तुकोबाराय आणि नाथराय या दोघांमध्ये एक मोठे वैशिष्ट्यपूर्ण असे आंतरिक साम्य आहे. तुकोबांचा गाथा आणि नाथांचे भागवत म्हणजे अक्षरश: खाणच होय पारंपरिक संज्ञांच्या व्याख्यांची आणि पुनव्र्याख्यांची. प्राचीन काळापासून परंपरेने चालत आलेल्या संज्ञा-संकल्पनांना बदललेल्या काळाशी सुसंगत असा अर्थ प्रदान करून प्रचलित लोकव्यवहाराचा पोत उंचावण्याच्या दृष्टीने त्यांचे उपयोजन घडवून आणण्यासाठी लेखणी व वाणी वेचणे, हा समान धागा जोडतो नाथांना आणि तुकोबांना परस्परांशी. गाथेतील एका अभंगात तुकोबाराय शब्दांकित करतात ‘धर्म’ या संकल्पनेचे वर्म. तुकोबांच्या, सत्य तो चि धर्म असत्य तें कर्म। आणीक हें वर्म नाहीं दुजें या चरणात अ-साधारण आशय सामावलेला आहे. तुकोबारायांच्या या कथनाचा धागा जुळलेला दिसतो तो थेट महाभारताच्या अनुशासन पर्वातील एका श्लोकाच्या अंतरंगाशी. आपल्याला जे वर्तन प्रतिकूल अथवा दु:खदायक वाटते तसे वर्तन दुसऱ्याशी करू नये हे धर्माचे सार होय, अशा आशयाचा एक श्लोक आहे अनुशासन पर्वामध्ये. ‘धारण करणे’, ‘आधार देणे’, ‘टिकवणे’ या ‘धर्म’ या शब्दाच्या- ‘धृ’ या धातूच्या- ज्या विविध अर्थच्छटा होत त्यांच्याशी पूर्णत: सुसंगत असेच धर्मसार कथन करतात व्यास आणि तुकोबाराय. ‘स्व’ आणि ‘पर’ यांच्या हिताचे वर्तन हा ‘धर्म’ या संज्ञासंकल्पनेचा गाभा. श्रीमद्भगवद्गीतेमध्ये योगेश्वर कृष्ण हाच गाभा ‘परस्पर भावना’ अशा शब्दसंहतीद्वारे मुखर करतात. परस्पर हितकारक असे वर्तन हा धर्माचा गाभा जतन करणे यालाच ‘सत्य’ म्हणावे, असे आहे प्रतिपादन तुकोबांचे. ‘यम’ या पंचकृत्यकारक योगातील ‘सत्य’ या अंगाचा सारभूत गाभाही तोच. त्याच्याशी विसंगत म्हणून जे जे काही ते ते सारे ‘असत्य’, अशी साधी व सरळ उपपत्ती यातून निष्पन्न होते. सत्याचरणाचा हाच अर्थ अभिप्रेत आहे परंपरेला. सत्याची ही व्याख्या व्यक्तीच्या ठायी परिपूर्ण बिंबली की परिणामी सृष्टीकडे बघण्याची दृष्टीही पालटते, असे आहे प्रतिपादन नाथांचे. दृष्टीलाही स्पर्श होतो सत्याचा आणि उभी सृष्टीच सत्यमय बनवण्याची प्रेरणा सत्यान्वेषकाच्या मनीमानसी जागून त्याची वाचा सत्याचाच उद्घोष करू लागते, असे स्पष्टीकरण ऐसें सत्य परिपक्वल्या पोटीं । सत्य वाचा सत्य दृष्टी । निजसत्यत्वें सत्य सृष्टी । पडिली तुटी असत्यासी अशा अनुभवसिद्ध शब्दांत ‘एकनाथी भागवता’च्या सतराव्या अध्यायात करतात नाथराय. जगातील प्रत्येक वस्तुमात्रामध्ये समसमान व्यापून राहिलेल्या चैतन्याचे अखंड दर्शन होत राहणे, ही ठरते मग सत्याचा स्पर्श दृष्टीला झाल्याची खूण. सर्वांभूती समदर्शन । याचे नांव सत्य पूर्ण हे श्रीधरांचे वचन म्हणजे त्याच वास्तवाचा निरपवाद उच्चार. अशा समतेचा संस्कार व्यक्तिगत तसेच सामाजिक जीवनावर घडविण्यासाठी दैवी गुणसंपदेचा स्वामी आपली वाचा झिजवत राहतो. त्यासाठी प्रसंगी सडेतोड भाषाही वापरावी लागते. पण म्हणून, सत्य कडवे असले तरी ते कटू शब्दांतच मांडावे लागते, असे मात्र नाही. वाचेने सत्याचाच उच्चार व्हावा परंतु सत्यकथनामुळे लोकव्यवहारात कोणताही विकार उद्भवू नये, असा दक्षतेचा सांगावा आहे ज्ञानदेवांचा. तैसें श्रवणसुख चतुर । परिणमोनि साचार । बोलणें जें अविकार । तें सत्य येथें अशी ‘सत्यवाचा’ या संकल्पनेची विलक्षण आशयघन व्याख्या करतात ज्ञानदेव. पचायला अंमळ अवघडच आहे ती आपल्याला! – अभय टिळक
agtilak@gmail.com
