– अभय टिळक
तुकोबांच्या जीवनप्रवासाला निर्णायक वळण बहाल केले ते इ.स. १६३०-३१ या वर्षाने. महाराज तेव्हा होते २२ वर्षांचे. साधारणपणे इ.स. १६२९ पासून पुढील दोन ते तीन वर्षे पर्जन्यराजाची या प्रांतावर झालेली अवकृपा तुकोबांच्या जीवनात साधनापर्वाचा प्रारंभ घडवण्यास प्रकर्षाने कारणीभूत ठरली. तुकोबा कमालीचे अंतर्मुख बनलेले दिसतात ते नेमके त्यांच्या आयुष्याच्या याच टप्प्यावर. त्यापुढील जवळपास एक दशक म्हणजे महाराजांच्या एकाकी साधनेचे धगधगते अग्निकुंडच जणू. तुकोबांच्या त्या खडतर साधनायज्ञाची यथासांग सांगता झाली ती सन १६४० मध्ये त्यांना बाबाजी चैतन्यांकडून प्राप्त झालेल्या अनुग्रहाद्वारे. इथे आता ध्यानामनात कोरून ठेवण्याजोगे सर्वाधिक उद्बोधक वास्तव म्हणजे, साधकावस्थेमध्ये प्रवेश केल्यानंतर जवळपास दहा वर्षांनी तुकोबांना मानवी देहधारी सद्गुरूंचा अनुग्रह प्राप्त झाला, हे. सद्गुरूंची भेट होण्यापूर्वीचे एक पुरे दशक तुकोबांनी अत्यंत कठोर आत्मपरीक्षण पदोपदी करत, निळोबाराय वर्णन करतात त्याप्रमाणे, वैराग्याची निष्ठा प्रगट करण्यासाठी कष्टांचे डोंगर उपसले. अवखळ असणारी बुद्धी स्थिर करण्यासाठी प्रयत्नांचे पहाड महाराजांनी त्या काळात फोडले. ‘‘अनेक बुद्धीचे तरंग क्षणक्षणां पालटती रंग। धरूं जाता संग तंव तो होतो बाधक।’’ अशा शब्दांत, अस्थिर असलेल्या मनबुद्धीला स्थिर करण्यासाठी उपसलेल्या सायासांचे वर्णन तुकोबा मांडतात. ज्ञानदेवांनी १८ व्या अध्यायात विदित केलेल्या ‘क्रमयोगा’ची सारी प्रक्रिया तुकोबारायांच्या साधनापर्वात मूर्तिमंत साकारलेली प्रत्ययास येते. वैराग्यामुळे प्रक्षाळलेली क्रमयोग्याची बुद्धी या बिंदूवर मग नि:संग बनू लागते. ती कशातच कणभरही अडकत नाही. ‘‘तेथ नातुडे तो वागुरें। वारा जैसा।’’ असे कमालीचे मार्मिक वर्णन बुद्धीच्या त्या अवस्थेचे ज्ञानदेव करतात. सावज पकडण्यासाठी पारधी रानात जाळे लावतो. प्राणी अगर पक्षी त्या वागुऱ्यात अडकतात, मात्र वारा तिथे क्षणमात्रही अंशभर अडकत नसतो, त्यांतलाच हा प्रकार. वैराग्यामुळे प्रथम सात्त्विक, त्यामुळे स्थिर आणि परिणामी अंतर्मुख बनलेली बुद्धी पराकोटीची विमल, विशुद्ध बनते. आशा-अपेक्षांची काजळी तिला चिकटत नाही. ‘‘ह्मणौनि निर्मले मानसिं। स्पृहा नाशौनि जाये आपैसी। किंबहुना तो ऐसी। भूमिका पावे।’’ अशा शब्दांत साधनापथावरील प्रवासाच्या या टप्प्यापर्यंत येऊन ठेपलेल्या उपासकाचे वर्णन ज्ञानदेव करतात. मनबुद्धीमधून आशेची बीबुडी समूळ झालेली असल्यामुळे क्रमयोग्याच्या हातून सारली जाणारी सारी दैनंदिन लहानमोठी कामे निर्हेतुक साकारावीत हे ओघानेच आले. त्या अत्यंत संवेदनशील टप्प्यावर उपासकाच्या जीवनात, त्याच्या त्यापुढील प्रवासाला आगळेवेगळे परिमाण बहाल करणाऱ्या तत्त्वाचा प्रवेश होतो, असा ज्ञानदेवांचा दाखला आहे. ‘गुरू’ हे त्या तत्त्वाचे नाव! ‘‘ऐसी कर्मसाम्यदशा। होय तेथ वीरेशा। मग श्रीगुरू आपैसा। भेटेचि गा।’’ असे त्या सोहळ्याचे मोठे मनोज्ञ वर्णन ज्ञानदेव करतात. श्रीगुरूंचा शोध घेण्यासाठी आटापिटा करण्याची गरज नसते. साधकाची अंतरंग भूमिका परिपक्व झाली की गुरुतत्त्वाचा प्रवेश त्याच्या जीवनात आपसूक, सहज घडून येत असतो, हेच सांगायचे आहे ज्ञानदेवांना. १६३०-३१ सालापासून पुढील दहा वर्षे एकाकीपणे केलेल्या तुकोबारायांच्या अंतरंग साधनेचे गमक उकलणे आता अवघड जाऊ नये!
agtilak@gmail.com
