‘सद्गुरू म्हणजे निखळ परमतत्त्वाचे मानवी रूपच’ – ही झाली एक भूमिका. परब्रह्म आणि गुरू यांच्या नातेसंबंधांसंदर्भातील एकनिष्ठ शिष्याची भूमिका असते नेमकी अशीच. ‘गुरू-देव’ ही शब्दसंहती त्याच भावाची द्योतक. ते स्वाभाविकही होय आणि सत््शिष्याची भावना असावयासही हवी तशीच. परंतु सद्गुरू आणि परमतत्त्वाचे परस्परनाते नेमके कसे असते, या संदर्भातील दुसरी भूमिकाही तितकीच मनोज्ञ आहे. ‘प्रत्यक्ष परमतत्त्वच गुरूंच्या रूपाने अवतीर्ण झालेले आहे’ – ही ती दुसरी भूमिका. ‘देव-गुरू’ ही शब्दयोजना अधोरेखित करते ‘गुरू’ या अधिष्ठानाकडे बघण्याची हीच दुसरी दृष्टी. ‘गुरू’ या पदाकडे या दोहोंपैकी कोणत्या भूमिकेतून पाहायचे, हा प्रश्न ज्याच्या-त्याच्या रुचिवैचित्र्याचा. ‘अनुभवामृत’च्या प्रारंभी नमनाचे जे पाच संस्कृत श्लोक ज्ञानदेवांनी रचलेले आहेत, त्यांतील पहिल्यात ‘सद्गुरू’ या अधिष्ठानाच्या स्वरूपासंदर्भात व्यक्त झालेली ज्ञानदेवांची भावना वा भूमिका नेमकी आहे दुसरी. मोठी बहार करतात ज्ञानदेव त्या नमनादरम्यान! ‘ज्ञानेश्वरी’ हा टीकाग्रंथ होय, तर ‘अनुभवामृत’ हा ज्ञानदेवांचा स्वतंत्र प्रबंध. अद्वयबोधाचे अनुपमत्त्व अंगोपांगांनी अक्षरश: बहरून प्रगटलेले आहे ज्ञानदेवांच्या या प्रबंधात. किंबहुना, ‘अमृतानुभव’ अथवा ‘अनुभवामृत’ हा ज्ञानदेवांचा प्रबंध म्हणजे अद्वयबोधाचे पूर्ण आणि पराकोटीचे रमणीय दर्शनच! अद्वयदर्शनाची झलक ज्ञानदेव अधूनमधून दाखवितात ‘ज्ञानदेवी’मध्ये. त्या दर्शनाचेच सूत्रमय विवरण गवसते आपल्याला ‘चांगदेव पासष्टी’मध्ये. तर, अद्वयतत्त्वबोधाचे नितांत मधुर आणि तितकेच काव्यात्म आविष्करण म्हणजे ‘अनुभवामृत’! प्रबंधलेखनारंभी आराध्य दैवताला आणि त्यानंतर सद्गुरूंना नमन करण्याचा परिपाठ आहे आपल्या परंपरेत. अखिल दृश्य विश्वाचे आदिकारण असणारे आदितत्त्वच गुरुरूपाने अवतरलेले आहे, ही धारणा मनीमानसी पक्की असल्यामुळे, ‘अमृतानुभवा’तील पहिल्या श्लोकात ज्ञानदेवांनी या दोन तत्त्वांचे एकत्व विलोभनीय शैलीत शब्दबद्ध करून त्यांना विनयाने घातलेला दिसतो नमनाचा दंडवत. ‘‘यदक्षरमनाख्येयं आनंदमजमव्ययं। श्रीमन्निवृत्तिनाथेति ख्यातं दैवतमाश्रये।’’ हा ‘अनुभवामृता’तील पहिला श्लोक म्हणजे ज्ञानदेवांच्या काव्यप्रतिभेचा लखलखीत आविष्कारच! अ-क्षर, अवर्णनीय (अनाख्येय), अनादि (अज), अव्यय (अविनाशी) असे निखळ आनंदस्वरूप असणारे परमतत्त्वच ‘श्रीनिवृत्तिनाथ’ या अभिधानाने विश्वामध्ये विख्यात असून त्याच्या आश्रयानेच माझे अवघे जीवनव्यवहार सुरू आहेत, हा ज्ञानदेवांच्या या नमनाचा इत्यर्थ. निवृत्तिनाथांकडे बघण्याची ज्ञानदेवांची दृष्टी नेमकी कशी आहे, याचा सम्यक उलगडा आता व्हावा. सद्गुरूंच्या रूपाने अवतीर्ण झालेल्या परमतत्त्वाचा कृपाप्रसाद एकदा का लाभला, की शिष्याच्या अंत:करणातील वृत्ती-प्रवृत्तींचा प्रवाह प्रथम स्थिरावतो आणि मग ठायीच जिरतो, असा स्वानुभव प्रगट करतात ज्ञानदेव ‘अमृतानुभव’च्या दुसऱ्या प्रकरणात- ‘गुरू’तत्त्वाचा गौरव तन्मयतेने गातेवेळी. ‘‘जो भेटलियाचि सवे। पुरति उपायांचे धावे। प्रवृत्तिगंगा स्थिरावे। सागरी जिये।’’ हे ज्ञानदेवांचे शब्द निर्देश करतात नेमक्या त्याच अवस्थेकडे. गंगेचा प्रवाह ज्याप्रमाणे सागरापाशी स्थिरावतो आणि यथावकाश गंगेचे पृथक अस्तित्वही जसे सरितापतीमध्ये विलय पावते, त्याच न्यायाने ‘गुरू’रूपाने अवतरलेल्या परमतत्त्वाच्या कृपाप्रसादामुळे शिष्याच्या ठायी खळाळणारी परमतत्त्वशोधाची प्रवृत्तिगंगाही स्थिरावते, हेच तर सांगत आहेत ज्ञानदेव! – अभय टिळक

agtilak@gmail.com