‘नवरात्र’ हे मुळात होय एक व्रत. महर्षी नारदांनी या नवरात्र व्रताचा उपदेश प्रभू रामचंद्रांना केला अशी परंपरेची धारणा. रावणाच्या कैदेमध्ये लंकेमधील अशोकवनात बंदिवान असलेल्या सीतेला सोडवायचे कसे, या संदर्भात चिंतामग्न असलेल्या रामचंद्रांची भेट होते नारदांशी. सीतामाईंच्या पूर्वजन्माचे वृत्त कथन करून नारदमुनी नवरात्र व्रताचा विधी विदित करतात प्रभू रामचंद्रांना. रावणाचे निर्दालन होऊन सीताशुद्धी यशस्वी व्हावी यासाठी रामप्रभू नवरात्र व्रताचे आचरण करतात. अष्टमीच्या मध्यरात्री आदिशक्ती प्रत्यक्ष प्रगटते आणि तिच्या आशीर्वादाच्या बळावर दशमीच्या दिवशी रावणवध करून प्रभू श्रीराम विजयी होतात, अशी कथा सांगितली जाते. नवरात्राचा अनुबंध अशाच आणखी एका कथांशानुसार जोडला जातो तो असुरांशी दुर्गेने अहोरात्र नऊ दिवस मांडलेल्या युद्धाचा. म्हणजेच, मुळात नवरात्राचे नाते आहे ते शक्तीशी आणि शक्तीच्या उपासनेशी. भक्तीची जोड या शक्तितत्त्वाला पुरविणे हे ठरते पैठणवासी नाथांचे विलोभनीय वैशिष्ट्य. ‘नवविध भक्तीच्या करीन नवरात्रा। करू नी पोटी मागेन ज्ञानपुत्रा। धरीन सद्भाव अंतरींच्या मित्रा। दंभ सासरा सांडीन कुपात्रा’ हा नाथांच्या ‘जोगव्या’तील चरण या संदर्भात विलक्षण बोलका आणि मननीय ठरतो. नवरात्र व्रतावर नाथ साज चढवितात नवविध भक्तीच्या रूपकाचा. या रूपकानुसार नवरात्रातील पाचवी माळ ठरते अर्चनभक्तीची. श्रवण, कीर्तन, नामस्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य आणि आत्मनिवेदन या नऊ भक्तिविधींपैकी पाचवा विधी म्हणजे ‘अर्चन’. ‘पूजा’ हा होय ‘अर्चन’ या शब्दाचा अर्थ. ‘पूजाअर्चा’ ही तर आपल्या सरावाची शब्दसंहती. इथेच तर आहे मोठी गंमत. अद्वयबोधानुसार अखिल विश्वात एकच एक तत्त्व अंतर्बाह्य भरून असल्यामुळे पूज्य असणारे दैवत आणि त्या दैवताचा पूजक असणारा भक्त या कारणमात्र द्वैतालाही मुदलात अधिष्ठानच नाही अद्वयप्रणीत भक्तीच्या प्रांतात. ‘देव नाहीं तेथें पूजी तया कोण भक्त। गुरुशी ठाव नाही कोण शिष्याशी पुसत’ अशा मोठ्या मार्मिक शब्दांत हाच तर सूक्ष्म मुद्दा अधोरेखित करतात ज्ञानदेव. आता कसा सोडवावा हा गुंता? इथे आपल्या मदतीला धावून येतात नाथराय. आगमाच्या प्रांतातील पूजाविधी नाथ विवरून सांगतात ‘एकनाथी भागवता’च्या २७ व्या अध्यायात. मोठा गोडच प्रसंग आहे तो सगळा. ‘पूजा म्हणजे नेमके काय?’ असा प्रश्न भगवान श्रीकृष्णांना विचारतात त्यांचे परमप्रिय भक्त उद्धव, असा आहे तो प्रसंग. आगम तत्त्वज्ञानाच्या प्रांतातील पूजेचे समग्र विधिविधान हा आगमींचा निजात्मभावो। आपणचि आपला देवो। आपला आपण पूजक पहा हो। हा निजात्म आठवो निजपूजे अशा अवीट गोड शब्दांत नाथराय स्पष्ट करतात श्रीकृष्णमुखाने त्या ठिकाणी. निखळ शैवागमाचे गाभासूत्रच जणू नाथ विशद करतात इथे. केवळ उपचारापुरतादेखील पूज्य-पूजक भाव साकारणे जिथे संभवतच नाही, अशा त्या अ-लौकिक प्रांतातील हे पूजाकर्म. एकाच तत्त्वाची दोन रूपे आहेत इथे विराजमान. एक रूप पूजा करते आहे आणि दुसरे तिचा करते आहे स्वीकार. ‘देव होऊ नि देव पूजिजे। हें निजात्मता गोड खाजें। उपासनाकांड व्याजें। उद्धवासी दीजे श्रीकृष्णें’ अशा शब्दांत नाथराय व्यक्त करतात ऋण देवाधिदेव भगवान श्रीकृष्णांचे त्यांसाठी. घडते का अशी अर्चनभक्ती आपल्या हातून? – अभय टिळक
agtilak@gmail.com
