अभय टिळक

ज्ञानोबा आणि तुकोबा!  विनोबाजी भावे यांचे शब्द उसने घ्यावयाचे तर ‘ज्ञानोबा—तुकोबा’ हा मध्यमपदलोपी समास होय. निवृत्तिनाथांपासून उगम पावून थेट निळोबारायांना भिडणारी भागवतधर्मीय उभी संतपरंपरा या दोन बिंदूंमध्ये सामावलेली आहे. एकाच भागवत धर्मरूपी मंदिराचे हे दोन घटकावयव. एकांनी केली पायाभरणी तर दुसऱ्यांनी प्रतिष्ठित केला कळस. या दोन्ही विभूतींच्या विचारविश्वामध्ये साधम्र्याचे अनंत कवडसे विखुरलेले. दोघांनीही उत्तम संसार केला. साधासुधा नाही तर विश्वाचा संसार. जगाचा संसार सुखाचा करण्याचा संकल्प सोडला ज्ञानदेवांनी तर, तोच संसार शुद्ध करण्यासाठी वाणी झिजवली तुकोबांनी.  विश्वाचा संसार सुखाचा तर व्हावाच परंतु, तो तितकाच शुद्धही असावयास हवा हीच या उभयतांची असोशी. ‘जोडोनियां धन उत्तम वेव्हारें’ हा त्यांचा अभंग  व्यक्तिगत पातळीवर नीतीमान प्रपंच कसा कसोशीने जगावा याचा वस्तुपाठच जणू.  प्रत्येकाचे आरोग्य निरामय राहाण्याच्या दृष्टीने पोषक, संतुलित आहार सिद्ध करणारी पाककलाही तुकोबांना उत्तम अवगत असावी असा अदमास, ‘प्रवृत्तिनिवत्तीचे आटूनियां भाग । उतरिलें चांग रसायण’ या त्यांच्या अभंगावरून बांधता येतो. या बाबतीत ज्ञानोबाही फार वेगळे नाहीत. जन्मापासून अवघे बालपणच अतक्र्य आणि विचित्र परिस्थितीमध्ये व्यतीत झाल्यामुळे लग्न, संसार या लौकिकातील बाबी ज्ञानदेवादी चारही भावंडांच्याबाबतीत अप्रस्तुतच ठरल्या. मात्र, पतिपत्नीच्या नात्यातील फुलणाऱ्या संपन्न, समाधानी आणि परस्परपूरक सहजीवनाचे ज्ञानदेवांनी जे रम्य व तितकेच प्रगल्भ चित्र रेखाटलेले आहे ते बघितले की खुद्द ज्ञानदेवच किती परिणत कौटुंबिक जीवन जगले असते, याची कल्पना करता येते. ‘अमृतानुभवा’च्या पहिल्याच प्रकरणातील एक ओवी सूचन घडविते नेमके तशाच समृद्ध सहजीवनाचे. शिव आणि शक्ती यांच्या नात्यातील जिव्हाळा प्रगट करण्यासाठी ज्ञानदेवांनी रचलेल्या त्या ओवीचा गाभा थेट भिडतो तो मात्र आजच्या औद्योगिक पर्यावरणातील कुटुंबजीवनाशी.  कल्पना करा की कुटुंब आहे पती आणि पत्नी दोघांचेच. घरधनी नोकरीला आहे कारखान्यात. रात्रभर काम करून शिणून घरी आलेल्या नवऱ्याचा डोळा जरा कोठे लागलेला असताना त्याची नीज कोणी विसकटू नये म्हणून डोळ्यांत तेल घालून दक्षपणे सावध असते त्याची अर्धागिनी. परस्परांच्या प्रीतीमध्ये आकंठ  बुडालेल्या त्या लोकविलक्षण  मनस्वी दांपत्याचे चित्र, ‘घरवाते मोटकी दोघे । जैं गोसावी सेजे रिगे । तैं दंपत्यपणे जागे । स्वामिणी जे’ अशा प्रत्ययकारी शब्दांत ज्ञानदेव रेखाटतात. ज्ञानदेवांच्या व्यक्तिमत्वातील तरलतम संवेदनशील आणि अ-साधारण प्रतिभाशाली कवी इथे पुरेपूर प्रगटतो. विश्वोत्तीर्ण रूपामध्ये विसावलेला परमशिव व विश्वात्मकपणे प्रकाशलेले त्याचेच शक्तिमय दर्शन या उभय रूपांतील एकात्म नात्याचे हे रम्य प्रगटन. नवऱ्याची झोपमोड होऊ नये म्हणून सावध गृहस्वामिनीला बघताच, ‘घरामध्ये हिचा नवरा विश्रांती घेत असला पाहिजे’, याची खूण बाहेरून आलेल्याला पटते. तर, ‘ज्या अर्थी नवरा शांत झोपलेला आहे त्या अर्थी त्याची धर्मपत्नी जागी राहून कामकाज बघत असली पाहिजे’, असा होरा तिऱ्हाईताला बांधता येतो, तसेच हे दर्शन. परमशिवाच्या ‘विश्वोत्तीर्ण’ व ‘विश्वात्मक’ अवस्थांचा आंतरसंबंध यापेक्षा वेगळ्या प्रकारे वर्णन करण्याची गरजच भासू नये असे!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

agtilak@gmail.com