हा केवळ काही टक्के सजीवांचा किंवा परिसंस्थांचा प्रश्न नाही. हा मानवी भविष्याचा प्रश्न आहे..
वर्ल्ड-वाइडफंड फॉर नेचर (डब्ल्यूडब्ल्यूएफ) अर्थात जागतिक वन्यजीव निधीतर्फे नुकताच प्रसृत झालेला ‘लिव्हिंग प्लॅनेट’ अहवाल हा मानवी प्रगतीची, क्रियाशीलतेची किंमत आसमंतातील प्राणिमात्रांना किती भयानक प्रकारे चुकवावी लागत आहे, यावर प्रकाशझोत टाकणारा आहे. या अहवालानुसार, १९७० ते २०१४ या काळात जगातील एकूण पृष्ठवंशीय प्राण्यांपैकी सरासरी ६० टक्के नष्ट झाले आहेत. यात मासे, पक्षी, उभयचर, सरपटणारे, सस्तन अशा सर्व घटकांचा समावेश आहे. गोडय़ा पाण्यातील जवळपास ८० टक्के जीवन संपुष्टात आले आहे. औद्योगिकीकरण, भांडवलीकरण, आर्थिक प्रगती अशा विविध नावांनी ओळखल्या जाणाऱ्या मानवी क्रियाशीलतेचा सर्वाधिक फटका लॅटिन अमेरिका खंडाला बसला असून, तेथील जवळपास ९० टक्के वन्यजीवन संपुष्टात आल्याची धक्कादायक माहिती हा १४८ पानी अहवाल पुरवतो. वास्तविक पृथ्वीवर एकपेशीय जीव उदयाला आल्यापासून किमान पाचेक वेळा तरी पृथ्वीने उत्क्रांती ते विलोपन अशी महाचक्रे अनुभवली आहेत. पृथ्वीतलावरून एखादी प्रजाती नष्ट होणे यात असामान्य असे काहीच नाही. किंबहुना, विलोपन हा चार्ल्स डार्विन यांच्या उत्क्रांतिवादाच्या अभ्यासाचा गाभा होता. काही प्रजाती विलुप्त का होतात नि काही उत्क्रांत कशा होत जातात याविषयीच्या सखोल अभ्यासातून सजीवांच्या अनुकूलनाचा (सव्र्हायवल ऑफ द फिटेस्ट) सिद्धान्त त्यांनी मांडला. डायनोसॉरसारख्या महाकाय आणि सर्वव्यापी प्रजातीही विविध कारणांस्तव नष्ट झालेल्या आहेत. मानवाचीही त्याच दिशेने वाटचाल सुरू असल्याचे काही विश्लेषकांना वाटते. पण मुद्दा हा नाहीच. आजवरच्या विलोपनांबद्दल पारिस्थितिक घटकांना जबाबदार धरण्यात आले होते. ताज्या अहवालानुसार मात्र, या सर्व प्रजातींच्या विनाशासाठी एक आणि एकच प्रजाती कारणीभूत आहे आणि ती म्हणजे मानव! मानवी अतिक्रमणांमुळे वन्यजीवांचे नैसर्गिक अधिवास आक्रसत आहेत याविषयीच्या बातम्या तशा नित्याच्या झाल्या आहेत. पण मानवाच्या प्रगतीपायी इतक्या अल्प कालावधीत केवळच सजीवच नव्हे, तर पारिस्थितिक संस्थाच नामशेष होऊ लागल्याची जाणीव इतक्या भयानक पद्धतीने पूर्वी कधीही झाली नव्हती.
खरोखरच आपण मानव इतके विध्वंसक, बेफिकीर आहोत? वन्यजीव निधीच्या मुख्याधिकारी तान्या स्टील यांच्याच परखड शब्दांत मांडायचे झाल्यास, आपण पृथ्वी नष्ट करीत आहोत हे पूर्णपणे माहीत झालेली पहिलीच पिढी असू, पण आपण अशी शेवटची पिढी आहोत, जी याबाबत काही तरी करू शकेल! हा केवळ काही टक्के सजीवांचा किंवा परिसंस्थांचा प्रश्न नाही. हा मानवी भविष्याचा प्रश्न आहे. उदा. समुद्रातील माशांच्या पोटात मोठय़ा संख्येने प्लास्टिकचे अंश आढळू लागले आहेत, जे माशांसाठीच नव्हे, तर ते खाणाऱ्या मानवासाठीही घातक ठरू शकतात. आज जगातील जवळपास ४०० कोटी लोकांचा मासे हा प्रमुख पोषणस्रोत आहे. जगातील जवळपास एकतृतीयांश पिकांचे परागण पक्षी आणि प्राण्यांद्वारे होते. आफ्रिका आणि लॅटिन अमेरिकेत परिसंस्था नष्ट होऊ लागल्या आहेत. या खंडांना दुष्काळ आणि टंचाई सर्वाधिक सतावत आहे हा योगायोग नाही. शेती नष्ट झाल्यामुळेच मध्य अमेरिकेतून निर्वासितांचे लोंढे अमेरिकेत येऊ लागले आहेत. ‘लिव्हिंग प्लॅनेट’ अहवालानुसार, अधाशी मानवी उपभोग हा परिसंस्थांच्या विध्वंसाच्या मुळाशी आहेत.
आता आणखी एका अहवालाकडे वळू. जागतिक आरोग्य संघटनेच्या एका अहवालानुसार, वायू प्रदूषणामुळे भारतात पाच वर्षांखालील एक लाखांहून अधिक मुले २०१६ मध्ये मरण पावली! जवळपास २० लाख लोक भारतात दरवर्षी या कारणामुळे मरण पावतात. वायू प्रदूषणामुळे दरवर्षी होणाऱ्या एकूण मृत्यूंच्या हे प्रमाण २५ टक्के इतके आहे. प्रदूषित हवेमध्ये मोठय़ा प्रमाणावर घातक रासायनिक अंश असतात आणि त्यामुळे मेंदूच्या विकासावरही परिणाम होतो, याकडे या अहवालात लक्ष वेधले गेले आहे. दिल्लीत कित्येकदा न्यायालयांना जुन्या वाहनांवर बंदी घालण्यासाठी आदेश काढावे लागतात. फटाक्यांच्या वापरावर र्निबध आणावे लागतात. तरीही त्यातून अपेक्षित परिणाम साधला जात नाही. आता तर मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, ओदिशा राज्यांतील काही शहरांमध्ये दिल्लीप्रमाणेच घातक वायू प्रदूषण आढळू लागले आहे. तरीही फटाक्यांच्या वापरावर र्निबध आम्हाला आमच्या संस्कृतीमधील हस्तक्षेप वाटतो. मुंबईसारख्या वनजमिनी विरळ असलेल्या शहरात मेट्रोच्या कारशेडसाठी काहीशे झाडांची कत्तल आम्ही स्वीकारतो. याचे कारण आमची प्रगती, आमची संस्कृती, आमचे उद्योग, आमची वाहने, आमचा प्लास्टिकवापर, ध्वनिप्रदूषक डीजेंवर आमचे थिरकणे हे आम्ही गृहीत धरलेले असते. त्यातून आमचे नुकसान होत असेल, तर ते तात्कालिक असते. बाकीच्या पिढय़ांची आम्हाला फिकीर नाही. बाकीच्या समुदायांची आम्हाला फिकीर नाही. जमिनींची, वनांची, वन्यजीवांची, जलचरांची, पक्ष्यांची आम्हाला फिकीर नाही. विकास हवा आहे, विकास होतो आहे. प्रदूषण काय नित्याचेच, प्राणी-पक्षी काय जगतात, मरतात. त्यात काय इतकेसे? जंगलातून गेलेल्या विजेच्या तारांच्या संपर्कात येऊन किंवा रेल्वेगाडीखाली येऊन हत्ती मरतात. आणखी कुठल्या जंगलात एखादी वाघीण असते, तिलाही आम्हाला नरभक्षक ठरवून मारायचे असते. अहवाल काय येतात, जातात. त्यांना किती महत्त्व द्यायचे? शिवाय पुन्हा पाश्चिमात्य देशांनी पर्यावरणाचा विनाश करीतच प्रगती साधली, आता आम्हाला कशाला शहाजोगपणा शिकवतात?.. या निबरपणापायीच आमच्या पायाखालची सरकत चाललेली जमीन आम्हाला दिसत नाही.
‘लिव्हिंग प्लॅनेट’ किंवा आरोग्य संघटनेचा अहवाल हा विविध मानवी समूहांचे अपयश आणि त्यांच्या जाणिवांच्या अभावावर बोट ठेवतो. मानवी समूह म्हणजे सरकार, कंपन्या, समाज, समुदाय, देश, राष्ट्रसमूह, राष्ट्रसंघटना, स्वयंसेवी संघटना. केवळ जीडीपीच्या टक्केवारीच्या चष्म्यातून सर्व गोष्टींकडे पाहणाऱ्या हल्लीच्या पिढीसाठीही काही उद्बोधक आकडेवारी वन्यजीव निधीने मांडलेली आहे. जगातील सगळ्या परिसंस्थांमुळे होणारा आर्थिक फायदा अंदाजे १२५ हजार अब्ज डॉलर इतका आहे, म्हणजे तो जागतिक जीडीपीपेक्षा अंशत: कमी आहे. पण यात गोम अशी, की हा फायदा ‘दर्शनीय’ नाही. जागतिक तापमानवाढ, जल प्रदूषण, वायू प्रदूषण, वन्यजीव आणि जंगलांचा ऱ्हास, अवर्षण, टंचाई, दुष्काळ या सगळ्या आपत्ती सर्वस्वी मानवनिर्मित आहेत. त्यातून होणारे नुकसान आपण रोजच्या रोज पाहात आहोत. या समस्यांचे निराकरण हीदेखील मानवाचीच जबाबदारी आहे. पॅरिस करारातून बाहेर पडणाऱ्या राष्ट्रप्रमुखांपासून ते दिवाळीत हट्टाने प्रदूषक फटाके उडवणाऱ्यांपर्यंत सारे एकाच माळेचे मणी असून मानवतेचे शत्रू आहेत. यातील शोकान्तिका अशी, की असे अहवाल जोवर येत नाहीत आणि त्यातून थरारक काही आकडेवारी प्रसृत होत नाही, तोवर त्याविषयी विचार करण्याची आमची तयारी नसते. जागतिक तापमानवाढ कशामुळे होते आणि त्यासाठी काय केले पाहिजे यासाठी वरचेवर परिषदा होतात. त्या त्या वेळी करार होतात. पण या करारांतून बाहेर पडण्यातच विशेष प्रगत देशांना रस असतो. क्योटो, रिओ ते पॅरिस असे हे अपयश आणि नैराश्याचे चक्र आहे. एक वेळ अण्वस्त्र किंवा क्षेपणास्त्र प्रसारबंदी, व्यापार करार, दहशतवादविरोधी लढा अशा कारणांसाठीच्या जागतिक परिषदा निष्फळ ठरल्या तरी जितके नुकसान होणार नाही, तितके नुकसान पर्यावरण आणि परिसंस्थांच्या बाबतीत आपली उदासीनता आणि आपल्या दिशाहीनतेतून केल्या जाणाऱ्या डोळेझाकीमुळे होणार आहे.