चिनी हालचालींमागील एक कारण असे सांगितले जाते की, गेली काही वर्षे या संपूर्ण टापूत भारताने रस्ते आणि पूलबांधणी केली. दौलत बेग ओल्डी येथे धावपट्टीही उभारली. शिवाय, डोकलाममधून आपण चीनला मागे हटविले. यानंतरही चीनची जमवाजमव रोखण्यात आपण गाफील राहिलो का?
पूर्व लडाखच्या गलवाण नदी परिसरात चीनकडून मोठय़ा प्रमाणात घुसखोरी झाल्याची कथित कबुली संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी दिल्याची बातमी येताच, तसे काही ते म्हणालेच नसल्याचा खुलासाही झाला. पण त्याहीपेक्षा मोठी बातमी कोणती? तर गेले काही दिवस या टापूत सुरू असलेल्या झटापटींबाबत चीनचे परराष्ट्रमंत्री वँग यी (तुलनेने भारतस्नेही अशी यांची प्रतिमा) रविवारी पत्रकार परिषदेत काही बोलतील अशी अपेक्षा होती; पण ते काहीच बोलले नाहीत, ही! याचा अर्थ चीन या कथित घुसखोरीला उल्लेखण्याइतपतही महत्त्व देत नाही नि आपल्याकडे मात्र चीनच्या ताठर साहसवादाविषयी चर्चा सुरू आहे. पूर्व लडाखमधील या भागात चीनने भारतीय हद्दीत केलेल्या घुसखोरीविषयी आता लेफ्टनंट जनरल या उच्च हुद्दय़ाच्या पातळीवरून चर्चा होईल ही बाब परिस्थिती नकळत पण पुरेशी चिघळल्याचे निदर्शक आहे. म्हणजे भारत व चीन यांच्यात नित्याप्रमाणे सीमांवरील ठाणेप्रमुखांची चर्चा होऊन हा प्रश्न सुटू शकत नाही हेही पुरेसे स्पष्टच आहे. त्यातही विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे, प्रत्यक्ष ताबारेषा किंवा लाइन ऑफ अॅक्च्युअल कंट्रोल (एलएसी) वरील ज्या २३ भूभागांना ‘विवाद्य म्हणून विचाराधीन’ अशी मान्यता दोन्ही बाजूंकडून मिळालेली आहे, त्यापेक्षा पूर्णपणे वेगळ्या परिसरात चीनची कांगावखोर घुसखोरी सुरू झालेली आहे. तेथून चिन्यांना बाहेर काढायचे, तर चर्चा किंवा रेटा हे दोनच पर्याय आहेत. तूर्त पहिल्या पर्यायाचा मार्ग वापरला जात आहे. त्यासंबंधीची चर्चा शनिवार, ६ जून रोजी सुरू होत आहे. परंतु कधीही न आखल्या गेलेल्या, तरीही प्रत्यक्ष ताबारेषा म्हणवल्या जाणाऱ्या विशाल टापूतील गलवाण आणि हॉट स्प्रिंग्ज या दोन भूभागांमध्ये घुसलेले चिनी सैन्य ‘प्रत्यक्ष ताबा’ सहजपणे सोडण्याची चिन्हे नाहीत. तसे झाल्यास चीनची जमवाजमव अंदाजिण्यात आणि त्यांचा हेतू जोखण्यात आपण गाफील राहिलो का, असा महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतो. त्याची दखल घेणे भाग पडते.
सुमारे महिन्यापूर्वी, ५ मे रोजी चीनने पँगाँग सरोवर भागात गरजेपेक्षा अधिक सैनिक आणून ठेवले. याशिवाय सिक्कीमजवळ नाकू ला या ठिकाणीही चिनी सैनिकांची संख्या अचानक वाढली. सहसा निर्मनुष्य मानल्या जाणाऱ्या टापूतील त्यांची वाढती वर्दळ भारताच्या नजरेतून सुटण्यासारखी नव्हतीच. चीनचे हे कृत्य वरकरणी बुचकळ्यात टाकणारे होते. कारण कोविड-१९ महासाथीचा उगम चीनमध्ये झाला, त्यातून झालेल्या वित्तहानी व मनुष्यहानीतून तो देश त्या काळात नुकताच बाहेर पडू लागलेला होता. याउलट करोना विषाणूविरोधात भारताची लढाई त्या वेळी कुठे सुरू झाली होती. चीनच्या या कृत्यामागील उलगडा होण्यासाठी आणखी एका ५ तारखेचा प्रामुख्याने विचार करावा लागेल. ती तारीख आहे ५ ऑगस्ट २०१९. त्या दिवशी भारत सरकारकडून जम्मू-काश्मीर राज्याचा विशेष दर्जा काढला गेला आणि जम्मू-काश्मीर व लडाख हे दोन स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश बनले. या कृतीमुळे पाकिस्तानला आणि काश्मीर खोऱ्यातील विभाजनवाद्यांना धडा शिकवल्याचा डिंडिम पिटला गेला असला तरी त्या राज्याचे भूराजकीय महत्त्व भारत आणि पाकिस्तानइतकेच चीनच्याही दृष्टीनेही आहे. या निर्णयावर लोकसभेत शिक्कामोर्तब करताना गृहमंत्री अमित शहा यांनी पाकव्याप्त काश्मीर आणि गिलगिट बाल्टिस्तानबरोबरच अक्साई चीनचाही उल्लेख केला होता. हे भूभाग परत मिळवण्यासाठी प्राणांची बाजी लावू हे त्यांचे भाषण. ते चीननेही गांभीर्याने घेतल्याची शक्यता दाट. कारण त्यानंतर काही महिन्यांतच चीनकडून तीन-चार भागांमध्ये घुसखोरी सुरू झाली. नाकू ला आणि पँगाँग सरोवर येथील झटापटींविषयी लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांना विचारले गेले, त्या वेळी त्यात असाधारण असे काहीच नसल्याचे ते म्हणाले होते. ते बरोबरच होते. कारण या दोन्ही देशांदरम्यान सीमेवर बंदुकीतून शेवटची गोळी १९६७ मध्ये सुटली. यानंतर वाद झाले तरी परस्परांवर बंदुका चालवायच्या नाहीत असा करारच दोघांमध्ये झाला होता. मात्र झटापटींचा फार बागुलबोवा नको म्हणणारे जनरल नरवणे, त्या विधानानंतर काही आठवडय़ाभरातच लेह येथील लष्कराच्या १४व्या कोअरच्या मुख्यालयात तातडीने गेले. ते कशासाठी? यातूनच चीनचा वावर म्हणजे ‘शतपावली’ नव्हे, हे सिद्ध झाले. चीनने निवडलेली ठिकाणे अनेक आहेत. उदा. गलवाण खोरे, हॉट स्प्रिंग्ज, पँगाँग सरोवर ते नाकू ला.. काही ठिकाणी प्रत्यक्ष ताबारेषेपासून जवळपास तीन-चार किलोमीटर आत घुसून चिनी सैनिकांनी भारतीय चौक्या, साकव उद्ध्वस्त केले आहेत. स्वत:चे तंबूही उभारले आहेत. काही बातम्यांमध्ये चिनी सैनिक शेकडय़ांत नव्हे, तर हजारांत असल्याचाही उल्लेख आहे. शिवाय गलवाण खोऱ्याच्या पश्चिमेकडील भागावर चीनने यापूर्वी कधीही दावा सांगितला नव्हता, तो ते आता सांगू लागले आहेत. चिनी हालचालींमागील एक कारण असे सांगितले जाते, की गेली काही वर्षे या संपूर्ण टापूत भारताने रस्ते आणि पूलबांधणी केली. सैन्याची चटकन हालचाल करता यावी यासाठी असे बांधकाम भारताने उभारले. उदा. जगातील सर्वाधिक उंचीवर असलेली दौलत बेग ओल्डी भागातली धावपट्टी. डोकलाम भागात भूतानसाठी रस्ते बांधणाऱ्या भारतीय सैन्याने तेथील चिनी सैन्याच्या आक्षेपांना आणि धक्काबुक्कीला कित्येक आठवडे भीक घातली नव्हती. अखेरीस चीनलाच नमते घ्यावे लागले होते.
असे असले, तरी चीनची घुसखोरी अशा प्रकारे उघडकीस येणे ही आपल्यासाठी नामुष्कीची बाब समजावी काय? या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी जरा मागे जावे लागेल. लढण्यात आपले लष्कर कोणालाही हार जाणार नाही. परंतु गस्त आणि पहाऱ्याच्या आघाडीवर आपले नाणे पुरेसे खणखणीत नाही हे वास्तव आहे. कारगिल युद्ध भारताने जिंकले खरे, पण त्या वेळी आपल्याच हद्दीत पाकिस्तानकडून झालेली जमवाजमव आपल्या लक्षात आली नव्हती हेही वास्तव आहे.
अहमदाबादमध्ये साबरमती नदीच्या किनाऱ्यावर शांतपणे झोके घेणारे चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांची प्रत्यक्षात महत्त्वाकांक्षा आसुरी आहे. याचेच प्रतिबिंब हल्ली चिनी मुत्सद्दी आणि परराष्ट्र खात्यामध्येही पडलेले दिसते. ‘वूल्फ वॉरियर’ ही एका बटबटीत चित्रपटातील चरित्रनायकावर आधारित उपाधी चिनी मुत्सद्दी, नेते स्वत:लाच लावून घेताना दिसतात. उन्मादी वर्चस्वनशा हे वूल्फ वॉरियरचे भाववैशिष्टय़. हाँगकाँगची गळचेपी, अमेरिकेविरुद्ध आक्रमक वाक् युद्ध आणि व्यापारयुद्ध, दक्षिण चीन समुद्रातील दंडेली ही लक्षणे चीनच्या वाढत्या वर्चस्वनशेची साक्ष पटवतात. भारताबरोबर वुहान-अहमदाबाद आणि दिल्ली-बीजिंग, महाबळीपुरम येथे पाहुणचार देणारे-घेणारे चिनी मुत्सद्दी वा राष्ट्रप्रमुख आणि हिमालयाच्या पाठीवर हळूहळू भारतीय भूभाग गिळंकृत करत चाललेले चिनी सैनिक हे वेगळे नाहीत, हे भारताने नीट ओळखायला हवे. चीन भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार असला, तरी भारतावर वर्चस्व गाजवण्याची आणि पाकिस्तानच्या मदतीने भारताची कोंडी करण्याची मनीषा चीनने सोडून दिल्याचे कोणतेही पुरावे नाहीत.
सध्याच्या परिस्थितीत बहुतेक प्रमुख देशांप्रमाणेच कोविड निराकरणात भारतही गुंतलेला आहे. तुलनेने चीन कोविडमुक्त झालेला दिसतो. चीनच्या साहसवादासाठी याहून चांगली संधी मिळण्यासारखी नाही, हे चीनच्याही आधी आपण ओळखायला हवे होते. प्रतिबंधात्मकतेत कमी पडल्यावर प्रतिसादाचे कौतुक कदाचित मूळ अपयश झाकण्यासाठी अधिकच उच्चारवात केले जाते हे उरी, पुलवामा घडल्यानंतरही आढळून आले आहे. आताही आपला प्रतिसाद उत्तम असेल. पण प्रतिबंधाचे महत्त्व आपण कधी ओळखणार हा प्रश्न उरतोच.