नवे दशक सुरू होत असताना, नव्या दशकात आपण जुन्यातले काय नेणार आहोत यावर आपली प्रगती, अधोगती वा स्थितिजता यांचा निर्णय होईल..

इतिहासात रमणारे वर्तमानातील दैनावस्थेसाठी परकीयांना जबाबदार धरतात. काही प्रमाणात ते योग्यही. पण हा पलायनवाद झाला. त्यामुळे युक्तिवाद जिंकता येईल. पण वर्तमानावर मात करता येणार नाही आणि भविष्यालाही आकार देता येणार नाही..

वर्ष संपत येताना अनेकांच्या प्रतिमेस बहर येतो. सरत्या वर्षांने काय दिले, याची यादी करण्यात हे ‘प्रतिभावंत’ स्वत:स ‘झोकून’ देतात. या वर्षांतील सर्वात संस्मरणीय घटना, सर्वाधिक लोकप्रिय व्यक्ती, नायक, खलनायक, गाजलेला नवा पदार्थ वा सर्वात लोकप्रिय पेय.. अशा अनेक गहन प्रश्नांची उत्तरे शोधली वा तयार केली जातात. यंदा या सर्व प्रश्नमंजूषेत एका प्रश्नाच्या उत्तरात मात्र या सर्व प्रतिभावंतांचे अजिबात दुमत नाही. यंदाचे सर्वात लोकप्रिय पेय कोणते, हा तो प्रश्न आणि ‘काढा’ हे त्याचे सर्वमान्य उत्तर.

एरवी नाक दाबून प्यायचे, तयार करणाऱ्याने ज्यांच्यासाठी ते केले आहे त्यांच्या मागे भुणभुण लावून पाजायचे असे हे पेय सरत्या वर्षांत अनेकांना हवेहवेसे ठरले. करोना नामक विषाणू या भूतलावर प्रकटला नसता तर हातास लागेल ते उकळून बनवल्या जाणाऱ्या या पेयास इतके महत्त्व आलेले पाहायला मिळाले नसते. ही या वर्षांची देणगी. काढा हे पेय अपौरुषेय आहे आणि अ-गणित आहे. अपौरुषेय म्हणजे अनेक चित्रविचित्र काढय़ांना नक्की जन्म कोणी दिला हे अद्याप माहीत नाही आणि अ-गणित म्हणजे या काढा प्राशनाचे नेमके फायदे काय हे काही मोजून दाखवता येत नाही. असा हा काढा हा या सरत्या वर्षांचे प्रतीक!

त्यास पुष्टी देणाऱ्या दोन बातम्या या वर्षांच्या शेवटी झळकल्या. यातील एक बातमी स्वत:स करोना झाला असावा या भीतीने पाणी पीत राहणाऱ्या एका व्यक्तीची. धरण असो वा पोट. मर्यादेपेक्षा जलसाठा वाढला की तो वाहणारच. हे सत्य विसरून हा सद्गृहस्थ इतके पाणी प्यायला, की त्याच्या शरीरातील क्षारादी जीवनावश्यक घटक त्यामुळे वाहून गेले आणि तो मूच्र्छा येऊन कोसळला. वेळीच उपचार मिळाल्याने जीव वाचला. पण कसाबसा. दुसरी बातमीही याच संदर्भातील आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे डॉ. बलराम भार्गव यांचे विधान. अवैज्ञानिक, अशास्त्रीय आणि अप्रमाणित उपचार पद्धतींमुळे करोना विषाणूच्या संरचनेत मोठय़ा प्रमाणावर बदल होत असून, यामुळे तो औषधांना प्रतिसाद देईनासा होण्याचा दाट धोका आहे. डॉ. भार्गव यांचे हे विधान यायला आणि आपल्याकडेही करोनाच्या नव्या संकरावताराबाबत उपाययोजनांची चर्चा व्हायला एकच गाठ पाडली. हा योगायोग नाही.

नवे दशक सुरू होत असताना, नव्या दशकात आपण जुन्यातले काय नेणार आहोत यावर आपली प्रगती, अधोगती वा स्थितिजता यांचा निर्णय होईल. सरत्या दशकाचा इतिहास याबाबत अभिमान बाळगावा असा नाही. २००० ते २०१० या काळात आपण जे काही करू शकलो त्यापेक्षा २०१० ते २०२० हे दशक आपल्या प्रगतीवर नव्हे तर प्रगतिक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण करणारे ठरले. देश सोडून परभूमीस आपले म्हणणाऱ्यांची संख्या या दशकात विक्रमी वाढली आणि अर्थव्यवस्था तर गोठूनच गेली. यामागील कारणे काहीही असतील. त्याची चर्चा करणे हा उद्देश नाही आणि या दशकाच्या शवविच्छेदनाने फार काही हातीही लागेल असे नाही. आणि अशा चिकित्सेसाठी लागणाऱ्या निकोप वातावरणाचाही आपल्याकडे अभाव. अमुक काही या काळात झाले नाही, असे म्हटले रे म्हटले की कोणी एक वा अनेक राजापेक्षा राजनिष्ठ ‘मग नेहरूंच्या काळात तमुक झाले नव्हते तेव्हा त्यावर गप्प का बसलात’ असे काही अतार्किक विधान करतात. यावर, इतक्या बालभारती पातळीवर उतरून चर्चा करणे शक्य आणि शहाणपणाचे नसल्याने याकडे दुर्लक्ष करणे उत्तम. म्हणून मग आजचा, १ जानेवारीचा, नव्या दशक-प्रवेशाचा मुद्दा!

राजकीय, धार्मिक अभिनिवेश दूर सारून त्याकडे पाहायला हवे. याचे कारण या दशकाने समोर आणलेले आव्हान अनेकांगांनी आपणास भिडणार आहे. पहिला मुद्दा वाढत्या तरुणांचा. आणखी जेमतेम दशकभर भारतात तरुणांची संख्या वाढती असेल असे अनेक लोकसंख्यातज्ज्ञ सांगतात. म्हणजे ‘डेमॉग्राफिक डिव्हिडंड’ हा प्रचंड वापरला गेलेला, पण प्रत्यक्षात ‘म्हणजे काय’ याबाबत गुलदस्त्यात असणारा फायदा हातचा राखण्यासाठी आपल्यासाठी हे शेवटचे दशक. त्यानंतर भारताची लोकसंख्या स्थिरावेल. कोणतेही स्थिरावणे हे वृद्धत्वनिदर्शक असते. त्यानुसार नंतरच्या कालखंडात भारतात वृद्धांची संख्या तरुणांच्या तुलनेत वाढू लागेल. म्हणजेच तरुणांसाठी जे काही करायचे असेल ते करण्याचा शुभारंभ या दशकातच व्हायला हवा. हे करणे म्हणजे केवळ त्यांना रोजगार देणे नाही. तर उद्याच्या तरुणांच्या कर्तृत्वास आव्हान ठरतील अशा आयआयटीसारख्या भव्य संस्था उभारणे, खेळात त्यांना मोठय़ा प्रमाणावर संधी उपलब्ध करून देणे, मनोरंजनाच्या क्षेत्रातल्या सर्व खिडक्यांतून हवे ते वारे अंगणात येऊ देणे आणि असे काही करून त्यांना जगण्याचे प्रयोजन या भूमीतच सापडेल अशी व्यवस्था करणे. या सगळ्या भौतिकतेच्या जोडीस फुलण्यासाठी आवश्यक असते, रवीन्द्रनाथ म्हणतात ते ‘भयशून्य चित्त जेथ’ असे वातावरण. ते निर्माण करण्याचा प्रारंभही आज सुरू होणाऱ्या दशकातच व्हायला हवा.

याच्या बरोबरीने प्रयत्न करायला हवेत ते विज्ञानवृत्ती वाढवण्याचे. मानवी मनातील कल्पिते विज्ञानाच्या आधारे प्रत्यक्षात कशी येतात हे गेल्या सहस्रकाने आपणास दाखवून दिले. त्यानंतर नव्या सहस्रकातील दोन दशकेदेखील संपली. पण आपण विज्ञानवृत्ती अंगीकारली जावी यासाठी काही प्रयत्न करताना दिसत नाही. हे खिन्न करणारे आहे. एकीकडे आपल्याकडे ‘सर्व काही होते’ असे म्हणायचे आणि दुसरीकडे साध्या साध्या गोष्टींसाठी आयातीवर अवलंबून राहायचे, हे आपण कित्येक वर्षे करीत आहोत. आपल्याकडे ‘सर्व काही होते’ असे मानणाऱ्यांचे समाधान हिरावून घेण्याचे कारण नाही. पण वर्तमानाची कोरी करकरीत भूक इतिहासातील रम्य कथांनी भागत नाही, हे मात्र आवर्जून सांगायला हवे. इतिहासात रमणारे वर्तमानातील दैनावस्थेसाठी परकीयांना जबाबदार धरतात. काही प्रमाणात ते योग्यही. पण हा पलायनवाद झाला. त्यामुळे युक्तिवाद जिंकता येईल. पण वर्तमानावर मात करता येणार नाही आणि भविष्यालाही आकार देता येणार नाही.

तात्पर्य : तुझे-माझे न करता, उणीदुणी न काढता, वैज्ञानिक वृत्ती जोपासण्याच्या महाकार्याचा शुभारंभ नाही तरी निदान तशी इच्छा तरी या दशकाच्या पहिल्या दिवसापासून आपल्या मनी रुजायला हवी. ज्यांना उद्या घडवायचा आहे त्यांना विज्ञानवादी होण्याखेरीज पर्याय नाही. विज्ञानवादी होण्यातील पहिली पायरी म्हणजे ‘काय आहे’ यापेक्षा आपल्याजवळ ‘काय नाही’ याचा विचार करणे. ‘नाही’बाबत प्रश्न पडू लागणे, ही विज्ञानवादाची सुरुवात असते. त्यातून मग हे ‘नाही’चे ‘आहे’ करण्याचा प्रयत्न सुरू होतो. विज्ञानात त्यास प्रयोग असे म्हणतात. विज्ञान सतत प्रयोग करीत असते. कारण त्यात अंतिम यश आणि अंतिम सत्य असे काही मुळी नसतेच. म्हणून विज्ञान वास्तववादी राहाते. ही फार महत्त्वाची बाब. कलाविष्कारात, विशेषत: रंगभूमीवरील सादरीकरणात वास्तववाद आणणारा लेखक म्हणजे हेन्रिक इब्सेन. त्याचे एक अप्रतिम विधान आहे : ‘सामान्यांच्या मनातील भ्रम दूर करा, त्या क्षणीच त्यांचे सुख हरपले जाईल.’ सुखभावनेचा त्याग केल्याखेरीज प्रगती होत नाही. असा त्याग करणे म्हणजेच आत्मभ्रम दूर करणे. हा भ्रम काढण्याची सुरुवात नव्या दशकात होवो, यासाठी आजच्या वर्षांरंभी शुभेच्छा!!