संस्कृत भाषेचे महान वैयाकरणी असा लौकिक प्राप्त केलेल्या पाणिनींना त्यांच्या कार्यकर्तृत्वापायी ‘भगवान’ अशी उपाधी प्रदान आहे. ‘अष्टाध्यायी’ हा पाणिनींचा व्याकरणावरील सूत्ररूप असा ग्रंथ म्हणजे भाषाविषयक सामग्री संकलित करण्यासाठी त्यांनी जीवनभर केलेल्या उदंड भ्रमंतीचे आणि साक्षेपाचे अक्षररूप! वैदिक संस्कृत आणि तत्कालीन शिष्ट समाजाच्या भाषाव्यवहारातील संस्कृत यांचा सर्वांग विचार पाणिनींनी ‘अष्टाध्यायी’त मांडला. असे अलौकिक जीवनसंचित जोडलेल्या पाणिनींनी या जगामधून प्रस्थान मात्र कमालीच्या अकल्पितपणे ठेवले. या संदर्भात एक कथा म्हणा वा आख्यायिका म्हणा, प्रचलित आहे. वनातील आपल्या आश्रमाच्या परिसरात व्याकरणसूत्रांची रचना करण्यामध्ये निमग्न असलेल्या पाणिनींना त्याच अरण्यातील एका वाघाने हेरले. भक्ष्याला चाहूल लागू न देता त्याच्यावर अवचितच झडप घालायची या हेतूने जमिनीवरून पोटाने पुढे सरकत-सरपटत वाघ पाणिनींच्या दिशेने सरकू लागला. अध्ययनात मनबुद्धी एकाग्र झालेल्या पाणिनींना अगदी नजीक आलेल्या वाघाची चाहूल लागली आणि त्यांनी मान वर करून पाहिले तर पोटावर सरकत वाघ अगदी एका झेपेच्या अंतरावर पोहोचला होता. असे म्हणतात की, झडप घालून वाघाने घास घेण्याआधी, ‘पोटावर सरकत येतो तो वाघ’ अशा आशयाचे सूत्र शब्दबद्ध करून पाणिनी वाघाला सन्मुख बनले… ही आख्यायिका खरी असेल अथवा नसेलही. झेपेच्या अंतरावर प्रत्यक्ष मृत्यू उभा ठाकलेला असूनही पाणिनींची बुद्धी हडबडली नाही, ही एकच बाब त्यांची ‘भगवान’ ही उपाधी किती सार्थ ठरते याची साक्ष पुरविते. अशा स्थिर, निश्चल बुद्धीचेच वर्णन ज्ञानदेव ‘आत्मबुद्धी’ असे करतात. पाणिनींच्या देहत्यागाचा हा प्रसंग ज्ञानदेवांना ज्ञातही असावा कदाचित. ‘‘घरा येवो पां स्वर्ग। कां वरिपडो व्याघ्र। परी आत्मबुद्धीसि भंग। कदा नोहे।।’’ अशी ज्ञानेश्वरीच्या १४ व्या अध्यायातील त्यांची ओवी त्या शक्यतेचे सूचन घडविते. कारण ‘वरिपडणे’ या जुन्या मराठीतील शब्दाचा ‘उडी घालणे’ असाच अर्थ आहे. अंत:करणातील द्वंद्व पूर्ण मावळून गेले की उभ्या विश्वात अंतर्बाह्य ओतप्रोत भरलेल्या चैतन्याची अनुभूती येते आणि ‘आप-पर’ या भावनेने तिथवर घेरलेली बहिर्मुख बुद्धी शुद्ध बनून अंतर्मुख बनते, असे या प्रक्रियेचे स्पष्टीकरण ज्ञानदेव देतात. हृदयस्थ जनार्दनाला सन्मुख बनलेल्या अशा आत्मबुद्धीची निद्र्वंद्व अवस्था समजावून सांगण्यासाठी ज्ञानदेवांनी अप्रतिम उदाहरण दिले आहे ते पतीशी सर्वभावे एकरूप होणाऱ्या पतिव्रतेचे. सासर व माहेर हे दोन्ही तीर सोडून ज्याप्रमाणे नवपरिणित सौभाग्यवती पतीला अनुसरते अगदी तशीच, सर्व प्रकारच्या द्वंद्वांना तिलांजली देऊन साधकाची बुद्धी आत्मस्वरूपाशी एकरूप बनून तिथेच स्थिर होते, असे तिचे स्वरूपवर्णन ज्ञानदेव- ‘‘सांडुनि कुळें दोन्ही। प्रियासी अनुसरे कामिनी। द्वंद्वत्यागें स्वचिंतनीं। पडली तैसी।।’’ अशा कमालीच्या प्रत्ययकारी शैलीमध्ये करतात. अक्षरब्रह्माच्या उपासनेमध्ये निमग्न असलेल्या पाणिनींच्या मनबुद्धीची जातकुळी नेमकी कशी असली पाहिजे, याचा अदमास आता तरी यावा. देहबुद्धीचे रूपांतर, ज्ञानदेव म्हणतात त्याप्रमाणे, आत्मबुद्धीत घडवून आणण्यासाठी साधकाने नेमके काय केले पाहिजे याचे दिग्दर्शन, एकनाथमहाराजांचे सद्गुरू जनार्दनस्वामी- ‘‘साधनें समाधि नको पां उपाधी। सर्व समबुद्धि करीं मन।’’ अशा शब्दांत करतात. ‘‘सर्वांभूतीं पाहें एक वासुदेव। पुसोनियां ठाव अहंतेचा।’’ असे म्हणत नामदेवरायही आपल्याला तेच सांगत नाहीत का!
– अभय टिळक
agtilak@gmail.com