशनसंस्था सुरू केली. कविता निवडणे, तिचे वाचन, पुस्तक छापणे याबरोबरच वाचकांना त्यांची यादी पाठवणे आणि मनीऑर्डरने पैसे स्वीकारून पुस्तके पाठवणे हे काम त्यांनी २० वर्षे केले. ते सांगतात, ‘‘आम्ही जे करत होतो त्याला सेल्फ पब्लिशिंग म्हणतात. हा प्रकार खूप लोकप्रिय झालेला आहे.’’

एक दिवस आदिलकडे पोस्टकार्ड आले. त्यात काव्यवाचनाचे आमंत्रण होते. हा काही काव्यवाचनाचा मोठा कार्यक्रम नव्हता. प्रत्येकाने आपल्या आवडत्या कविता जमवून वाचायच्या होत्या, पण स्वत:च्या कविता सोडून. ‘लोकेशन्स’ नावाचा हा वाचक गट दर आठवडय़ाला भेटत असे. अरुंधती सुब्रह्मण्यम, जेन भंडारी, जेरी पिंटो याबरोबर दिलीप चित्रे, नामदेव ढसाळ असे आदिलचे मित्रही तिथे येत. आज इंग्रजीत लेखन-संपादन करणारी बहुतेक मंडळी या मांडवाखालून गेलेली आहेत.

या साऱ्या मंडळींचे आकर्षण असायचे ते आदिलनी केलेले रोचक विश्लेषण. कधी ते वॉलेस स्टीवन्स, विस्ववा झिम्ब्रोस्का यांच्या कविता वाचून त्याबद्दल बोलत, तर कधी रशियन ी२ं१ॠ्रीी२२ल्ल्रल्ल च्या कविता वाचून दाखवत. त्यांच्या कविता वाचताना ते म्हणाले होते, ‘‘असंगतता ही कवितेची प्रमुख गरज असते. वॉलेस, विस्ववा यासारखे कवी या प्रकारात मोडतात.’’ मग एक दिवस गद्य-पद्यलेखनाच्या संकलनाचे काम करण्यासाठी त्यांनी ‘लोकेशन्स’मधून रजा घेतली आणि तिथल्या ‘लोकेशन्स’ या ग्रुपलाच ओहोटी लागली.
आदिलना कुणी विचारलं की, ‘‘लेखनाच्या संकलनाबद्दल काय चाललं आहे?’’ ते म्हणत, ‘‘आय डोन्ट केअर.’’ या त्याच्या वृत्तीमुळे त्यांनी कधी कविता आणि गद्यलेखन जमवण्याचे प्रयत्न केले नाहीत, पण जेरी पिंटोसारख्या त्यांच्या चाहत्या मित्राने त्यांचे गद्यलेखन एकत्र करण्याचा घाट घातला. त्यातूनच यावर्षी त्यांचा ‘मॅप्स फॉर अ मॉर्टल मून’* हा निबंधसंग्रह तयार झाला. अमित चौधरींनी ‘पिकाडोअर बुक ऑफ इंडियन रायटिंग’चे संपादन करताना म्हटले होते, ‘‘आदिल जस्सावालासारखा माणूस उत्तम निबंधकार आहे, पण तो फारच कमी लिहितो.’’

कवितासंग्रह फारसे खपत नाहीत, पण ‘ट्राइंग टू से गुडबाय’ हा त्यांचा कवितासंग्रह हातोहात खपला. बाजारातून नाहीसाही झाला. पण त्याची फारशी परीक्षणे आली नाहीत. सोशल मीडिया, फेसबुक, ट्विटरच्या दुनियेत कवितेचा आवाज क्षीण झाला नाही तर नवलच, पण तरीही आदिलना मानणारे अनेक कवी, वाचक आहेत.

अगदी कालपर्यंत ते टाइपराइटरवर टाइप करत असत. ‘लोकशेन्स’ची अनेक निमंत्रणेही टाइप करून पाठवत. अगदी दोनेक वर्षांपूर्वी त्यांनी संगणक विकत घेतला. आता ते लिहितात आणि उत्तरेही देतात. कफ परेडसारख्या ठिकाणी १८ व्या मजल्यावर राहणारे आदिल दया पवार असोत की एखादा चहावाला.. कुणाशीही मैत्री करू शकतात. ‘टाइम’ साप्ताहिकाला मुलाखत नाकारू शकतात.

आजही तरुण मुलं वह्य़ा घेऊन आदिलना भेटतात. चहा उकळवत ते कवितेवर बोलत राहतात. त्यांच्या उबदार आणि कवितेच्या प्रेमात न्हाऊन निघालेला कवी आदिलना शेकहॅन्ड करून परततो. या आदिलनी लंडनमध्ये डब्ल्यू. एच. ऑडेनशी शेकहॅन्ड केलेला आहे. ऑडेनने इलियटशी, इलियटने १९ व्या शतकातल्या कवींशी.. असं करत हा शेकहॅन्ड शेक्सपिअपर्यंत जातो.

*२८ जूनच्या ‘बुकमार्क’मध्ये या पुस्तकाचं परीक्षण ‘मर्त्य चंद्राच्या नाना कला’ या नावानं प्रकाशित झालं आहे.
‘‘एका कवीच्या गद्यलेखनाचं हे पुस्तक त्याचा काळ, त्यातील माणसं, त्यांची जगण्याची धडपड आणि कला टिकवण्याची कलावंतांची तगमग यांचा आलेख काढत नैमित्तिक लिखाणाच्या मर्यादा ओलांडतं. जवळपास अर्धशतकाचा साक्षीदार ठरलेलं हे लिखाण त्या काळातच अडकून पडत नाही.’’ (बुकमार्क, २८ जून २०१४)