मानवी लोभ, लालसेच्या पलीकडची जिज्ञासा म्हणजे काय, हे ‘इव्हेन्ट होरायझन’ प्रयोगातून कृष्णविवराच्या आकारशोधाने सिद्ध केले.

अविश्वास आणि विश्वास यांचा सहप्रवास विज्ञानाच्या क्षेत्रात जितका दिसतो, तितका अन्य कोठे दिसेल? कदाचित कवितेत. तत्त्वज्ञान आणि अध्यात्माच्या सीमारेषा जेथे पुसट झाल्या, अशा काव्यामध्ये तर खासच. सावळ्या, कानडय़ा विठ्ठलाच्या कांतीचे ‘दिव्य तेज झळकती, रत्नकीळ फांकती प्रभा’ असे वर्णन करणारे ज्ञानेश्वर ‘दृष्टिचा डोळा पाहू गेले तंव, भीतरि पालटु झाला’ यासारख्या ओळीतून विश्वास-अविश्वासाचा हा संबंध परमावधीला नेतात. तर ‘सृष्टि से पहले सत नहीं था, असत भी नहीं था’ हे वसंत देव यांनी केलेले नासदीय सूक्ताचे – म्हणजे ऋ ग्वेदाच्या दहाव्या मंडलातल्या १२९ व्या ऋ चेचे- केलेले हिंदी रूपांतरही भारतीयांना वेदकाळापासून माहीत असलेल्या याच अविश्वास-विश्वासाच्या द्वंद्वाला अनुवादातून न्याय देते. या नासदीय सूक्ताच्या साऱ्या ऋ चांचे पहिले पठण झाल्यानंतर वेदकालीन माणसांना ज्ञानप्राप्तीचा जितका आनंद झाला असेल, तितकाच १० एप्रिल रोजी जगभरच्या खगोलशास्त्रज्ञांनाही झाला असणार. केवळ खगोलशास्त्रच का? जे एरवी स्वत:ला सामान्य माणूस म्हणवत बऱ्याच गोष्टींपासून दूर राहतात, त्यांनाही आनंदच व्हावा अशी बातमी परवाच्या १० एप्रिल रोजी आली. ज्याबद्दल आजवर केवळ ऐकले आणि कल्पना केली, त्या कृष्णविवराचे पहिले छायाचित्र प्रसृत झाल्याचा हा आनंद जगभर पसरू लागला. व्हॉट्सअ‍ॅपद्वारे ती प्रतिमा एकमेकांना पाठवण्यापासून ते कृष्णविवर म्हणजे काय याची आपल्याला समजणाऱ्या भाषेतील माहिती देणारी संकेतस्थळे धुंडाळण्यापर्यंत, आजच्या माहिती-तंत्रज्ञानयुगात जे जे शक्य, ते सारे करण्यापर्यंत कृष्णविवराच्या प्रतिमेविषयीची जिज्ञासा जगभरच्या कोटय़वधी माणसांना घेऊन गेली.

कृष्णविवराच्या प्रतिमेचे स्वागतच. पण तितकेच स्वागत करायला हवे, ते या जिज्ञासेचे. ती आजची नव्हे. सृष्टीच्या, अंतराळाच्या आधी काय होते याची वेदकालीन जिज्ञासा असो की ‘दृष्टीचा डोळा’ पाहू जाणाऱ्या ज्ञानेश्वरांची असो. अनेक आधुनिक तत्त्वज्ञांची, कवींची असो की शास्त्रज्ञांची, संशोधकांची असो. अविश्वास म्हणजे तिरस्कार नव्हे, हे ज्यांना उमगते ते सारे जिज्ञासू. या जिज्ञासेतून प्रश्न येतात. आयझ्ॉक न्यूटनच्या गुरुत्वभेदी त्वरण अर्थात एस्केप व्हेलॉसिटी या संकल्पनेची फेरतपासणी करून अल्बर्ट आइनस्टाइनने १९१५ साली सापेक्षतावादाचा पहिला सिद्धान्त मांडला. त्याआधी कृष्णविवराच्या अस्तित्वाबद्दल केवळ अंदाज बांधले गेले होते, त्याला या सापेक्षतावादामुळे आधार मिळाला. पण सापेक्षतावादाचे आणि पुंजभौतिकीचे सिद्धान्त पोथीबद्ध न राहता त्यावर वैज्ञानिकांनी काम सुरू केले. स्टीफन हॉकिंगने ते आणखी पुढे नेले. या सिद्धान्तांच्या पडताळ्यासाठी विविध शंका घेतल्या गेल्या. या वाढत्या जिज्ञासेचे एक फलित म्हणजे एकविसाव्या शतकात, विश्वाविषयीच्या दोन प्रमुख सिद्धान्तांची तपासणी प्रत्यक्ष प्रयोगातूनच करण्यासाठी जगभरचे शास्त्रज्ञ एकत्र आले.

यापैकी पहिला सिद्धान्त महाविस्फोटातून विश्व-निर्मितीचा. दुसरा कृष्णविवराचा. महाविस्फोटाची पडताळणी ‘सर्न’ प्रयोगशाळेच्या ‘देवकण’ किंवा ‘गॉड पार्टिकल’ प्रयोगाने स्वित्र्झलडमधून केली. कृष्णविवराचा आकार नेमका कसा, हे मापण्याचा प्रयोग मात्र जगभरच्या आठ ठिकाणांहून झाला. कृष्णविवर एकाच दुर्बिणीतून निरखायचे, तर ती दुर्बीण पृथ्वीच्या व्यासाएवढी मोठी असावी लागली असती. त्याऐवजी आठ दुर्बिणींचे अष्टावधान कामी आले. संगणकीय नियतरीती – अल्गोरिदम- वापरून या प्रतिमेचे खंड जोडण्याच्या कामाला गती मिळाली. त्यातून जी प्रतिमा तयार झाली, तिचे अनावरण करताना ‘या प्रयोगाला कोणीही नायक नाही’ असे आवर्जून सांगण्यात आले. नायकत्ववादाची बाधा विज्ञानाला कधी होतच नसते असे नव्हे. पण पार पलीकडचे काही पाहायचे, अशक्य ते शक्य करायचे तर नायक नसलेलाच बरा हे सामान्यज्ञान आहे आणि इतर अनेक क्षेत्रांप्रमाणे विज्ञानातही ते स्वीकारले जाते इतकाच याचा अर्थ. तेव्हा श्रेयापेक्षा या साऱ्यांना तसेच आणखीही अनेकांना आता यापुढे काय करायचे याची आस लागली आहे, हे महत्त्वाचे. कृष्णविवराची प्रतिमा टिपण्याच्या ‘इव्हेन्ट होरायझन’ या प्रयोगामधूनच आणखी किमान एका कृष्णविवराचीही प्रतिमा मिळणार आहे. पण पहिल्या यशाइतके कौतुक दुसऱ्या खेपेस होणारही नाही. ते साहजिकच. तरीही आणखी काही कृष्णविवरे शोधणे, त्यांच्या एकाच आकाराच्या प्रतिमेवर समाधान न मानता ठरावीक कालावधीने किंवा प्रसंगी दुर्बिणींचे स्थान बदलून कृष्णविवरांच्या आकारांतील फरक टिपणे, अशी ही शोधयात्रा सुरू राहील. काय मिळेल त्यातून? मानवी लालसेसाठी विज्ञानाचा केवढा वापर होतो हे आपण पाहतो आहोतच. तसे कृष्णविवराबद्दल कसे काय होणार? चंद्रावरून खनिजे आणावीत किंवा चंद्रासह जमल्यास मंगळावरही वस्तीच करावी, यासारख्या लोभी कल्पनांचा स्पर्शदेखील होऊ शकणार नाही, इतकी ही कृष्णविवरे दूर आहेत. मग काय करायचे या संशोधनाचे?

सिद्धान्त आणि त्यांची खातरजमा, यांविषयी हे प्रश्न नेहमीच उपस्थित केले जातात. कृष्णविवरावरील संशोधनासाठी किमान १०९.३८ कोटी रुपये खर्च झाले आहेत. तेही कुणा एका देशाची मान उंचावल्याविनाच. सामाजिक शास्त्रे किंवा मानव्यविद्यांमधील संशोधनास कमी महत्त्व मिळते तेही मान उंचावण्याचे खर्चाशी गुणोत्तर पाहूनच. तरीही ‘इव्हेन्ट होरायझन’ प्रयोग झाला, याचे श्रेय मानवी जिज्ञासेलाच द्यायला हवे. कृष्णविवर हे तेजाने पुंजाळलेले असल्यामुळे त्याच्या आकाराबाबत ‘समोरा की पाठीमोरा, नकळे नकळे’ अशीच अवस्था असते. गुरुत्वाकर्षण इतके की, प्रकाशसुद्धा बाहेर पडू शकत नाही आणि दिसतो तो अंधारच. मग कृष्णविवराची, काळ्या कढईत मधूनच प्रकाशमान झालेल्या मेदूवडय़ासारखी जी प्रतिमा ‘इव्हेन्ट होरायझन’ने टिपली, ती कशी झाली? तर कृष्णविवराच्या हलत्या तेजपुंजांच्या कडेकडेने गुरुत्वाकर्षण थोडे कमी, म्हणून तिथे थोडासा प्रकाश दिसू शकतो. हा प्रकाशाचा सोहळा किंवा ‘इव्हेन्ट’ क्षणिक आणि तो जेथे दिसणे शक्य झाले ती कडा किंवा ते क्षितिजसुद्धा क्षणिकच. पण ‘इव्हेन्ट होरायझन’च्या प्रयोगातून प्रकाशाइतकाच अंधारही टिपला गेला आहे. ‘प्रकाशाचा शोध म्हणजेच अंधाराचाही शोध,’ हे ऐकताना कुणाला जॉर्ज ऑर्वेलच्या १९८४ या कादंबरीतील ‘युद्ध म्हणजेच शांतता’ या वचनासारखे वाटेल; पण युद्ध-शांततेचे मानवी लोभ-लिप्ताळे आणि विश्वात सूर्यापासून साडेसहाशे कोटी पटीने मोठे असलेल्या, मात्र साडेपाच कोटी प्रकाशवर्षे दूर असल्यामुळे न दिसणाऱ्या ‘एम- ८७’ आकाशगंगेतील कृष्णविवराच्या शोधामागची आस यांची तुलनाच होऊ शकत नाही. मानवी लोभ, लालसेच्या पलीकडची जिज्ञासा म्हणजे काय, हे या कृष्णविवराच्या आकारशोधाने सिद्ध केले आहे.

अविश्वासाचे पंख झेपावून पुन्हा नव्या विश्वासावर विसावणारी ही जिज्ञासा अंधारालाही आपलेच मानते. प्रकाश बरा, अंधार नको- अशा भुक्कड समजांच्या पलीकडे जाते. अंधाराची आभा पाहायची, तर पलीकडे जायलाच हवे.