अभय टिळक agtilak@gmail.com
गतिमान समूहभक्तीचा आविष्कार असणारी विठ्ठलयात्रा म्हणजे वस्तुत: दिंडय़ांचा विशाल मेळावाच. ‘भजनी मेळा’ म्हणजे ‘दिंडी’! वारीतून वाटचाल करणारा वारकरी हा असतो कोणत्या ना कोणत्या दिंडीचा घटक. दिंडीची रचना असते मोठी अर्थपूर्ण. ज्ञान आणि वैराग्य या भागवतधर्मप्रणित भक्तितत्त्वाच्या दोन सहगुणांचे निदर्शक असणारी भगवी पताका धारण केलेले पताकाधारी चालत असतात दिंडीच्या अग्रभागी. त्यांच्यामागे रांगा असतात ओळीत चालणाऱ्या टाळकऱ्यांच्या. एका ओळीत असतात वारकरी तीन किंवा चार. दिंडीतील भजनाला ठेका पुरविणारा मृदंगवादक चालत असतो टाळकऱ्यांच्या रांगांमधून. सगळ्यांत मागे चालतो दिंडीचा वीणेकरी. दिंडीतील भजनाचे नियंत्रण असते विणेकऱ्याकडे. विणेकऱ्याच्या मागून चालत असतात दिंडीतील स्त्रिया. संपूर्ण दिंडीच्या वाटचालीचे नियमन असते चोपदाराकडे. एखाद्या लष्करी तुकडीच्या शिस्तीने चालू असते वाटचाल दिंडीची आणि पर्यायाने दिंडय़ांचा मेळा असणाऱ्या वारीसोहोळ्याची.
या वाटचालीला सैन्यदलाच्या तुकडीची शिस्त प्रदान करण्याचे योगदान हैबतरावबाबा आरफळकरांचे. ज्ञानदेवांच्या पालखी सोहोळ्याची या शिस्तीने वाटचाल चालू झाली ती हैबतरावबाबांच्या प्रेरणेने १८३२ सालापासून. मुळात हैबतरावबाबा हे होते मर्दुमकी गाजवलेले सरदार. लष्करी पेशा तर त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा अविभाज्य भागच. वारकऱ्यांच्या वारीसोहोळ्याला सशस्त्र सैनिकांच्या संचलनाचा पेहराव चढविण्याद्वारे हैबतरावबाबांनी आदर्श समूर्त साकार केला ज्ञानोबा-तुकोबांचाच. समाजव्यवहारातील निकृष्ट अंशाचा, नानाविध दुरितांचा आणि अवांछनीय वृत्ती-प्रवृत्तींचा बीमोड घडवून आणण्यासाठी चढाई आरंभलेल्या आक्रमक वैष्णववीरांचा संभार हेच दिंडीचे आद्य स्वरूप अभिप्रेत होते माऊलींना आणि महाराजांनाही. ‘आह्मी वीर जुंझार। करूं जमदाढे वार। तापटिले भार। मोड जाला दोषांचा’ हे तुकोबांचे ऊर्जस्वल उद्गार सूचन घडवितात याच मूळ प्रेरणेचे. लोकव्यवहार निर्दोष बनविण्यासाठी प्रसंगी संघर्षांलाही प्रवृत्त होणे हे आगळेपण होय भागवत धर्मप्रणित भक्तितत्त्वाचे. फरक इतकाच, की ही लढाई व्यक्तींशी नसून ती आहे प्रवृत्तींशी. साहजिकच या युद्धातील राऊत व त्यांची हत्यारेही असायला हवीत अ-साधारणच. ‘आह्मी रामाचे राऊत। वीर जुंझार बहुत। मनपवनतुरंग। हातीं नामाची फिरंग’ ही तुकोक्ती यासंदर्भात शाबीत होते कमालीची अन्वर्थक. वायुवेगाने दौडणाऱ्या ‘मन’ नामक वारूवर स्वार होत नामरूपी तलवार परजून समाजजीवनातील असुरी वृत्तींवर तुटून पडणारे ईश्वरनिष्ठ झुंजार वीर म्हणजे वारकरी- ही तुकोबारायांची भूमिका चिरंतन ठरणारी अशीच होय. भागवत धर्माने प्रवर्तित केलेले भक्तितत्त्व एकाच वेळी मृदुमुलायम आणि वज्रकठोर असते ते असे. समाजजीवन पुरते नासवून टाकणाऱ्या अनिष्ट धारणांचे मुळापासून निराकरण घडवून आणण्यास अगदी शस्त्रधारी असला तरी एकटादुकटा वैष्णव केव्हाही अपुराच ठरावा. त्यासाठी निकड पडते ती वैष्णववीरांच्या दळाचीच. ‘वैष्णव चालिले गर्जत। महावीर ते अद्भुत। पुढें यमदूत पळत। पुरला अंत महादोषा’ हे ज्ञानदेवांचे शब्द अधोरेखित करतात समूहबळाची अनिवार्यताच. या महावीरांचा आविर्भाव आणि त्यांनी धारण केलेली शस्त्रास्त्रेही दोषदुरितांच्या छातीत धडकी भरवणारी अशीच. ‘सहस्र नामाचे हातियार। शंख चक्राचे शंृगार। अति बळ वैराग्याचें थोर। केला मार षडवर्गा’ हे ज्ञानदेवांचे उद्गार द्योतक होत याच वास्तवाचे. विठ्ठलयात्रा ही वस्तुत: चालतीबोलती विठ्ठलसेना होय ती याच अर्थाने!
