नवाब मलिक यांच्याबद्दल सहानुभूती असण्याचे वा भाजप- राष्ट्रवादी काँग्रेसच्या लढाईत आपण शिरण्याचे काहीच कारण नाही. प्रश्न उरतो दाऊदचा..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ज्यास सुमारे ३० वर्षांपूर्वीच मुसक्या बांधून आणण्याच्या घोषणा झाल्या, त्याचा वापर २०१४ नंतरही आधीप्रमाणेच होत राहातो.  दाऊद हे असे एक प्रकरण आहे जे तडीस नेण्यात कोणालाच रस नाही..

हा दाऊद इब्राहीम कासकर नामे कोणी इसम भूतलावरील सर्वशक्तिमान जीव असावा. नपेक्षा महासत्ता होऊ पाहणाऱ्या या देशाच्या राजकारणाची कार्यक्रमपत्रिका तो कशी काय ठरवता? त्या असंगाशी संग केल्याच्या वहिमावरून या भारत देशाच्या ‘सक्तवसुली संचालनालय’ या सर्वव्यापी यंत्रणेने राज्यातील महाविकास आघाडीचे मंत्री नवाब मलिक यांस तुरुंगात डांबले. राज्यातील विरोधी पक्षीय भाजपच्या कोण्या साजिंद्यास या कारवाईचा सुगावा आधीच कसा काय लागला बुवा असा प्रश्न काहींस पडलेला दिसतो. तो ज्यांस पडतो ते अगदीच बालबुद्धीचे म्हणायचे. कारण राज्यात जरी महाविकास आघाडीचे सरकार असले तरी खरे विकासवादी सरकार हे केंद्रातच आहे. त्यामुळे त्या पक्षाच्या इशाऱ्याबरहुकूम सर्व केंद्रीय यंत्रणा चालणार हे सत्य या बालबुद्धीधाऱ्यांस कळो नये हे आश्चर्यच. या यंत्रणेच्या नावातच तिची कार्यपद्धत स्वच्छ दिसत असतानाही असले प्रश्न कोणांस अजूनही पडत असतील तर सदरहू व्यक्ती या यंत्रणेच्या कचाटय़ात येणे क्रमप्राप्त ठरते. तेव्हा नवाब मलिक यांच्याविषयी सहानुभूती बाळगण्याचे काहीच कारण नाही. इतका पूर्वरंग या दाऊदाख्यानास पुरे ठरेल असे मानून आता उत्तररंगात काही महत्त्वाच्या प्रश्नांचा ऊहापोह व्हावा ही मनीषा.

यातील अत्याधिक महत्त्वाचा प्रश्न या प्रमाणे : या देशातील समस्त पुण्यश्लोकी, देशाभिमान्यांची संघटना म्हणजे भाजप हे तर अद्याप न जन्मलेले जीव देखील जाणतात. तर या भाजपने १९९३-९४ या काळात देशाच्या संरक्षणमंत्र्यांवर दाऊदच्या साथीदारांसमवेत प्रवास केल्याचा आरोप केला. आता हे देखील अनेकांस माहीत असेल की भाजप केवळ आरोप करीत नाही. रान उठवतो. त्यावेळी त्यांच्या दिमतीस समाजमाध्यमी बिनडोकी जल्पक नसतानाही भाजपने हे रान पेटवले. ज्यांच्याविरोधात हे सर्व झाले त्यांचे नाव शरद पवार आणि हे करणारा पुण्यात्मी नेता म्हणजे गोपीनाथ मुंडे. जे जे पुण्यात्मी ते ते भाजपचे हे ओघाने आलेच. आरोप असा की संरक्षणमंत्री असताना पवार यांच्या विमानातून ज्या दोन गृहस्थांनी प्रवास केला ते म्हणे दाऊदचे हस्तक होते. भाजपच्या नेत्याचा आरोप म्हणजे ते सत्यवचनच की. त्यामुळे सध्याच्या जल्पकांच्या वाडवडिलांनी मुंडे यांचे म्हणणे खरे मानले आणि पवार आणि कंपनीस शिक्षा दिली. ते बरेच झाले म्हणायचे. कारण त्यामुळे पहिल्यांदा या राज्यात पुण्यवान भाजप आणि तेव्हाच्या पुण्यवान आणि आताच्या पापी शिवसेना युतीची सत्ता आली. ‘आमची सत्ता आल्यास या दाऊदच्या मुसक्या बांधून येथे आणू’’ अशी गर्जना मुंडे यांनी केली होती. त्याप्रमाणे राज्यातच काय पण पुढे केंद्रातही भाजपची सत्ता आलीदेखील.

पण दाऊद काही भारतात आला नाही.  इतकेच नव्हे तर या आश्वासनाचे काय झाले बुवा असा प्रश्नही मुंडे यांस कोणी विचारला नाही. यातून तेव्हाच्या विद्यमान जल्पकांच्या पूर्वजांचे अस्तित्व दिसून येते. पुढे तर मुंबईप्रमाणे दिल्लीतही भाजप सत्तेवर आला. पण तरीही दाऊद यास काही हात लागला नाही. एवढेच नव्हे तर तत्कालीन पंतप्रधान जे की अटलबिहारी वाजपेयी यांनी उलट आपल्याच पक्षाच्या मुंडे यांचे नाक कापले. म्हणजे मुंबईत महालक्ष्मी अश्वशर्यती मैदानातील सोहळय़ात त्यांनी पवार यांचे गुणगान गायले. म्हणजे ज्यावर दाऊदच्या साथीदारांसमवेत सफर केल्याचा आरोप भाजपच्या राज्यस्तरीय नेत्याने केला त्याचा सत्कार भाजपच्या राष्ट्रीय नेत्याने केला. कदाचित वाजपेयी हे भाजपच्या विद्यमान नेतृत्वाइतके देशाभिमानी नसल्यामुळे असे झाले असावे. ‘‘७० वर्षांत देशांत काहीच घडले नाही’’ या विधानाचा अर्थच मुळी हा आहे. त्यामुळे वाजपेयी यांची पंतप्रधानपदाची प्रदीर्घ कारकीर्दही अनुल्लेखनीयच. पण हे सत्य मान्य केल्यास शिंचा नवीनच प्रश्न सामोरा येतो. तो म्हणजे २०१४ नंतरच्या भारताचा. त्यानंतर या देशास खरे स्वातंत्र्य मिळाले आणि देशाभिमानी सरकार सत्तेवर आले. पण या सरकारचा म्होरक्याही पवारशरण कसा, हा तो प्रश्न. ज्या दाऊदच्या साथीदारांचा हात धरल्याचा आरोप पवारांवर झाला त्या पवारांचे बोट धरून आपण राजकारणात आलो, असे वक्तव्य साक्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्याचे स्मरते. अशा कारणांसाठी स्मरणशक्ती हा शाप हे मान्य.

.. हे असे प्रश्न विचारणे हा त्यावरील उ:शाप ! यातून निर्माण होणारा प्रश्न असा की त्या वेळी पवारांवर आरोप करणारे मुंडे, पवार यांचे कवतिक करणारे मोदी या दोन्ही भिन्न व्यक्ती असल्या तरी त्यांचा पक्ष एकच. भाजप. तेव्हा या दोहोंनी नाही तरी निदान भाजपने तरी या पैकी नक्की सत्य काय हे सांगण्याचे कष्ट घ्यायला हवेत. मोदी हे असत्य असणे अशक्य. म्हणजे त्या असत्याचे पाप मुंडे यांच्या माथी मारले जाणार हे उघड आहे. पण आज मुंडे हयात नाहीत. तेव्हा ते भाजपने स्वीकारायला हवे. पण हा प्रामाणिकपणा दाखवण्यास तो पक्ष तयार नाही. उलट एकदा उपयोगी पडलेल्या दाऊद यालाच तो पक्ष आता महाविकास आघाडी विरोधातील लढाईत पुढे करताना दिसतो. या लढाईचे जे काही करायचे ते महाविकास आघाडी बघून घेईल. त्याची उठाठेव आपणास करण्याचे काहीच कारण नाही. पण प्रश्न या लढाईचा नाही. तर दाऊद या इसमाच्या अपरिहार्यतेचा आहे. वास्तविक त्याचे बखोट धरून भारतात आणण्याची मुंडे यांची अपूर्ण अपेक्षा २०१४ नंतरच्या काळात पूर्ण करता आली असती. पण तसे काही झाल्याचे दिसत नाही. उलट प्रयत्न आहे तो या दाऊदला पुरवून पुरवून कसे वापरता येईल याचाच.

याचा अर्थ असा की राजकारणात काही आश्वासने अपूर्ण ठेवण्यातच शहाणपण असते. कारण ती पूर्ण झालीच तर पुढे काय, हा प्रश्न पडतो. दाऊद हे असे एक प्रकरण आहे जे तडीस नेण्यात कोणालाच रस नाही. कोणाला म्हणजे अर्थातच पुण्यश्लोक भाजपला. अन्य राजकीय पक्ष भाजपच्या मते दाऊदचे रक्षकच. त्यांच्याकडून या कारवाईची अपेक्षा कोण करणार? तेव्हा ते होणे नाही. पण ज्यांना ते शक्य आहे तो भाजप हे का करीत नाही, हा प्रश्न. वास्तविक पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ हे आपल्या पंतप्रधानांचे जिगरी दोस्त. त्यांच्या अभीष्टचिंतनासाठी मोदी विमान वाकडे करून गेले होते हे कोण विसरेल? तेव्हा मोदी यांनी या आपल्या दोस्ताकडे दाऊदसाठी  कधी शब्द टाकल्याचे दिसले नाही. त्या बदल्यात शरीफ यांनीही काहींच्या सुटकेची मागणी केली असती. तसेही करण्याचा अनुभव आपल्याला आहेच. (आठवा: कंदाहार विमान अपहरण प्रकरण आणि तत्कालीन भाजपप्रणीत सरकारच्या परराष्ट्रमंत्र्यांनी जातीने केलेली तालिबान्यांची पाठवणी)

अर्थात तसे झाले असते तर नवाब मलिक या यवनी नेत्यावर ठपका ठेवण्यास काही भरीव कारण शोधावे लागले असते. याचा अर्थ असा की दाऊदचे शीर सलामत राहणे हे भारतीय राजकारणाच्या अस्तित्वासाठी आवश्यक. जी ए कुलकर्णी यांच्या ‘पिंगळावेळ’मधील ‘स्वामी’चे अस्तित्व इतरांसाठी महत्त्वाचे जसे असते तसे आज दाऊद इब्राहीम कासकर बाबत झाले आहे. त्यामुळे राज्यातील विरोधक आणि केंद्रातील सत्ताधारी दाऊदचे क्षेम चाहत असतील. कारण दाऊद सलामत तो आरोप पचास हे ते जाणतात. पण तसे करणे म्हणजे एकदा विकलेला माल पुन्हा विकणे. मग त्याची किंमत पडते. आताही तेच झाले आहे. भाजपवासी आणि त्यांचे विचारशक्तिहीन पाठीराखे सोडले तर अन्य कोणी वाहून जाण्याची शक्यता नाही.

मराठीतील सर्व अग्रलेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Editorial page bjp nationalist congress party dawood ibrahim kaskar minister nawab malik prison akp
First published on: 25-02-2022 at 00:26 IST