अभय टिळक
पुरणाची पोळी, श्रीखंड, गुळाची पोळी, मोतीचुराचा लाडू हे सगळेच एकजात गोड पदार्थ. मुळात गोडाची आवड असणाऱ्या व्यक्तीला यांपैकी कोणताही पदार्थ मनापासून एकसारखाच आवडायला हवा. पण व्यवहारात आपल्याला अनुभव येतो वेगळाच. पट्टीचे गोड खाणाऱ्यांपैकी काहींना त्यातल्या त्यात आवडते पुरणाची पोळी, तर काहींना अधिक प्रिय असते बासुंदी. गोड पदार्थ जिभेवर ठेवल्याने होणाऱ्या अपरिमित आनंदाची अनुभूती कोणाला श्रीखंडाचे बोट चाटून घ्यायला आवडते, तर कोणाला मोतीचूर खाऊन. हे निखळ रुचिवैचित्र्य म्हणायचे. तोच प्रकार अद्वैत आणि अद्वय या दोन दर्शनांबाबतीत. जगाची निर्मिती, त्याचे स्वरूप व या लौकिक जगाचे घटक असणाऱ्या तुमच्या-माझ्यासारख्यांचे या जगाशी व त्याच्या निर्मिकाशी असलेले नाते यांचा उलगडा करून घेण्याच्या या दोन समांतर परंपरा. बऱ्याच प्राचीन आणि संपन्न. अद्वैताच्या तत्त्वदृष्टीने जगाकडे बघायचे की अद्वयाच्या भूमिकेतून जगात वावरायचे, हा ज्याच्या-त्याच्या खुशीचा प्रश्न. संतपरंपरेला मात्र कोणत्याच भूमिकेचे वावडे नाही. ‘‘रज्जुसर्पाकार। भासयेलें जगडंबर।’’ असे म्हणणारे आमचे तुकोबा, ‘‘मृत्तिकेचे घट जाले नानापरी। मृत्तिका अवधारीं एकपणें।’’ या वास्तवाचा उच्चार करतात त्याचे गमक हेच. याला एक कारण आहे. भागवत धर्माचे आदिदैवत पंढरीच्या श्रीविठ्ठलाच्या चरणाशी या दोन दर्शनांचा समन्वय साकारतो, अशी भागवतधर्मी संतांची दृढ धारणा होय, हे ते कारण. ‘‘विठ्ठल आमचें जीवन। आगमनिगमाचें स्थान।’’ ही तुकोबांची साक्ष यासंदर्भात कळीची ठरते. अद्वैतवेदान्त आणि शैवागम या दोन तत्त्वपरंपरा एका विठ्ठलापासूनच उगम पावतात, हे तुकोबांचे कथन कमालीचे सूचक आहे. पारनेर तालुक्यातील पिंपळनेर या गावचे कुलकर्णीपण सांभाळणाऱ्या तुकोबाशिष्य निळोबांचा बाळकृष्णरूपाचे वर्णन करणारा एक अभंग यासंदर्भात मननीय ठरतो. बाळलीलांनी अवघ्या गोकुळाला वेधून टाकणाऱ्या रांगत्या नंदनंदनाचे वर्णन गोकुळातील एक गौळण- ‘‘एकीं येकटेंचि असोनि एकला। विश्वीं विश्वाकार होऊनियां ठेला। जयापरी वो तैसाचि गमला। नंदनंदन हा आचोज आंबुला वो।’’ अशा शब्दांत करते. निळोबांनी इथे मांडलेले दर्शन केवळ अनुपम्य आहे. पूर्णपणे एकटे आणि एकल असणारे असे कृष्णतत्त्वच विश्वाकार होऊन नटलेले आहे, हा त्या गौळणीला झालेला साक्षात्कार. ज्याला जे रूप आवडेल त्या रूपात हे विश्वरूप चैतन्य त्याला भेटते, असे त्या गौळणीचे अनुभवसिद्ध प्रतिपादन. एवढे कथन करून झाल्यानंतर ही गौळण त्या नंदनंदनाचे वर्णन एकाएकी ‘आचोज आंबुला’ अशा शब्दांत करते. सगळी गंमत इथे आहे. ‘आंबुला’ म्हणजे ‘नवरा’. तर ‘आचोज’ म्हणजे ‘आश्चर्य’ वा नवल. जरा बारकाईने बघितले तर, निळोबा या ठिकाणी शांभवाद्वयाची परिभाषा व सिद्धान्त सूचित करताहेत, हे चटदिशी ध्यानात येते. पाहिजे तेव्हा कोणत्याही रूपात स्वत:ला अवस्थांतरित करण्याची स्वतंत्र इच्छाशक्ती असणारा असा तो शक्तीचा ‘आंबुला’ या इथे गोकुळात नंदाच्या वाडय़ामध्ये खेळतो-रांगतो आहे हे केवढे नवल अथवा आश्चर्य म्हणायचे, हा भाव निळोबा गौळणीच्या माध्यमातून अभंगात शब्दबद्ध करतात. हेच वास्तव ज्ञानदेव- ‘‘स्त्रीपुरुष नामभेदे। शिवपण एकले नांदे।’’ अशा शब्दांत ‘अमृतानुभवा’मध्ये मांडतात. भागवतधर्माची पताका खांद्यावर घेणाऱ्या या संतपरंपरेमध्ये ज्ञानोबांपासून ते निळोबांपर्यंत समन्वयाचे चांदणे हे असे सर्वत्र विखुरलेले आढळते.
agtilak@gmail.com