अभय टिळक
सिद्धान्त आणि व्यवहार यांत नेहमीच दरी राहते. अद्वयाचे तत्त्व भावणे आणि त्याला अनुसरून आपला व्यवहार सदासर्वकाळ घडत राहणे, ही अतिशय अवघड बाब शाबीत होते. पराकोटीचे आत्मनिरीक्षण अहोरात्र करणाऱ्या तुकोबारायांनी हे मर्म अचूक हेरले होते. ‘‘बोलविसी तैसें आणी अनुभवा । नाहीं तरीं देवा विटंबना।’’ अशी विनवणी महाराज पांडुरंगापाशी कळवळून करतात त्याचे कारण हेच. मनाला भिडणारे आणि बुद्धीला पटणारे कोणतेही तत्त्वज्ञान आचरणामध्ये उतरविणे, ही खरोखरच मोठी दुर्धर बाब होय. तुकोबांचाच दाखला द्यायचा तर, आपली बहुतेकांचीच अवस्था ‘‘बोल बोलतां वाटे सोपें’’ अशी असते. प्रयत्नांची पराकाष्ठा करून वाणी आणि करणी यांदरम्यानची तफावत नाहीशी करणाऱ्या उपासकाचे कौतुक, तुकोबा- ‘‘विष खावें ग्रासोग्रासीं। धन्य तो चि एक सोसी।’’ अशा शब्दांत करतात. अद्वयदर्शनाचे अधिष्ठान असणारा परमशिवच विश्वरूपाने प्रकाशलेला आहे, हे वाचणे-म्हणणे सोपे आहे. परंतु हीच कसोटी लावून प्रतिक्षणी आपण जगतो का, हा खरा कळीचा मुद्दा होय. प्रकाशमय शिव हे तत्त्व जितके आणि जसे सत्य आहे, तितकेच विश्वरूपाने त्याचे आभासणेही सत्यच होय, ही बाब खरोखरीच आपल्या जाणिवेचा अभिन्न अंश बनली तर, प्रत्येक क्षणी आपला व्यवहार अनंत रूपांनी सामोऱ्या येणाऱ्या शिवस्वरूपाशी चालू असतो, हे भान आपल्या ठायी जागृत राहील. परिणामी आपले जगणे बनेल अधिक जबाबदार. ज्या जगाचे आपण घटक आहोत तेच जग सत्य आणि अंतिम आहे, हे एकदा का मान्य झाले की या जगाच्या पलीकडे याच्यापेक्षा सरस, श्रेष्ठ असे काही दुसरे गाठायचे उरतच नाही. पण आपली मुख्य गडबड होते ती नेमकी इथेच. या जगात देव ही वस्तूच काय ती तेवढी शाश्वत, सत्य आणि अंतिम आहे, हे आपल्याला पटते. परंतु जगाशी व्यवहार करताना मात्र द्वैताची गाठ सुटत नाही. साधनापर्वादरम्यान तुकोबारायांनाही याच समस्येचा सामना करावा लागला असावा, याचे सूचन त्यांच्या ‘‘देव जरि आहे ह्मणों मजसवें। तरि आपपरावें न वंचे।’’ या उद्गारांवरून आपल्याला घडते. प्रत्येकाच्या अंत:करणात परतत्त्व विराजमान असते, असे आपण तोंडाने म्हणतो खरे. परंतु लोकव्यवहारामध्ये मात्र आपल्यातील ‘आप-पर’भावाला छेद काही जात नाही. ही वस्तुस्थिती ठाऊक असूनही आपण ती मान्य करत नाही इतकेच. कारण तेवढे धैर्य आपल्यापाशी नसते. ते धाडस तुकोबाच दाखवू जाणोत. तो अधिकार कमाविलेला असल्यामुळेच, अद्वयाचे सार हा ज्याच्या जगण्याचे अंग बनलेले आहे, अशा विभूतीचे लक्षण तुकोबा- ‘‘देव तयाजवळी असे। पाप नासे दर्शनें।’’ अशा शब्दांत कथन करतात. देवाचा वास असण्याचे हमखास ठिकाण म्हणजे ‘‘विश्व देव सत्यत्वें’’ या अनुभूतीवर जो स्थिर आहे, असा महात्मा. देव जितका सत्य आहे तितकेच हे विश्वदेखील सत्य आहे, असा ज्याचा रोकडा अनुभव आहे त्याच्यापाशी देव गवसेल, असा तुकोबांचा नि:संदिग्ध निर्वाळा आहे. देव सापडण्याचा नेमका पत्ताच जणू तुकोबा सांगत आहेत!
agtilak@gmail.com