– अभय टिळक – agtilak@gmail.com
ज्येष्ठ वद्य द्वादशी हा निवृत्तिनाथांचा समाधिदिन. विठ्ठलपंत व रुक्मिणी या दम्पतीच्या चार अपत्यांमध्ये निवृत्तिनाथ सर्वात ज्येष्ठ. मातापित्यांच्या पश्चात आपल्या तीनही धाकटय़ा भावंडांचे- ज्ञानदेव, सोपानदेव, मुक्ताई- लालनपालन करण्याची कठीण जबाबदारी पडली निवृत्तिनाथांच्या कोवळ्या खांद्यांवर. मात्र, असीम धीराने ज्ञानदेवादी चारही भावंडांनी त्या दिव्याला तोंड दिले. एका अर्थाने निवृत्तिनाथांचा रुद्रप्रतापच मानावयास हवा तो. परंपरेच्या धारणेनुसार निवृत्तिनाथ भगवान शंकरांचे अवतार. ‘‘सदाशिवाचा अवतार। स्वामी निवृत्ति दातार।’’ अशी नाही तरी साक्ष आहेच जनाबाईंची. आदिनाथ शंकरांपासून प्रवाहित झालेल्या शिवोपासनेची धारा गहिनीनाथांच्या माध्यमातून हस्तांतरित झालेल्या कृष्णोपासनेशी एकरूप झाली ती निवृत्तिनाथांच्या ठायीच. तोच वसा ज्ञानदेवांना हस्तगत झाला निवृत्तिनाथांकडून. ‘‘भूतग्रामींचा परेशू। तापत्रयाचा करीं नाशु। आड धरुनि गोपवेषु। वत्सें राखे।’’ अशा मोठय़ा रमणीय व तितक्याच मार्मिक शैलीत गोकुळनिवासी गोपवेषधर गोपालकृष्ण आणि कैलासशिखरनिवासी शिवशंभू यांचे समरूपत्व ज्ञानदेव गातात ते त्याच ठेव्याचे स्मरण जागवत. भक्तराज पुंडलिकासाठी गोकुळातून थेट पंढरीपेठेकडे धाव घेतलेल्या बाळकृष्णाला प्रसंगवशात घडणारा संभाव्य शिववियोग जणू असह्य़ भासल्यामुळे शिवाला मस्तकी धारण करूनच तो विटेवरती उभा ठाकला, या वास्तवाचा मनोज्ञ दाखला- ‘‘रूप पहातां डोळसु। सुंदर पाहतां गोपवेषु। महिमा वर्णितां महेशु। जेणें मस्तकीं वंदिला।’’ अशा शब्दांत देत ज्ञानदेव शिव आणि गोपालकृष्ण यांचा विठ्ठलदेवामध्ये साकारलेला संगम निर्देशित करतात. शिवासह त्याची अर्धागिनी आदिशक्ती अभिन्नपणे अखंड नांदत असल्यामुळे, वस्तुत: ‘विष्णु-कृष्ण-शिव-शक्ती’ असा महायोगच पंढरीक्षेत्रात विटेवर समूर्त झालेला आहे. पुंडलिकाच्या भक्तिबळापायी वैकुंठ व कैलास उभयता भीवरेतीरी अवतरल्याचे- ‘‘वैकुंठ कैलास आणील हा येथें। नामा म्हणे हित झालें आम्हां।’’ अशा शब्दांत विदित करून नामदेवराय त्या अतुल्य भक्तराजाचे ऋण व्यक्त करतात ते याचसाठी. हा महासमन्वय भीमेकाठी आकारास आलेला असल्यानेच पंढरीक्षेत्र द्वैताच्या विटाळापासून अस्पर्शित राहिलेले आहे, असे अर्थपूर्ण निरीक्षण होय निवृत्तिनाथांचे. द्वैताची काजळी अणुमात्रही विद्यमान नसल्यामुळेच पंढरीत घरोघरी सदासर्वकाळ दिवाळीचा आनंदसोहळा अनुभवास मिळतो असे- ‘‘नित्यता दिवाळी नाहीं तेथें द्वैत। नित्यता अच्युत तिष्ठतसे।’’ अशा शब्दांत स्पष्ट करत, पंढरीचा महिमा वर्णन करत असतानाच ‘दिवाळी’ या सणाची एक अपूर्व व्याख्या सहज सिद्ध करतात निवृत्तिनाथ. किंबहुना पदोपदी अनुभवास येणाऱ्या द्वैतभावनेला धुमारे मुळातच फुटू नयेत याचसाठी विठ्ठलराज विटेवर विराजमान आहे, असा ठाम दावा आहे निवृत्तिनाथांचा. ‘‘तें रूप पंढरीं ओळलेंसे देखा। द्वैताची पैं शाखा तोडीयेली।’’ हे निवृत्तिनाथांचे वचन अर्थगर्भ ठरते या संदर्भात. दृश्य विश्वाकार हा एकाच तत्त्वाचा एकसलग आविष्कार होय, या जाणिवेचा कोंब अंत:करणात लसलसत असेल, तर द्वैतभावनेपायी उद्भवणारे पापताप शमून-निवून जातात, अशी आपली रोकडी अनुभूती- ‘‘निवृत्ती तत्पर निवाला सत्वर। नित्यता आचार विष्णुमय।’’ अशा शब्दांत मांडत विष्णुदासांचा जीवनाचार सूचित करतात निवृत्तिनाथ. ‘विष्णुमय’ हा शब्द बोध घडवतो नेमका त्याच जीवनरीतीचा!