भारतीय समाजाप्रमाणेच भारतीय क्रीडाविश्वातही विशिष्ट प्रकारची वर्गव्यवस्था आहे. क्रिकेट हा तेथील वरिष्ठ खेळ. त्याभोवती सगळे लोकप्रियतेचे वलय. त्यामुळे पसाही तेथेच. बाकीचे खेळ उतरंडीमध्ये शूद्रस्थानी. त्यातल्या त्यात फुटबॉलचे स्थान वरचे. त्यामानाने अन्य खेळ गरीब बिचारे. पण ही परिस्थिती आता बदलण्याच्या बेतात आहे. गेल्या काही दिवसांत झळकलेल्या कबड्डी आणि फुटबॉल यांच्या लीगस्पर्धाच्या बातम्यांतून हेच दिसत आहे. देशातील फुटबॉलमध्ये नवे काही घडवू पाहणाऱ्या इंडियन सुपर लीग या फुटबॉल स्पध्रेच्या आठ संघांची आणि मालकांची घोषणा रविवारी करण्यात आली. तत्पूर्वी गेल्या गुरुवारी मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत प्रो कबड्डी स्पध्रेसाठी अभिनेता अभिषेक बच्चन याने जयपूर संघ खरेदी केल्याचे सांगितले. गेल्या महिन्यात या कबड्डी लीगची घोषणा करण्यात आली होती. त्या कार्यक्रमाला मिहद्र अॅण्ड मिहद्रचे संचालक आनंद मिहद्र स्वत: उपस्थित होते, हे लक्षणीय आहे. या घोषणांचा साधा अर्थ हाच आहे, की या खेळांचे अर्थकारण आता क्रांतीच्या उंबरठय़ावर उभे आहे. गंमत म्हणजे यालाही कारणीभूत क्रिकेटच आहे. क्रिकेटमधील इंडियन प्रीमिअर लीग या स्पध्रेने त्या खेळात अंतर्बाह्य बदल घडवून आणला. त्यात क्रिकेटचे किती भले झाले यावर क्रीडातज्ज्ञांनी खल करावा. क्रिकेटच्या खेळाडूंची मात्र त्याने चांगलीच धन केली. भारतात क्रिकेटपटू हे देव असतात आणि संपत्ती किती यावरच देवांचेही लहानमोठेपण ठरण्याचा आजचा काळ! अर्थात, आयपीएलचे यश नेत्रदीपक होते. खासकरून जाहिरातदारांसाठी. त्यामुळेच आता ते संरूप अन्य खेळांमध्येही वापरण्यात येत आहे. याची सुरुवात २००८ मध्ये फुटबॉलच्या आय-लीग स्पध्रेने झाली. राष्ट्रीय फुटबॉल लीगचेच हे नवे रूप. त्या स्पध्रेलाही बऱ्यापकी यश मिळाले. त्यानंतर चार वर्षांनी पश्चिम बंगालमध्ये प्रीमिअर लीग सॉकरची मांडणी झाली. आज वर्ल्ड सीरिज हॉकी, इंडियन रेसिलग लीग, इंडियन बॉिक्सग लीग, इंडियन बास्केटबॉल लीग, आय-वन सुपर कार सीरिज अशा विविध लीग स्पर्धा भारतीय क्रीडा-बाजारात आहेत. प्रो-कबड्डी ही त्यातील नवी भर. तसा दोन वर्षांपूर्वी कबड्डीमध्येही लीग संरूप आणण्याचा प्रयत्न झाला होता. हैदराबादमध्ये ती स्पर्धा झाली होती. पण एकंदरीतच कबड्डीच्या स्पर्धा म्हणजे पंजाबी लग्नासारख्या. मोठय़ा झोकात आणि धूमधडाक्यात ते विवाह होतात. पण अखेर तो कौटुंबिकच सोहळा. कबड्डी स्पर्धाचीही तीच गत होती. प्रो-कबड्डीमुळे त्यातही बदल होतील अशी अपेक्षा आहे. हे बदल होताना खेळांनाही बदलावे लागणार आहे. लीग संरूप हे पूर्णत: बाजारकेंद्रित आहे. या बाजाराचे काही कायदे असतात. ते खेळांना पाळावे लागतील. जाहिरातदारांच्या सोयीसाठी खेळाच्या वेळांपासून नियमांपर्यंत बदल करावे लागतील. कबड्डीलाही ते करावे लागेल. कारण साधे आहे. १९२३ मध्ये कबड्डीचे नियम रचले, तेव्हा चित्रवाणी वाहिन्या नव्हत्या. खेळात उद्योगांचा पसा येतो तो काही क्रीडाप्रेमातून नव्हे. किंबहुना हे प्रायोजक कबड्डीसारख्या खेळांकडे वळत आहेत, तेही क्रीडाप्रेमातून नव्हे. ते इकडे वळले, कारण क्रिकेट हा प्रचंड महागडा खेळ झाला आहे. क्रिकेटपटूंच्या किमती गगनाला भिडल्या आहेत, पण गुन्हेगारीमुळे खेळाची विश्वासार्हता लयाला चालली आहे. दुसरीकडे सानिया मिर्झा, सायना नेहवाल अशा खेळाडूंच्या यशामुळे टेनिस, बॅडिमटन यांबाबतचे आकर्षण वाढले आहे. कबड्डीला तर लोकप्रियता आहेच. अशा खेळांमध्ये तुलनेने कमी पसा गुंतवावा लागेल. शिवाय ते आपापल्या ब्रॅण्डच्या सशक्तीकरणास लाभदायक ठरेल, हा साधा स्वार्थ यात आहे. आता या निमित्ताने का होईना, पण क्रिकेटपटूंप्रमाणेच अन्य खेळाडूंवरही धनवर्षां होत असेल, तर ते चांगलेच आहे. त्याचे स्वागत असो.
संग्रहित लेख, दिनांक 15th Apr 2014 रोजी प्रकाशित
नवा डाव, नव्या स्पर्धा!
भारतीय समाजाप्रमाणेच भारतीय क्रीडाविश्वातही विशिष्ट प्रकारची वर्गव्यवस्था आहे. क्रिकेट हा तेथील वरिष्ठ खेळ. त्याभोवती सगळे लोकप्रियतेचे वलय.
First published on: 15-04-2014 at 12:44 IST
मराठीतील सर्व अन्वयार्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After ipl celebrities corporates want to have a ball at indian super league