आणखी किती दिवस मोक्याच्या सामन्यांमध्ये भारतीय क्रिकेट संघ विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली पराभूत होत राहणार, याची चर्चा होणे आवश्यक…
पराभूत झाल्यानंतर काहींचा हिशेब मांडावा लागणार असेल, तर त्या यादीमध्ये स्वत: कर्णधार विराट कोहली का नाही? उत्तरादायित्व स्वीकारण्याचा प्रामाणिकपणा तो कधी दाखवेल का?
जून महिन्याचे महत्त्व भारतीय क्रिकेटच्या इतिहासात मोठे. जवळपास नऊ दशकांपूर्वी, २५ जून रोजी भारतीय क्रिकेट संघ पहिल्यांदा कसोटी खेळण्यासाठी मैदानात उतरला. आणि ३८ वर्षांपूर्वी याच दिवशी या खेळात आपण पहिल्यांदा जगज्जेतेपद पटकावले. हे दोन्ही सामने झाले इंग्लंडमध्ये. क्रिकेट हा ‘ब्रिटिशांनी शोधून काढलेला भारतीय खेळ’ असे गमतीने म्हटले जाते. तो समज खऱ्या अर्थाने फुलू लागला, कपिलदेव यांच्या जिगरबाज सहकाऱ्यांनी अनपेक्षितरीत्या विश्वचषक जिंकून आणला त्या दिवसापासून. याच महिन्यात, त्याच इंग्लंडमध्ये परवा २३ तारखेला आणखी एक टप्पा सुवर्णाक्षरांत रेखाटण्याची संधी भारताला चालून आली होती. १४४ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच कसोटी जगज्जेतेपदाचा सामना खेळवला गेला. आपण अंतिम फेरीपर्यंत धडकलो आणि न्यूझीलंडशी पराभूत झालो. दोन्ही संघ तुल्यबळ होते, त्यामुळे त्या पराभवाचा विषाद वाटण्याचे कोणतेच कारण नाही. शिवाय अलीकडे आपल्याविरुद्ध ज्या संघांनी जिंकलेले येथील क्रिकेटवेड्यांना मानवते, त्या छोट्या यादीत न्यूझीलंड अग्रस्थानावर! सहसा कोणत्याही राजकारणात अध्यात-मध्यात न पडणारा हा शांतताप्रेमी देश. क्रिकेटमध्ये वलयांकित संघांमध्ये त्यांचे नाव घेतले जात नाही किंवा वलयांकित खेळाडू घडवण्याची या संघाला फार मोठी परंपरा नाही. कदाचित त्यामुळेच यंदा त्यांच्यावर दडपण नव्हते किंवा एरवीही नसते. गेल्या सलग दोन विश्वचषक स्पर्धांमध्ये अंतिम फेरी गाठून उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले, तरी कामगिरीतील सातत्य दिसत होतेच. तेव्हा कधीतरी एखादे महत्त्वाचे विजेतेपद ते पटकावणार याचा अंदाज होता. परवा साउदॅम्प्टनमध्ये पावसाचा व्यत्यय येऊनही त्यांच्या संघाची – विशेषत: कर्णधार केन विल्यम्सनची – एकाग्रता आणि आत्मविश्वास ढळला नाही. शेवटच्या दिवशीच्या शेवटच्या सत्रात त्यांनी विजय मिळवला. केन विल्यम्सनचा अव्यक्त निर्धार त्याच्या दोन्ही डावांतील फलंदाजीतून ठायीठायी दिसला. मैदानावर किंवा मैदानाबाहेर त्याच्यापेक्षा कैक पटींनी अधिक वलयांकित आणि आसक्तव्यक्त असलेला विराट कोहली शेवटच्या दिवशी मात्र फिका पडला. हे का घडले आणि आणखी किती दिवस मोक्याच्या सामन्यांमध्ये आपण विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली पराभूत होत राहणार, याची चर्चा होणे आवश्यक आहे. कारण जगातील सर्वात प्रसिद्ध क्रिकेट संघाचा सर्वाधिक यशस्वी फलंदाज म्हणून कौतुक करवून घेताना, त्याच्या आधिपत्याखाली गुणवानांच्या संघाची पाटी अजिंक्यपदाच्या बाबतीत सातत्याने रिकामी का राहते, याविषयी उपस्थित होणाऱ्या प्रश्नांची उत्तरे विराटला द्यावीच लागतील.
सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये विराटने वारंवार इच्छाशक्तीविषयी (इंटेन्ट) विधाने केली. फलंदाज म्हणून त्याचे कर्तृत्व वादातीत आहे. भविष्यात सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडण्याचा मान विराटच पटकावणार असे ठासून सांगितले जाते. आपल्या विक्रमकेंद्री, व्यक्तिपूजक मानसिकतेला हे साजेसेच. पण विराटने संघाच्या बांधणीविषयी विधाने केली, जी सूचक आहेत. त्याच्या विधानांचा मथितार्थ हा की, संघातील काही सदस्यांना नारळ द्यावा लागेल. न्यूझीलंडच्या कर्णधाराने जशी कामगिरी केली, तशी भारतीय कर्णधाराला का करून दाखवता आली नाही याविषयी त्याने किंवा प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी वाच्यता केली नाही. आता पराभूत झाल्यानंतर काहींचा हिशेब मांडावा लागणार असेल, तर त्या यादीमध्ये स्वत: विराट का नाही? २०१३ मध्ये इंग्लंडमध्येच आयसीसी चॅम्पियन्स करंडक स्पर्धा जिंकल्यानंतर भारताला महत्त्वाच्या स्पर्धांमध्ये जेतेपद पटकावता आलेले नाही. २०१७ च्या चॅम्पियन्स करंडक स्पर्धेपासून विराट भारताचा कर्णधार होता. मग २०१९ मधील विश्वचषक आणि आता कसोटी जगज्जेतेपद. या तिन्ही सामन्यांमध्ये एक फलंदाज म्हणूनही विराट अपयशी ठरला हे लक्षणीय आहे. फलंदाज म्हणून कर्णधाराने अपयशी ठरणे हे क्रिकेटमध्ये नवीन नाही. महेंद्रसिंग धोनी फलंदाज म्हणून प्रत्येक स्पर्धेत यशस्वी ठरलेला नसला, तरी त्याने तीन महत्त्वाच्या स्पर्धांमध्ये भारताला विजय मिळवून दिलेला आहे. एक फलंदाज म्हणून अजिंक्य रहाणेची कामगिरी अलीकडे ढेपाळल्यागत झालेली असली, तरी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या नुकत्याच झालेल्या कसोटी मालिकेत, विराटच्या अनुपस्थितीत आणि अनेक नवोदितांच्या साह््याने त्याने अद्भुत विजय मिळवून दाखवला होताच. धोनी किंवा अजिंक्यला जे जमते ते विराटला का जमत नाही? आणि हे सुरू असेल तर उत्तरदायित्व स्वीकारण्याचा प्रामाणिकपणा तो कधी दाखवेल का?
ती शक्यता अतिशय धूसर. कारण विराट कोहलीसारख्या व्यक्ती स्वतङ्मकडे तटस्थ नजरेतून पाहू शकत नाहीत आणि स्वतङ्मला वगळून इतर परिस्थिती वा परिप्रेक्ष्याचा विचारही करू शकत नाहीत. तीक्ष्ण बुद्धिमत्तेच्या आणि विलक्षण गुणवत्ता लाभलेल्या विराट कोहलीकडून नेतृत्वाबाबत क्षुल्लक वाटणाऱ्या चुका कशा घडू शकतात, याचा विचार विश्लेषक भले करोत; पण त्याला किंवा त्याच्या भक्तीत आकंठ बुडालेल्यांना (यात क्रिकेट प्रशासक, कॉर्पोरेट पुरस्कर्ते असे सगळेच आले) याविषयी विचार करण्याची फुरसत नसते. विश्वचषकासारख्या महत्त्वाच्या स्पर्धेत चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी कोण जाणार हा प्रश्न अनुत्तरित कसा राहतो, कसोटी जगज्जेतेपदाचा सामना इंग्लिश पावसाळी हवामानात होत असताना संघात दोन फिरकी गोलंदाज खेळवण्यात कोणते शहाणपण होते वगैरे प्रश्न विचारायचेही नाहीत किंवा त्यांची उत्तरे शोधायची नाहीत. आम्ही ठरवले, आम्ही केले… पण ते संघहितासाठी किंवा देशहितासाठीच ना, असा बिनतोड प्रश्न विचारल्यावर उत्तर काय द्यायचे नि कोणी?
विराटपेक्षा संघनायक म्हणून अधिक कल्पकता दाखवलेले नि म्हणूनच यशस्वी ठरलेले अनेक आहेत. त्यांच्याकडे नेतृत्व येण्याची शक्यता नाही. कारण तसे खुद्द विराट कोहलीला वाटणार नाही. पण क्रिकेटमधील चलन हे निव्वळ आविर्भाव, अभिनिवेश किंवा आकडेवारीवर ठरत नाही. ते रोकड्या निकालांवर ठरते. म्हणूनच परवाची कसोटी धरून सलग तीन कसोटी सामन्यांमध्ये आणि विश्वचषकाच्या उपान्त्य सामन्यात भारताची त्रेधा उडवणाऱ्या न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सन हा खरा विजेता आहे. तो वलयांकित आहे की नाही, याची फिकीर भारतीयांनी करायची. त्याच्या संस्कृतीत सांघिक कामगिरीला स्थान आहे, वलयाला नाही. मैदानावरील कॅमेरे आणि स्क्रीन विल्यम्सनचे हावभाव टिपत नाहीत. कारण तो व्यक्तच होत नाही. उलट विराट कोहलीची उपस्थिती म्हणजे कॅमेऱ्यांना पर्वणी असते. कॅमेरा भारतीय खेळाडूंवर नव्हे, विराटवर रोखलेले असतात. त्याचा फूत्कार, हुंकार वा नेत्रमुद्रा हे कदाचित अधिक लक्षवेधी ठरत असतीलही. पण त्यांच्या जोरावर भारताला मोक्याच्या सामन्यांमध्ये तरी जिंकता येत नाही, हे एव्हाना विराटसकट बहुतांच्या लक्षात आले असेलही. परंतु या टप्प्यावर विराटचे नाममुद्रामूल्य (ब्रँड व्हॅल्यू) ‘अतिविराट’ झालेले असल्यामुळे त्याच्या कामगिरीची चिकित्सा करणे हे अनेकांच्या दृष्टीने गैरसोयीचे ठरते. विराटऐवजी कोण, या प्रश्नाचे उत्तर शोधण्याच्या भाबड्या प्रतीक्षेत राहणाऱ्यांना ही मेख लक्षात येत नाही. विराटसारख्यांचे व्यक्तिमत्त्व त्यामुळेच त्यांच्या कर्तृत्वापेक्षा अधिक मोठे राहून जाते!