तरी कीर्तनाचेनि नडनाचें। नाशिले व्यवसाय प्रायश्चित्तांचे..

कथारूपी त्रिवेणीसंगमात न्हायले की मग वरकड तीर्थाप्रमाणे संकल्प-प्रायश्चित्तांच्या जाळ्या-जळमटांमध्ये गुरफटण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

– अभय टिळक agtilak@gmail.com

कीर्तन हे भक्तीचे एक अंग होय, या वास्तवाची जाणीव बरीचशी मावळून कीर्तनाचे अथवा कीर्तनसप्ताहाचे आयोजन हा आताशा एक दणकेबाज ‘इव्हेण्ट’ ठरू लागलेला आहे. परिणामी, कीर्तनसेवेच्या अंतरंगापेक्षा या ‘परफॉर्मन्स’चा बहिरंगच अधिकाधिक उठावदार करण्याकडे कीर्तनकारांसह सप्ताहांच्या आयोजकांचेही सारे लक्ष एकवटावे हे साहजिकच ठरते. कीर्तनसप्ताहाला स्थळ-काळ-वेळाची मर्यादा असली तरी मुळात अंत:करणात नामसंकीर्तन अविरत चालू राखले पाहिजे, ही आहे संतमंडळाची अपेक्षा. बाह्य़ोपचार कितीही निगुतीने केले तरी कीर्तनभक्तीची वीणा मनमंदिरात अहोरात्र झंकारत नसेल तर तो अवघा ठरतो निव्वळ वरपंगच. आसन ध्यान मुद्रा लक्षण। कर्मकांड क्रिया धर्म जाण। वाउगी कासया भस्मलेपन। कीर्तन अंतरीं नसेची। अशा शब्दांत उपहास करतात नाथराय तशा बेगडी बाह्य़ात्काराचा. ही फजिती टळावी याचसाठी कीर्तनाच्या अंतिम आणि सर्वोच्च हेतूबाबत आपल्या ठायी स्पष्टता पुरेशी आहे अथवा नाही, याचा शोध ज्याने त्याने अंतर्मनाचा तळ धुंडाळत सतत घ्यावयाचा असतो. कीर्तनभक्तीची महती गर्जून सांगताना कीर्तन चांग कीर्तन चांग। होय अंग हरिरूप। अशा नि:संदिग्ध शब्दांत तुकोबा स्वानुभव प्रगट करत असतानाच, मोठय़ा खुबीने, कीर्तनभक्तीचा मूळ हेतू अथवा निष्पत्ती सूचित करून मोकळे होतात तुकोबाराय. परतत्त्वाशी पूर्ण ऐक्य साधणे हाच, त्यांमुळे, ठरतो कीर्तनाचा अंतिम हेतू. कीर्तनरूपी शिडीवरून अवतरलेले परतत्त्व आणि त्याच शिडीवरून उन्नत अधिष्ठानामध्ये प्रविष्ट झालेला उपासक यांचा संगम म्हणजे कीर्तन, अशी व्याख्याच त्यांमुळे तुकोबाराय एक प्रकारे जणू सिद्ध करतात ‘कीर्तनभक्ती’ या संकल्पनेची. ब्रह्मभूत होते काया च कीर्तनी। भाग्य तरी ऋणी देवा ऐसा। हे तुकोबांचे उद्गार निर्देश करतात त्याच संगमाकडे. कथारूपी त्रिवेणीसंगमात न्हायले की मग वरकड तीर्थाप्रमाणे संकल्प-प्रायश्चित्तांच्या जाळ्या-जळमटांमध्ये गुरफटण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. कारण सोपे आहे. मुळात, ‘स्व’ची जाणीव समूळ विसर्जन झालेल्या तशा त्या निर्द्वद्वावस्थेमध्ये संकल्प सोडणारा अथवा प्रायश्चित्त घेणारा असा कोणी तिथे विद्यमानच नसतो! त्यांहीपेक्षा महत्त्वाची बाब म्हणजे, नामसंकीर्तनाद्वारे पापबुद्धीचेच उच्चाटन झालेले असल्यामुळे प्रायश्चित्तादिकांचा प्रश्न पार निकालातच निघतो. तरी कीर्तनाचेनि नडनाचें। नाशिले व्यवसाय प्रायश्चित्तांचे। जे नामचि नाहीं पापाचे। ऐसें केलें। हे ‘ज्ञानदेवी’च्या नवव्या अध्यायातील ज्ञानदेवांचे कथन निर्देश करते त्याच वास्तवाकडे. ‘परमोत्कर्ष’ हा ‘नडनाच’ या शब्दाचा अर्थ. नामसंकीर्तनाचा परमोत्कर्ष अंतरंगामध्ये साकारला की पापबुद्धीसकट पाप-पुण्यादिकांच्या द्वंद्वांचे विसर्जन घडून येते, हाच सांगावा आहे ज्ञानदेवांचा इथे. अस्तित्वाच्या तशा त्या नितळ, निखळ, निर्मळ कोटीमध्ये ‘भक्त’ आणि ‘भगवंत’च याच केवळ नव्हे तर ‘श्रोता’ आणि ‘वक्ता’ या द्वैताचाही घडून येतो विलय. नित्य नवा कीर्तनीं कैसा वोढवला रंग। श्रोता आणि वक्ता स्वयें जाला श्रीरंग। ही नाथांची साक्ष विलक्षण उद्बोधक ठरते या ठिकाणी. एकच एक तत्त्व कीर्तनात सर्वत्र सर्वरूपांनी दंग आहे हे नाथराय मांडत असलेले दर्शन म्हणजे अद्वयबोधाचा गाभाच नव्हे का! अद्वयानंद हा म्हणूनच तर ठरतो हरिकथेचा सर्वोच्च हेतू आणि परिणामही.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व अद्वयबोध बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Loksatta advayabodh article author abhay tilak conclusion of kirtan bhakti worshiper zws

Next Story
शिडी
ताज्या बातम्या