अभय टिळक – agtilak@gmail.com
‘नियम’ या दुसऱ्या क्रमांकाच्या पंचविध योगातील ‘शौच’ आणि ‘तप’ हे दोन नियम परस्परानुश्रयी आहेत. या दोघांत नाते नांदते कार्यकारणभावाचे. हा कार्यकारणभावही पुन्हा उभयदिश आहे. तपाचरणाद्वारे अंत:करण शुद्ध होते, ही झाली या दोघांमधील परस्परनात्याची एक दिशा. ‘संपुष्ट हा हृदयपेटी। करूनि पोटीं सांटवूं’ या तुकोक्तीद्वारे दर्शन घडते ते नेमके नात्याच्या याच दिशेचे. तपश्चर्येद्वारे क्षालन झाल्याने संपुष्टाचे पावित्र्य लाभलेल्या हृदयपेटीमध्ये आम्ही परमात्मा साठवून ठेवू, ही आहे इथे भूमिका तुकोबारायांची. तर आंतरिक दोषांचे, नानाविध मलांचे निराकरण प्रयत्नपूर्वक झाल्याखेरीज तपाचरणासाठी अनिवार्य असणारे स्थैर्य साधकाला हस्तगतच होत नाही, ही झाली ‘शौच’ आणि ‘तप’ या दोन नियमांमधील नात्याची दुसरी दिशा. ‘दोष’ अथवा ‘मळ’ हे दोन्ही शब्द निर्देश करतात आंतरिक तसेच बाह्य़ अशुद्धीकडे. त्यामुळे ‘शौच’ या संज्ञेद्वारे सूचित होणाऱ्या पावित्र्याच्या संकल्पनेला ही दोन्ही परिमाणे अपेक्षित आहेत. अंत:करणाचे मालिन्य तसेच ठेवून अथवा त्याच्याकडे सरसहा दुर्लक्ष करून केवळ शारीरिक शुद्धीवरच भर असणाऱ्या बहिर्मुखांची मनोज्ञ खिल्ली उडवितात नाथराय. ‘दहें माखला वायसु। तो काय होईल राजहंसु’ हे ‘एकनाथी भागवता’च्या तिसऱ्या अध्यायातील नाथांचे वचन कमालीचे मार्मिक होय. काळ्या कुळकुळीत कावळ्याला बाहेरून मणभर दही फासले तरी त्याचे रूपांतर राजहंसामध्ये थोडेच होणार आहे? अगदी याच न्यायाने अंत:करणातील मळ दृढपणे चिकटून बसलेला असताना अट्टहासाने कितीही शरीरशुद्धी करत राहिले तरी साधकावस्थेमध्ये अपेक्षित असणारे शुचित्व लाभणार नाही असे स्पष्टपणे बजावतात नाथमहाराज. व्यक्तिगत व सार्वजनिक जीवनाचा पोत निकोप, निरामय बनण्यासाठी अनिवार्य असणाऱ्या अंतर्बा शुद्धतेची परिसीमा ‘आतां निर्वाळूनि कनकें। भरिला गांगें पीयूखें। तया कलशाचियासारिखें। शौच असे’ अशा प्रत्ययकारी शब्दांत स्पष्टपणे निर्देशित करतात ज्ञानदेव. तांब्याप्रमाणेच सोने आणि चांदी या दोन धातूंमध्येही शुद्धीकारक गुणवैशिष्टय़े विद्यमान असल्याची धारणा परंपरेने जपलेली आहे. अणुमात्रही भेसळ नसलेले १६ कसाचे सोने परमशुद्ध मानले जाते. अशा विशुद्ध सोन्याचा स्वच्छ धुतलेला कलश पवित्रतम गणल्या गेलेल्या गंगामृताने भरून ठेवला तर अंतर्बा शुद्धतेच्या चरमबिंदूचा प्रत्यय आणून देणाऱ्या त्या कलशाद्वारे प्रगटणारा शुचित्वाचा आदर्श ‘शौच’ या संकल्पनेमध्ये अध्याहृत आहे. असे अंतर्बा शुचित्व साध्य करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते साधकाला.. मानसिक व शारीरिक पातळीवर. ‘जे आंगीं निष्काम आचारू। जीवीं विवेकु साचारू। तो सबा घडला आकारू। शुचित्वाचा’ अशा शब्दांत ज्ञानदेव स्पष्ट करतात शुचित्वासाठी आचारावयाची कर्मप्रणाली. वाटय़ाला आलेली कामे निखळ कर्तव्यभावनेने सारत राहणे आणि मनावर विवेकाचा अंकुश सतत रोखलेला राखणे, हा अंतर्बा पावित्र्यजतनाचा हुकूमी मार्ग ठरतो, हेच तत्त्व बिंबवत आहेत ज्ञानदेव. शारीरिक स्तरावरील व्यवहारांद्वारे अप्रगट मनाचेच प्रगटन घडत असते बा जगतामध्ये. विमल अंत:करणाचा प्रत्यय देहाच्या माध्यमातून साकारणाऱ्या क्रिया-प्रतिक्रियांमध्ये येत राहतो. ‘अंतरीं शुचित्व पूर्ण वसे। तें बा कर्मी स्वयें प्रकाशे। तें शुचित्वचि अनायासें। परमार्थदशे प्रकाशी’ हे नाथांचे उद्गार अधोरेखित करतात हेच शाश्वत वास्तव. केवळ पारमार्थिकच नव्हे, तर व्यावहारिक कल्याणासाठीही ‘शौच’ या नियमाचे आचरण किती अगत्याचे ठरते याचा हा पुरावाच नव्हे काय?