‘तपस्वी’ हा होय ‘मौनि’ या मूळ संस्कृत शब्दाचा कोशगत अर्थ. यथार्थ आणि नेमका. मौन धारण करणे हे केवळ सर्वसंगपरित्याग केलेल्या तपस्वी साधकालाच शक्य होय. अर्थात, मौनात राहणे ही तापसाची गरजही असते म्हणा. कारण, इंद्रियनिग्रह ही सहजासहजी साध्य होणारी बाब नव्हे. त्यांतही  वैखरी ताब्यात ठेवणे हे तर महाकठीण कर्म. बोलण्याचे इंद्रिय आणि रसास्वादाचे साधन या दोन्ही अंगांनी जिभेवर ताबा ठेवणे ही खरोखरच कसोटीची गोष्ट ठरते. ‘जो रसनेंद्रियाचा अंकिला। कां निद्रेसी जीवें विकला। तो नाहीं एथ म्हणितला। अधिकारिया’ असे ‘ज्ञानदेवी’च्या सहाव्या अध्यायात ज्ञानदेव जे म्हणतात ते सर्वस्वी निरपवाद होय. गप्पा हाणायला आपली जीभ पराकोटीची सरावलेली असते. मनबुद्धीची बहुतांश शक्ती खर्ची पडत राहते ती तोंडाला लगाम घालण्यातच. ज्याला केवळ आणि केवळ परमार्थसाधनच करावयाचे आहे अशा उपासकांसाठी ‘नयें बोलों फार बैसों जनामधीं। सावधान बुद्धी इंद्रियें दमी’ असा सावधगिरीचा जो इशारा तुकोबाराय देतात त्यांमागील मुख्य गमक तेच. मात्र, अगदी परिपक्व सिद्धावस्थेला पोहोचलेले महात्मेदेखील बहुश: मौनच बाळगताना दिसतात. त्यालाही कारण असते तसेच सबळ. ज्या पारलौकिकाचा आकंठ आस्वाद असे महात्मे अक्षुण्ण घेत राहतात त्या सुखाचे वर्णन करण्यास आपल्या दैनंदिन व्यवहारातील वाणी किती व कशी कमालीची अक्षम आहे, याचे पुरेपूर भान असते त्यांना. ‘तुका म्हणें वाचा राहिली कुंठित। पुढें जालें चित्त समाधान’ हे तुकोबांचे स्वानुभवजन्य वचन साक्ष पुरविते त्याच वास्तवाची. त्या अतींद्रिय सुखाची महती वर्णन करावी असे कितीही वाटले तरी तो सुखानुभव व्यक्त करताना वाणी कुंठित होते आणि शब्दही तोकडे पडतात, अशी आत्मप्रचीती मांडतात तुकोबाराय विलक्षण प्रांजळपणे इथे. ज्ञानदेवांची स्थितीही फारशी वेगळी नाही यांपेक्षा. जे सांगायचे आहे ते लौकिकातील शब्दभांडाराद्वारे व्यक्त करता येत नाही आणि सांगितल्याखेरीज राहावत नाही, अशा मोठ्या रम्य कोंडीमध्ये सापडलेले ज्ञानदेव आपल्या पुढ्यात अवतरतात ‘अनुभवामृता’च्या दहाव्या प्रकरणामध्ये. जो अमृत-अनुभव प्रगट करण्यास वैखरी असमर्थ आहे त्या वैखरीलाच मी त्या अ-शारीर आणि अ-वर्णनीय आनंदसुखाची अभिव्यक्ती करण्यासाठी वेठीला धरतो आहे, हे मान्यच करून टाकतात ज्ञानदेव तिथे. केवळ इतकेच नाही तर, हा माझा प्रयत्न किती नाजूक आणि अशक्या कोटीतील होय हे, ‘म्हणोनि माझीं वैखरी। मौनाचेंहि मौन करी। हें पाणियावरी मकरी। रेखिली पां’ अशा कमालीच्या प्रत्ययकारी शैलीत ज्ञानदेव विदितही करून टाकतात. ज्ञानदेवांचे मौनही ‘बोलके’ नव्हे तर ‘मौन’ आहे. किती विलक्षण मार्मिक बोलतात ज्ञानदेव! एक व्रत म्हणून काही काळ का होईना पण, सांसारिकांना परवडणारच नाही मौन बाळगणे. मग, मौनसाधना आपल्याला साधणारच नाही का कधी, अशा भयशंकेने व्याकूळ झालेल्या मुमुक्षूंना ज्ञानदेव आभस्त करतात ‘हरिपाठा’मध्ये. ‘ज्ञानदेव म्हणे सगुण हें ध्यान। नामपाठ मौन प्रपंचाचें’ अशा शब्दांत ज्ञानदेव उलगडून सांगतात प्रापंचिकांचे मौन. गृहस्थाश्रम स्वीकारलेल्यांसाठी नामचिंतन हेच मौन होय, असा नि:संदिग्ध निर्वाळा आहे ज्ञानदेवांचा. आपल्याला जमावी ही अशी मौनसाधना.

– अभय टिळक

agtilak@gmail.com