पर्यावरणीय संहारसत्राच्या पूर्वखुणा आपल्या आसपास पावलापावलांवर आहेत. पण सर्व काही तात्कालिक परिणामकारकतेच्या नजरेतूनच पाहिल्यास त्या दिसणार तरी कशा?

अल्पकालीन अर्थार्जनवादी दृष्टिकोनामुळे दीर्घकालीन संहाराकडे पाहण्यास कोणालाच वेळ नाही. त्यामुळे दरडी कोसळणे आणि त्यात शेकडोंचे जिवंत गाडले जाणे अपरिहार्यच…

अलीकडे पावसाचे हे आक्रीतच म्हणायचे. इतकी वर्षे आनंददायक, सर्जनशीलांसाठी, पर्युत्सुक मनांसाठी प्रेरणादायी मानला गेलेला पाऊस गेली काही वर्षे संहार-साधकच होताना दिसतो. आणि निसर्ग जेव्हा फक्त विनाशाचेच व्यवधान घेऊन येतो तेव्हा तोही माणसाप्रमाणे अशक्तांसाठीच प्रथम अन्यायकारी ठरतो. गेले तीन-चार दिवस महाराष्ट्रात फाटलेल्या आभाळाचा जो नंगा नाच सुरू आहे ते पाहिल्यावर याचेच प्रत्यंतर येते. या पावसाचे अंगात आल्यासारखे कोसळणे, डोंगरदऱ्यांचे घसरणे आणि असहायांचे चिरडणे यांतून अभागींनाच लक्ष्य करणारा निसर्ग कोणा माथेफिरूचेच स्मरण घडवतो. हे सर्वच उदास करणारे असले, तरी निसर्गाच्या या वेडसरपणातही एक संदेश आहे. एखादा मदमस्त गजेंद्र ज्याप्रमाणे आपल्या बेधुंद हल्ल्यांपूर्वी आपल्या वागण्यातून सूचक संदेश देत असतो, त्याप्रमाणे निसर्गही आपल्या संहारसत्राच्या पूर्वखुणा पुरवत असतो.

त्या आपल्या आसपास पावलापावलांवर दिसतात. मुंबईकरांना त्या अनिर्बंध बांधकामांतून दिसतील. या महानगरापासून चार पावलांवर नवी मुंबईत उभ्या कापलेल्या डोंगरांच्या रूपाने पाहता येतील. पुण्याहून पुढे बेंगळूरुमहामार्गावर उजवी-डावीकडे ‘आता होते, गेले कुठे’ असे आश्चर्योद्गार निघतात अशा डोंगरांच्या सपाटीकरणात दिसतील. नाशकाच्या दिशेने एकेका तालुक्यात उभ्या राहणाऱ्या दोन-दोन डझन प्रकल्पांच्या नियोजनशून्यतेत त्या आढळतील. कोकणात पावलापावलांवर उभे राहिलेले धाबेनामक गुत्ते, मुस्कटदाबी सहन करणाऱ्या मरतुकड्या नद्या आणि अफाट वृक्षतोड या साऱ्यातून निसर्गाच्या संहारसत्राच्या पूर्वखुणाच दिसतात. अल्पसंतुष्ट नागरिक आणि विधिनिषेधशून्य व्यवस्था या दोघांचीही बुद्धी अल्पकालीन अर्थार्जनवादी झाल्याने या दीर्घकालीन संहाराकडे पाहण्यास कोणालाच वेळ नाही. त्यामुळे दरडी कोसळणे आणि त्यात शेकडोंचे जिवंत गाडले जाणे अपरिहार्यच. असे काही झाले की, माध्यमांच्या माऱ्यामुळे आपल्या संवेदना काही काळ जागृत होतात. पण त्यांचा परिणाम तेवढाच. कारण दीर्घकालीन धोरणीपणास या देशाने कधीच तिलांजली दिलेली आहे. सर्व काही तात्कालिक परिणामकारकतेच्या नजरेतूनच पाहायची सवय रक्तातच भिनलेली असल्यामुळे शंभर वर्षांनंतरच्या नागरी नियोजनाचा काही विषयच नाही. याचे यथार्थ वर्णन ‘उड्डाणपूल मानसिकता’ असे करता येईल.

म्हणजे सर्व काही स्थानिक आणि तात्कालिक. एखाद्या ठिकाणी वाहतुकीची कोंडी ही समस्या असेल, तर त्यावरील सत्वर उपाय म्हणजे उड्डाणपूल. तो उड्डाणपूल उतरल्यानंतर नवीन ठिकाणी वाहतूक कोंडी होणार. मग तेथे आणखी एक उड्डाणपूल. अशा मानसिकतेतून समस्या पुलाखाली दडवणे हे आपल्या नियोजनाचे सार आहे. म्हणूनच या एकशेतीस कोटी मनुष्यप्राण्यांस सामावून घेणाऱ्या देशात शुद्ध आखलेली शहरे, वस्त्या यांची संख्या एक डझनही नाही. काहीही न करता जे होते ती वाढ असते. पण त्यामागे नियोजन असेल तर(च) ते घडवणे असते. आपली शहरे, खेडी, वस्त्या या अशा आपोआप तयार झालेल्या आहेत आणि तेथील नागरिकांच्या रेट्यामुळे ‘वाढल्या’ आहेत. त्यांस ‘घडवण्याची’ योजकता आपल्यात नाही. म्हणून आपल्या कोणत्याही शहरात आकाशरेषा, सममिती (सिमेट्री) यांचा काही विचारच नसतो. एका इमारतीतील सज्जाच्या डोळ्यांस डोळा भिडवत समोर असते ते हाताच्या अंतरावरील इमारतीचे स्वच्छतागृह. नागरिकांत नसेल, पण इमारतींचा सलोखा इतका की, एकाच्या घरातील चर्चासंवादात दुसऱ्या इमारतीच्या बैठकीच्या खोलीतूनही सहभागी होता यावे. महाराष्ट्रापुरते बोलायचे झाल्यास डोंबिवली, नवे पुणे आदी शहरांचे उदाहरण या संदर्भात सहज देता यावे. ही सर्व ‘ब’ अथवा ‘क’ दर्जाची शहरे. बकालीकरणाबाबत त्यांचा प्रवास सध्या सुसाट वेगाने ‘अ’ दर्जाच्या शहरांतील धारावी आदी प्रभागांच्या दिशेनेच सुरू आहे. सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, चिपळूण, महाड अशी किती उदाहरणे द्यावीत? एके काळी कोणाचे आजोळ, माहेर अथवा हवापालटाची स्थळे म्हणून गणली गेलेली ही आपली रम्य शहरे आज संकटग्रस्त वस्त्या होऊ लागली आहेत. देशात सर्वाधिक धरणे असलेल्या या प्रदेशातील कृष्णा, वेण्णा, उल्हास, गोदावरी, वाशिष्ठी अशा इतकी वर्षे कनवाळू आजी/ मावशीप्रमाणे भासणाऱ्या या आपल्या नद्या अचानक क्रूरकर्मी कैदाशिणी ठरू लागल्या आहेत.

यामागे नि:संशय हवामान बदलाचा हात आहे, हे मान्यच. म्हणून या साऱ्यासाठी केवळ सरकार वा यंत्रणेस जबाबदार धरणे योग्य नाही. मायदेशातील या नैसर्गिक आपत्ती आणि सरकारी असहायता याविषयी भाष्य करताना त्यामुळे, ‘‘युरोपात काय घडले, ते दिसत नाही काय’’ असा सात्त्विक संतापी प्रश्न अनेकांच्या मनी उमटणे शक्य आहे. पण ‘‘युरोपात जे घडले त्यातून उलट नियोजनाचाच मुद्दा अधोरेखित होतो,’’ हे त्यावरील उत्तर. जर्मनी, ऑस्ट्रिया, बेल्जियम, अमेरिकी खंडातील कॅनडा आदी अनेक देशांवर सध्या निसर्गाची अवकृपा दिसून येते. तथापि, या अवकृपेने त्या देशांसमोर उद्भवलेली परिस्थिती आणि आपले भोग यांची तुलना होऊ शकत नाही. याचे कारण असे की, संपन्न-सुस्थितांवर आणि विपन्न-अस्थिरतांवर येणारी संकटे जरी एकच असली तरी त्याचे होणारे परिणाम अत्यंत विभिन्न असतात. नवकोटनारायण आणि दरिद्रीनारायण अशा दोघांचे एकाच इयत्तेतील चिरंजीव अनुत्तीर्ण झाले असता दोघांवर होणारे परिणाम ज्याप्रमाणे भिन्न असतात, त्याप्रमाणे कोकण आणि कॅलिफोर्निया या दोन्ही प्रांतांस निसर्गाच्या एकाच अवकृपेस तोंड द्यावे लागले तरी त्यानंतरचे परिणाम दोघांसाठी वेगळे असतात. हा फरक लक्षात घ्यायला हवा. वादविवादात ‘निसर्ग सर्वांस समान असतो’, ‘तो संपन्न आणि विपन्न यांत भेद करीत नाही’ अशी टाळ्याखाऊ वाक्ये फेकणे वेगळे. पण प्रत्यक्षातील सत्य हे की, निसर्गदेखील माणसाप्रमाणेच भेदाभेद पाळत असतो.

कारण विकसित आणि अविकसित यांचे निसर्गास सामोरे जाणे समान नसते. म्हणून निसर्गाचे विकसित आणि अविकसित यांच्याशी वागणेही असमान असते. विकसितांच्या विकसिततेत निसर्गाचा योग्य तो आदर राखण्याचा प्रयत्न असतो, तर अविकसित आपल्या अविकसिततेचे भांडवल करून निसर्गाची अक्षम्य हेळसांड करतो. गरिबी हे त्यामागील कारण असल्याचे सांगितले जाते. ते शंभर टक्के चूक. जगातील अत्यंत निसर्गसंपन्न देश हे दरिद्री आहेत. पण त्याच वेळी अत्यंत श्रीमंत देशांना आपल्या निसर्गाची श्रीमंतीही अबाधित राखता आली आहे. स्वित्झर्लंड, ऑस्ट्रिया, अमेरिका, जर्मनी, इटली अशी किती उदाहरणे द्यावीत? हे सर्व देश श्रीमंत झाले, कारण त्यांनी आपल्या देशातील नैसर्गिक संपत्तीची योग्य ती बूज राखली म्हणून. याचा अर्थ असा की, आम्ही गरीब आहोत म्हणून निसर्गाची आबाळ होते हे धादांत असत्य. उलट, निसर्गाची आबाळ करतो म्हणून आम्ही गरीब आहोत हे कटू सत्य. नागरिकांपासून सर्व संबंधितांनी ते मान्य करायला हवे.

हे जितक्या लवकर आपण मान्य करू तितक्या अधिक सक्षमतेने आपण नैसर्गिक संकटास सामोरे जाऊ. बदलत्या निसर्गासाठी, बदलत्या पर्यावरणासाठी नुसते त्यास बोल लावणे पुरेसे नाही. माणूस बदलत असताना निसर्गाने पूर्वीसारखे निरागस राहावे ही अपेक्षाच व्यर्थ. निसर्गाशी आपले वर्तन अभद्र होणार, पण तरी निसर्गाने आपल्याशी वागताना मात्र भद्रच राहावे, हे होणे नाही. हे अजूनही आपण लक्षात घेत नाही. म्हणून अलीकडे पाऊस हा आनंदापेक्षा वेदनांची बरसात करतो. मानवी वर्तनाचे कडवे भाष्यकार फैज अहमद फैज म्हणतात त्याप्रमाणे ‘आए कुछ अब्र (ढग)… इसके बाद आए जो अजाब (संकटे, वेदना) आए’ हे अलीकडे वारंवार होते.