मरणाची भीती सर्वोच्च गणतो आपण सगळेचजण. परंतु, मृत्यूखेरीज आणखीही एका गोष्टीची प्रचंड दहशत वाटत असते आपल्याला. ती धास्ती असते जीवनात जे कमावले ते गमावण्याची. जीवनभर केलेल्या संग्रहाचा नाश होण्याची कल्पनाही करू शकत नाही आपण. नावलौकिक, प्रतिष्ठा, संपत्ती, पत, मान, पदव्या, आदर, दरारा… अशांसारख्या अनंत दृश्यादृश्य गोष्टींचा संग्रह आपण करत राहतो. तो फुगत राहतो आणि मग मनात दाटत राहते भीती त्या संग्रहाचा नाश होण्याची अथवा तो गमावण्याची. किंबहुना, अगदी सूक्ष्मपणे बघितले तर आपण जपलेल्या-जोपासलेल्या या संग्रहालाच आपण मुकणार आहोत मृत्यूमुळे या खात्रीपायीच मरण नकोसे वाटते आपल्याला. उरापोटी केलेल्या अशा त्या संग्रहाच्या मुळाशी निखळ ‘गरज’ किती आणि ‘हव्यास’ किती, याचा नितळ हिशेब मांडतो का आपण कधी तरी? ‘अपरिग्रह’ या मूल्याची प्रस्तुतता प्रतीत होते ती नेमकी इथेच आणि याच बाबतीत. अस्तेयानंतर क्रम लागतो अपरिग्रहाचा तो याचमुळे. प्रपंचामध्ये अनंत गोष्टींची गरज लागतेच. त्यामुळे, जीवनावश्यक चीजवस्तूंचा संग्रह निंदनीय कोणीच ठरवत नाही. मात्र, गरज नसताना अनेकानेक जिन्नस गोळा करण्याचा जो हव्यास आपल्या वृत्तीत बळावलेला असतो त्यालाच ‘परिग्रह’ असे पतंजली संबोधतात. असा परिग्रहच होय अवांच्छनीय. चोरीच्या मुळाशीदेखील, सूक्ष्मपणे बघितले तर, प्रेरणा वसत असते परिग्रहाचीच. त्यांमुळेच, साधुत्वाची सांगड नाथराय घालतात अपरिग्रही वृत्तीशी. निरपेक्षता, अनुसंधान, प्रशांतता, समदर्शित्व, निरभिमान, निर्ममता, निद्र्वंद्वता ही साधुत्वाची सात गुणवैशिष्ट्ये कथन केल्यानंतर नाथराय ‘अपरिग्रह’ हे आठवे वैशिष्ट्य आवर्जून नमूद करतात संतत्वाचे. एवं परिग्रही असोन। साधु अपरिग्रही पूर्ण। हें आठवें मुख्य लक्षण। अतक्र्य जाण जगासी हे ‘एकनाथी भागवता’च्या २६व्या अध्यायातील नाथांचे कथन या संदर्भात मननीय ठरते. साधुत्वाला वावडे जगाचे नसते तर त्याला दु:सह असतो अनावश्यक परिग्रह. ही वृत्ती जनसामान्यांना अतक्र्य वाटावी, हेही नाथांचे निरीक्षण अचूकच होय. सोसासोसाने खरेदी करताना, जी चीज आपण विकत घेतो आहोत तिची खरोखरच निकड आपल्याला आहे का, याचा विवेक अभावानेच बाळगला जातो. उदास विचारें वेच करी असा सावधगिरीचा इशारा तुकोबाराय तुम्हांआम्हांला देतात तो नेमका त्याचसाठी. परिग्रहाच्या प्रवृत्तीला खतपाणी मिळत राहते ते अभावग्रस्ततेच्या जाणिवेतून. भाव-अभावाच्या या द्वंद्वाची टोचणी लागलेली असल्यामुळेच, जवळ नसलेले वस्तुमात्र पदरात पाडून घेण्याची धडपड चालू असते आपली. निद्र्वंद्व अवस्था एकदा का प्राप्त झाली मनाला की निवते सारी वसवस आपोआपच. जो निद्र्वंद्व निरभिमान पहा हो। त्यासी समूळ मिथ्या निजदेहो । तेथ देहसंबधें परिग्रहो । उरावया ठावो मग कैंचा हे नाथांचे स्पष्टीकरण तोच कार्यकारणसंबंध अधोरेखित करते. इथे तुकोबा आरसा दाखवितात पक्षीसृष्टीचा. घरट्यांमध्ये अनावश्यक संग्रह करत नाहीत पक्षी. ती वृत्ती का जपता येऊ नये? पक्षीयांचे घरीं नाहीं सामुगरीं। त्यांची चिंता वाहे नारायण हा तुकोबांचा दाखला पुरेसा नाही का आपल्याला अंतर्मुख बनवायला?
– अभय टिळक
agtilak@gmail.com
