त्रराशिक मांडायला आपण शिकतो अगदी शाळकरी वयातच. तशी गणिते शालेय जीवनातील परीक्षांदरम्यानच काय ती सोडवायची असतात असे मुळीच नाही. प्रपंचापासून ते अगदी परमार्थाच्या प्रांतापर्यंत सर्वत्र त्रराशिके मांडावी लागतात प्रसंगानुरूप. संतांचा गाव अचूक ओळखायचा कसा, याच्या काही नेमक्या खुणा मांडलेल्या आहेत तुकोबारायांनी त्यांच्या एका अभंगात. ‘‘संतांचिये गांवीं प्रेमाचा सुकाळ। नाहीं तळमळ दु:खलेश।’’ अशी संतांच्या गावची मुख्य अंतर्खुण महाराजांनी विशद केलेली आहे त्या अभंगाच्या अगदी प्रथम चरणातच. ज्या प्रेमाचा उगम तसेच परिणती तळमळ अगर दु:खामध्ये लेशभरही संभवत नाही, अशा निरामय, विशुद्ध प्रेमाचा सुकाळ जिथे सदासर्वकाळ नांदतो ते संतांचे गाव होय असे अगदी खुशाल समजावे, असा निरपवाद निर्वाळाच देतात तुकोबाराय. आता, अशा अलौकिक प्रेमाचा सुकाळ जर संतांच्या गावात असेल, तर संतांच्या प्रत्यक्ष माहेरी किती प्रेम ओतप्रोत भरलेले असेल, असे त्रराशिक मांडून बघायला नको का? या त्रराशिकाचे जे काही उत्तर येईल ते व तेवढे प्रेम एकवटलेले नगर म्हणजे पंढरी! संतांच्या अवघ्या मांदियाळीचे पंढरी हे माहेर होय, ही साक्ष- ‘‘अरे हें माहेर संतांचें। नामया स्वामि केशवाचें।’’ इतक्या निर्मळ शब्दांत पुरवितात खुद्द नामदेवराय. ‘प्रेमनगर’ हे बिरुद सर्वार्थाने शोभावे पंढरीनगरीला त्यासाठीच. भक्तराज पुंडलिकरायाच्या दोहनाद्वारे स्रवलेल्या प्रेमरूपी दुग्धधारांच्या अविरत वर्षांवात अंतर्बाह्य़ न्हाहून निघतो या क्षेत्रात पाऊल घालणारा प्रत्येक जण. हे भाग्य सर्वानाच लाभते असेही नाही. ‘‘भाग्यवंत नामा तें क्षीर लाधला। प्रेमें वोसंडला गर्जे नाम।’’ अशी त्या प्रेमवर्षांवाची अद्भुत अनुभूती शब्दबद्ध करत नामदेवराय थोरवी गातात आपल्या भाग्याची. या नगरीमध्ये वास्तव्य करणारे यच्चयावत जीवमात्र पवित्र होत, ही आहे संतमेळ्याची निखळ धारणा. इथे वास्तव्यास असणाऱ्या प्रत्येक अस्तित्वाचे अंतरंग त्या नगरीचा अधिपती असणाऱ्या विठ्ठलदेवाच्या प्रेमाने ओथंबलेले असते, असा दाखलाच- ‘‘सदा हृदयीं भरित विठ्ठलाचें प्रेम। हर्षे विठ्ठलनाम गर्जताती।’’ इतक्या नि:संदिग्ध शैलीत देतात नामदेवराय. पंढरीनगरी पवित्र होय ती पंढरीनाथाच्या प्रेमवर्षांवापायीच. जिथे निकोप आणि निष्कलंक प्रेम नांदत असते तिथे चिरंतन वस्ती राहते सुखाची आणि शांतीचीही. प्रेम हा तर भक्तितत्त्वाचा आत्माच, अशी ग्वाही देतात देवर्षी नारद, यांतच सर्व काही आले. शांतिरूपी भीमेच्या तीरावर वसलेल्या आणि भक्तिरसामध्ये अहोरात्र विहरणाऱ्या पंढरीनगरीमध्ये मूर्तिमंत प्रेम घनाकार बनून भक्तराजाखातर साकारले आहे, असा जणू पुकाराच- ‘‘शांति भीमातीरीं भक्ति पंढरपुरीं। प्रेम विटेवरी देखियेलें।’’ अशा रसमय शैलीत करतात नामदेवराय. अक्षय आणि निरामय प्रेमाची प्राप्ती हे होय पंढरीतीर्थाचे आगळेपण. चंद्रभागेच्या तीरावर वसलेल्या पंढरीनामक बंदराची वारी करायची ती तेथील प्रेमाने भरलेली पेठ लुटण्यासाठीच. ‘‘तारूं लागलें बंदरीं। चंद्रभागेचिये तीरीं। लुटा लुटा संतजन। अमुप हें रासी धन।’’ असे हाकारे त्यासाठीच देत आहेत तुकोबाराय. कितीही लुटले तरी न सरणाऱ्या आणि पुरून उरणाऱ्या प्रेमधनाने ही नगरी ओसंडून वाहतेच आहे. ‘‘ऐसें तीर्थ कोणी दाखवा साजिरें। सदा प्रेमपुरें वोसंडत।’’ असे एक प्रकारे आव्हानच देतात नामदेवराय त्यामुळे सगळ्यांना. बघतो का या दृष्टीने आपण
पंढरीकडे?
अभय टिळक agtilak@gmail.com
