आपली वाचा आणि मन यांचा संबंध अत्यंत निकटचा. मुखातून उमटणाऱ्या बोलांद्वारे प्रगटत असते आपले अंतर्मन. फळावरून झाडाची ओळख पटावी अगदी तसाच हा प्रकार. ‘‘वृक्ष जाणिजें फळें। मानस जाणिजें बोले।’’ असा ज्ञानदेवांचा सांगावाच आहे. या संदर्भात मन आणि वाणी यांचे परस्परनाते दुहेरी आहे. बोलण्यातून मन डोकावते, त्याचप्रमाणे बोललेल्या शब्दांचाही भलाबुरा परिणाम ऐकणाऱ्याच्या मनावर घडत असतो. साहजिकच समग्र लोकव्यवहाराचा पोत निर्भर राहतो तो जगण्यातील संवादाच्या जातकुळीवर. संवादाचा दर्जा वा गुणात्मक पातळी, अगदी स्वाभाविकपणे अवलंबून असते लोकबोलीच्या धाटणीवर. ही धाटणीच प्रदूषित झाली, की सगळा लोकव्यवहारच नासायला सुरुवात होते. परखडपणा आणि उर्मटपणा वा उद्धटपणा यांत अतिशय मूलभूत असा गुणात्मक फरक आहे, ही बाब ध्यानातच येत नसते बहुतेकांच्या! बोटचेपेपणाच सतत करत कधीही ठाम भूमिका बोलण्याद्वारे मांडायची नाही असा मात्र याचा अर्थ नव्हे. लोकव्यवहाराची जडणघडण सुधारावी यासाठी निखळ शब्दांत आवश्यक तेथे उचित भूमिका मांडणे गरजेचेच असते. परंतु अप्रिय भासणारे सत्यही आक्रमक शब्दांत मांडण्याची आवश्यकता वास्तवात नसते. ‘‘तैसें साच आणि मवाळ। मितलें आणि रसाळ। शब्द जैसे कल्लोळ। अमृताचें।।’’ असा हाकारा ज्ञानदेव देतात तो याचसाठी. समाजजीवनातील पाखंड सत्य, रोखठोक- परंतु अमृतमय वाणीने परास्त करण्याची हातोटी लाभलेली असते अद्वयबोधाने वाणी अलंकृत झालेल्या विभूतीला. बाहेरचे जग हा वस्तुत: ‘स्व’चाच विस्तार आहे, ही प्रचीती अंत:करणात स्थिर असल्याने समोरच्याचे मन दुखावेल असे बोल अद्वययोग्याच्या मुखातून उमटतच नाहीत, असा दाखला देतात नाथराय. ‘‘आकाश दचकेल देख। यलागीं नेदी सैरा हांक। वाचा परिपक्व पीयूख। वचनें परम सुख सर्वासी देतु।’’ ही ‘एकनाथी भागवता’तील ओवी कमालीची आशयघन होय. पंचमहाभूतांपैकी एक म्हणजे आकाश. शब्द अथवा बोल हा आकाशाचा गुण. उच्चारलेला ध्वनी अथवा बोल आकाश स्वत:मध्ये रिचवत असते. बोललेला शब्द ज्या आकाशाशी एकरूप होतो, त्या आकाशाला क्लेश होऊ नयेत म्हणून विवेकी व्यक्ती कठोर अथवा कर्कश बोलत नाही, असा आरसा नाथ आपल्या पुढय़ात धरतात. संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाला निखळ सुखच लाभावे अशी परिपक्व व अमृतमय वाणी विद्यमान असणे, हे अद्वयानुभूतीचे लक्षण होय, असे नाथ मानतात. आकाशालाही कष्ट होऊ नयेत याची दक्षता बाळगणारी विभूती लोकव्यवहारात कशा प्रकारच्या भाषेचा प्रयोग करत असते, याची कल्पना आता सहजच यावी. अशा व्यक्तीच्या वाणीची वैशिष्टय़े- ‘‘आटु वेगु विंदाणु। आशा शंका प्रतारणु। हे संन्यासिले अवगुणु। जया वाचा।’’ अशा मार्मिक शब्दांत स्पष्ट करतात ज्ञानदेव. ‘आटु’ (हट्टीपणा), वेगु (आवेश), विंदाणु (कपट), आशा (लोभ), शंका (भय वा अविश्वास) व प्रतारणा (कपट) या सहा अवगुणांपासून अस्पर्शित (संन्यस्त) राहिलेली असते अद्वययोग्याची वाचा, हे ज्ञानदेव इथे विदित करत आहेत. या सहा अवगुणांपासून आपली वाणी अलिप्त राहिली, तर लोकमानस विस्कटण्याचा प्रसंगच उद्भवणार नाही. ‘‘वेचीं तें वचन। जेणें राहे समाधान।’’ इतकी तुकोबांची या संदर्भातील साधी अपेक्षा नाही का पूर्ण करता येणार आपल्याला?
– अभय टिळक
agtilak@gmail.co
