नाथराय आणि तुकोबा यांचा अनुबंध अनोखाच. या उभयतांच्या विचारविश्वातील साधम्र्याचे किती तरी कवडसे गाथेमध्ये विखुरलेले गवसतात. सत्पुरुषांच्या निकट सान्निध्याने विवेकाचे अधिष्ठान अंत:करणात दृढ होते यात संशय नसला तरी मुळात संतभेट होणे हीच विलक्षण अवघड बाब ठरते, त्याचे काय? असे नेमके कोणते पुण्य आहे की जे गाठी बांधल्याने संतमहात्म्यांची गाठ पडून त्यांची सेवा घडेल, असा प्रश्न कोणा पुण्यें यांचा होईन सेवक। जींहीं द्वंद्वादिक दुराविलें अशा शब्दांत तुकोबा स्वत:च्या मनालाच विचारतात. इथे तुकोबांनी एक अंतर्खूण नमूद करून ठेवलेली आहे. संतविभूतींच्या भेटीचा आणि प्रसंगोपात्त घडणाऱ्या त्यांच्या सेवेचा उपासकाच्या अंतरंगावर अपेक्षित असणारा परिणाम महाराज इथे अधोरेखित करतात. वृत्ती संपूर्णतया द्वंद्वातीत होणे, हा संतभेट घडल्याचा निखळ पुरावा गणतात तुकोबाराय. मनोविश्व निद्र्वंद्व बनविणाऱ्या विभूती भेटणे आणि त्यांच्या सेवेच्या परिणामी साधकाची वृत्ती भेदातीत होणे या दोन्ही बाबी दुष्कर असल्याचा पुकारा, बहु अवघड असे संतभेटी । तरि जगजेठी करूणा केली अशा शब्दांत करतात तुकोबा. काय उपाय केल्याने विदेही साधूंच्या भेटीचा योग येईल, अशी विवंचना नाथरायांनाही त्यांच्या साधकावस्थेच्या एका टप्प्यावर भेडसावत असावी याचा पुरावा त्यांच्या एका अभंगातच नमूद दिसतो. ऐसे कैसियानें भेटती ते साधु । ज्यांचा अतक्र्य तर्कवेना बोधु । ज्यांसी निजानंदीं आनंदु । ज्यांचा परमानंदी उद्बोधु असा प्रथम चरण असलेला नाथांचा एक मोठा मार्मिक अभंग या संदर्भात मननीय ठरतो. संतबोधाच्या क्षेत्रात तर्काला वाव नसतो, असा विपरित अर्थ यावरून कोणी काढू नये. संत जे सांगतात त्यांनुसार डोळसपणे आचरण करण्याचा प्रयत्न केल्याखेरीज संतांच्या उपदेशाची प्रचीती येणे अवघड होय, हे सांगायचे आहे नाथांना इथे. आणि सगळ्यांत दुर्धर शाबीत होणारी कोणती बाब असेल तर ती नेमकी हीच.

साधुसंतांच्या भेटीचा योग जीवनामध्ये येणे, त्यांच्या बोधामृतानुसार आचरण घडून निद्र्वंद्वता प्राप्त होणे हे किती कठीण होय, याचा हा नाथकृत दाखला मननीय आहे. चंद्रामृत सुखें सेववेल । रवि अस्तां जाता धरवेल । बाह्य हेळा सागर तरवेल । परी त्या साधूची भेटी न होईल हे नाथांचे उद्गार पराकोटीचे उद्बोधक ठरतात इथे. पूर्णचंद्रामधून पाझरणारे अमृत एकवेळ सेवन करता येईल, अस्ताला जाणाऱ्या सूर्यालाही प्रसंगी थोपवता येईल, असीम असा सरितापतीही बाहूंच्या बळावर क्षणार्धात पोहून पार करता येईल परंतु साधूंची भेटी होईलच याची मात्र शाश्वती देता येत नाही, अशा शब्दांत संतभेट सहजसोपी का नाही याचा उलगडा करतात नाथराय. हे असे असले तरी, नेमके काय केल्यामुळे जीवनामध्ये संत भेटतील याचे वर्म उलगडून दाखवतात तुकोबाराय भाव सर्वकारण मूळ बंदु । सदा समबुद्धि नास्तिक्यभेदु । भूतकृपा मोडीं द्वेषकंदु । शत्रु मित्र पुत्र सम करीं बंधू रे अशा शब्दांत. आपली बुद्धी समत्वाला पोहोचलेली असेल, द्वेषाच्या कंदाचे अंत:करणातून उच्चाटन घडून आलेले असेल, भूतकृपेने हृदय व्यापलेले असेल, ‘आप-पर’ द्वैतभावनेचे समूळ निराकरण झालेले असेल तर आत्मज्ञानी संतसाधूंची भेट निश्चितच घडून येईल, असे आश्वस्त करतात तुकोबाराय तुम्हांआम्हांला. हेच तर होय संतभेटीच्या पूर्वअटीचे अंतर्वर्म. – अभय टिळक

agtilak@gmail.com