संतुलित व निरामय जीवनाच्या अधिष्ठानासाठी धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चतुर्विध पुरुषार्थाचे संपादन परंपरेने अगत्याचे मानलेले आहे. ‘स्थळ’ याप्रमाणेच ‘मार्ग’ असाही ‘तीर्थ’ या शब्दाचा एक अर्थ होय. त्याला अनुसरून धर्म, अर्थादी चार पुरुषार्थांची प्राप्ती करून देणाऱ्या स्थळांना तसेच उपायांनाही ‘तीर्थ’ असे संबोधन बहाल केले गेल्याचे दिसते. धर्म, नीती, सदाचार यांचे शिक्षण जिथे प्राप्त होते, ते स्थान या न्यायाने बनते ‘धर्मतीर्थ’! व्यापारधंदा विपुल प्रमाणावर जिथे फुलतो-बहरतो, ते स्थळ निर्देशित होते ‘अर्थतीर्थ’ म्हणून! कलोपासना जपणारी तसेच कलात्मक जिनसांची निर्मिती घडवून आणणारी स्थाने संबोधली जातात ‘कामतीर्थ’ या संज्ञेने! तर अध्यात्म-विद्या-ज्ञान यांची उपासना रुजलेल्या ठिकाणांना बिरुद लाभते ‘मोक्षतीर्थां’चे! मात्र, या चारही पुरुषार्थांच्या संगमाद्वारे लोकजीवन जिथे बहुअंगांनी बहरते अशा स्थानांना अभिधान लाभते ‘महापुरी’ असे! पंढरी ही महापुरी गणली जाते ती याच अर्थाने. ‘‘महाक्षेत्र हें पंढरी। अनुपम्य इची थोरी। धन्य धन्य वारकरी। तुका म्हणे तेथींचे।’’ ही तुकोक्ती स्पष्ट उच्चार करते नेमक्या त्याच वास्तवाचा आणि श्रद्धेचाही. या श्रद्धेला पुरावा देतात तुकोबारायांचे पूर्वावतार गणले जाणारे नामदेवराय. चतुर्विध पुरुषार्थांची प्राप्ती हातोहात घडविणारी पंढरीनगरी ही जणू कामधेनूच होय, असा निरपवाद निर्वाळा देणारे- ‘‘सर्व सुखरासी भिंवरेचे तीरी। आमुची पंढरी कामधेनू। धर्म अर्थ काम मोक्ष चाही थानें। दोहोणार धन्य पुंडलिक।’’ हे नामदेवरायांचे उद्गार या संदर्भात विलक्षण बोलके आणि मननीय होत. चतुर्विध पुरुषार्थांची देवघेव कमालीच्या सुलभपणे करता येत असल्यामुळेच पंढरीपेठेचा डिंडिम सर्वत्र गाजतो, अशी नि:संदिग्ध साक्षच देतात तुकोबाराय. लोकव्यवहार निकोप राहण्याच्या दृष्टीने प्रवृत्ती आणि निवृत्ती या उभयतांचा समसमा संयोग व्यक्तिगत तसेच सामाजिक जीवनात अभिप्रेत आहे भागवतधर्मप्रणीत भक्तीला. या दोन्ही प्रेरणांच्या थप्प्या लागलेले हाट पंढरीनगरीमध्ये समसमान गजबजलेले असल्याने वैकुंठप्राप्तीची असोशी पंढरीपेठेला भेट देणाऱ्या वारकऱ्यांना मुदलातच नसते, असा मुक्त पुकार- ‘‘दोन्ही च हाट भरले घनदाट। अपार मिळाले वारकरी रे। न वजों म्हणती आम्ही वैकुंठा। जिहीं देखिली पंढरी रे।’’ अशा कृतार्थ स्वरात करतात तुकोबाराय. या पेठेतील खरेदीविक्रीचे व्यवहार घडवून आणणारे चलनही आहे आगळेच. ‘प्रेम’ हेच होय ते चलन. कधीही ओहोटी न लागणारे आणि मुक्त हस्ताने वाटण्याद्वारे उदंड वाढणारे! असे कधीही न सरणारे प्रेमरूपी धन ज्याच्या गाठीला आहे अशा कोणालाही मुक्त प्रवेश आहे या पेठेमध्ये. आडकाठी नाहीच तेथे कोणालाही. ‘‘देव मुनी सर्व ब्रह्मादिक लोठे। पंढरीये पेठे प्रेमपिसे।’’ अशी निखळ साक्ष आहे नाथरायांची या संदर्भात. या बाबतीत भेदभाव अनुभवास येणार नाही अणुमात्रही पंढरीपेठेमध्ये. म्हणूनच तिथे अनुभूती येते अक्षय अशा आनंदसोहळ्याची. त्या वर्षावात भिजून चिंब होण्यासाठीच वारी करायची पंढरीपेठेची नित्याने. ‘‘म्हणोनि नेमें वारकरी। करती वारी अहर्निशी।’’ हे नाथांचे वचन पराकोटीचे मार्मिक आणि तितकेच चिंतनीय ठरते ते याच संदर्भात! – अभय टिळक
agtilak@gmail.com
