कल्पित वादळेही खरी वाटण्याची वेळ येते, याचे कारण माध्यम-समाजमाध्यमांच्या काळात नेतृत्व करणाऱ्यांच्या सक्रिय अस्तित्वाची पोकळी..

धक्कादायक वा विपरीत करावयाचे असते तेव्हा ती कृती जनमानसास पटावी यासाठी एक कथानक उभे करावे लागते. ते करण्याचा प्रयत्न शरद पवार यांचा नक्कीच नव्हता. राहिले भाजपकडून राज्यसभा सदस्य झालेले नारायण राणे आणि काँग्रेसच्या ५२ लोकसभा सदस्यांपैकी एक राहुल गांधी..

माध्यमे आणि समाजमाध्यमे यांनी बौद्धिक आणि सामाजिक पैस व्यापलेला असताना समाजाचे नेतृत्व करणाऱ्यांना मौनराग आळवण्याचा अधिकार नाही. हे भान जेव्हा सुटते तेव्हा नुकतेच झाले तसे पेल्यातील वादळ तयार होते आणि आभास हेच वास्तव मानायच्या काळात या कल्पित वादळास तोंड कसे द्यावे याचे बेत आखले जातात. हे सर्व संदर्भ अलीकडेच माध्यमांनी माध्यमांतून माध्यमांसाठी गाजवलेल्या महाराष्ट्रातील कथित राजकीय वादळास लागू पडतात. याचा परिणाम असा की, मुंबईपासून दिल्लीपर्यंत आणि उद्योगपतींपासून बेरोजगारांपर्यंत सर्वानाच महाराष्ट्रात राजकीय अस्थिरता निर्माण झाल्याचा, राष्ट्रपती राजवट लागू होणार असल्याचा, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांचे संबंध पूर्ण फाटल्याचा साक्षात्कार होऊ लागला. या कथित वादळाच्या पोकळतेचा आणि विफलतेचा अंदाज असल्याने ‘लोकसत्ता’ने त्यावर काहीही भाष्य केले नाही. आता तो अंदाज खरा ठरल्याचे स्पष्ट झाल्याने जे घडले त्याची झाडाझडती आवश्यक ठरते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतल्याने या वादळात हवा भरली जाऊ लागली, असे दिसते. काही माध्यमवीरांनी त्याचा अर्थ राष्ट्रवादी विद्यमान राज्य सरकारचा पाठिंबा काढणार असा घेतला. पवार यांच्या राजकारणाचा थोडा तरी अभ्यास सोडा, पण अंदाज असलेली व्यक्ती असा निष्कर्ष काढणार नाही. असे म्हणण्यामागील कारणे अनेक. एक म्हणजे राष्ट्रवादीने या क्षणी राज्य सरकारचा पाठिंबा काढावा असे काहीही घडलेले नाही. त्यांना जे हवे होते ते मिळाले आहे. ते तसे मिळाले नाही तर काय होऊ शकते, हे त्यांच्यातील एकाने दाखवून दिलेले आहेच. त्यामुळे कालचाच खेळ लगेच आज पुन्हा होईल, असे मानण्याचे कारण नाही. दुसरा मुद्दा असा की, राष्ट्रवादीस सरकार जर पाडायचेच असेल तर त्या पक्षाच्या अध्यक्षांकडून असे डोक्यात राख घातल्यासारखे कृत्य होण्याची काहीही शक्यता नाही. पवार हे या ‘राज्य पातळी’वरील कृत्यात स्वत:स अडकवून घेणे अगदीच अशक्य. ते त्यांच्या राष्ट्रीय प्रतिमेस बाधा आणणारे ठरेल. याचाही विचार उतावळ्या राजकीय भाष्यकारांनी केला नाही. असे काही धक्कादायक वा विपरीत करावयाचे असते तेव्हा ती कृती जनमानसास पटावी यासाठी एक कथानक उभे करावे लागते. त्याअभावी केलेली कृती ही अजित पवार यांच्याप्रमाणे होते आणि मग माघार घ्यावी लागते. हे असे कथानकच तयार न करता थेट सार सांगणे पवार यांच्याकडून होण्याची सुतराम शक्यता नाही. त्यांनी असले शेखचिल्ली राजकारण केल्याचा इतिहास नाही. आताही तसे होणार नव्हते.

पण पवार यांच्या राज्यपालभेटीमुळे वृत्तमानस व्यापले जाणार याचा अंदाज आल्यानंतर भाजपने आपले कोरेकरकरीत नारायण राणे यांना राजभवनात सोडले. राणे सध्या मूळ भाजपवासीयांपेक्षाही अधिक भाजपवादी आहेत. सूर्यापेक्षा वाळूचाच चटका अधिक बसतो, तसे हे. स्वत:ची अवस्था ही अशी करून घेण्यास राणे हेच खुद्द जबाबदार आहेत. त्यामुळे त्यांना आता भाजप सोडेल त्या पारंबीस धरून तरंगावे लागेल. म्हणून ते तातडीने राजभवनात गेले आणि बाहेर आल्यावर राष्ट्रपती राजवटीची मागणी करते झाले. राणे हे भाजपच्या पाठिंब्यावर झालेले राज्यसभा सदस्य आहेत आणि त्यांच्या नेतृत्वगुणांचे कवतिक देवेंद्र फडणवीस यांच्यापासून अनेकांनी करून झाले आहे. त्यामुळे त्यांनी घेतलेली भूमिका ही भाजपचीच आहे असा सोयीस्कर वृत्तसमज माध्यमांनी करून घेतला आणि त्यात राजकीय आनंद असल्याने भाजपनेही तो होऊ दिला. वास्तविक महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट हवी ही भाजपची अधिकृत मागणी असती तर ती करण्याचा मोठेपणा राणे यांना मिळताच ना. हे राणे यांना लक्षात न येणे हे त्यांच्या ‘माझे सर्वच बरोबर’ या मानसिकतेत असणे साहजिकच. पण माध्यमांनाही तो आला नसेल तर तेही आश्चर्यच. कदाचित करोनाकाळाचे धावते समालोचन करून कंटाळलेल्या माध्यमांना राणे यांच्या कृतीने रुचिपालटाचा आनंद झालाही असेल. पण या सत्याचा अंदाज सर्वसामान्यांस नसल्याने त्यांचा या सगळ्यावर विश्वास बसला असणे शक्य आहे. राष्ट्रपती राजवट भाजपला हवी असती तर ती मागणी आणि तसे प्रयत्न देवेंद्र फडणवीस यांनी केले असते. राणे यांना हे श्रेय भाजपकडून मिळण्याची काहीही शक्यता नाही. याचा विचार ना राणे यांनी केला, ना त्यांच्या विधानावर वृत्तमानस रंगवणाऱ्यांना तो करावासा वाटला. यापुढे असे काही करताना राणे यांनी विचार करावा. नपेक्षा ते भाजपचे दिग्विजय सिंग होण्याचा धोका संभवतो. तथापि फरक असा की, सिंग यांना झटकून टाकायला काँग्रेसने दोन वर्षे घेतली. नवा भाजप इतका काळ वाया घालवणार नाही.

या मनोरंजननाटय़ास अधिक रंजक करण्याचे श्रेय काही प्रमाणात राहुल गांधी यांनाही द्यावे लागेल. त्यांनी महाराष्ट्रात आपल्या पक्षास कसे स्थान नाही याबाबत अकाली वक्तव्य केले. अलीकडच्या काळात राहुल गांधी यांना या अकाली वक्तव्यांची खोडच लागलेली दिसते. त्यांच्याही डोक्यावर दिग्विजय सिंग यांनी हात ठेवला असावा. असो. आपल्या पक्षास महाराष्ट्रात निर्णायक स्थान नाही असे त्यांना आताच वाटायचे कारण काय? आणि वाटले तरी बोलून दाखवायचे कारण काय? या सरकारातून बाहेर पडायची धमक त्यांच्या पक्षात आहे काय? तसा प्रयत्न त्यांनी केल्यास त्यांचा अर्धमेला पक्ष फुटेल. तेव्हा अशा वेळी आपण बोलून पक्षास तोंडघशी पाडू नये हेही त्यांना लक्षात आले नसेल, तर सगळाच आनंद. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी काँग्रेस संघटना उद्धव ठाकरे यांच्या सरकारच्या पाठीशी कशी ठामपणे आहे हे सांगण्याची सारवासारव राहुल गांधी यांना करावी लागली. हे सत्य त्यांना आदल्या दिवशी माहीत नव्हते काय? आणि दुसरे असे की, या सरकारच्या मागे ठामपणे उभे राहणे ही काँग्रेसची अपरिहार्यता आहे याचीही जाणीव त्यांना असायला हवी. लोकसभा निवडणुकीत प्रियंका-राहुल हे ताईदादा मुंबईत फिरकलेदेखील नव्हते. त्यामुळे पक्षाच्या राज्यातील अवस्थेबाबत काही बोलण्याचा त्यांना अधिकारच नाही. पवार यांनी राज्यात राष्ट्रवादी कडेवर राष्ट्रीय काँग्रेसला घेतले नसते तर त्या पक्षाचे अस्तित्व दिसते आहे तितकेदेखील राहिले नसते. हे कटू असले तरी सत्य आहे. आणि दुसरे असे की, राहुल गांधी हे या क्षणी काँग्रेसचे केवळ एक बावन्नांश खासदार आहेत. पक्षाध्यक्षपद त्यांनी सोडले आणि पुन्हा ते स्वीकारणार नाही, असा त्यांचा दावा आहे. तो खरा असेल तर मग हे असले भाष्य करायची मुदलात गरज काय?

या सर्व गदारोळानंतर राज्यातील सत्ताधारी पक्षास काहीएक गरज वाटली आणि तीन पक्षांनी पत्रकार परिषद घेऊन संयुक्ततेचे दर्शन त्यांना घडवावे लागले. याचे श्रेय राणे आणि त्यांच्या बोलवित्या भाजप धन्यांचे. यांच्या उद्योगाने आणि त्याच्या अक्राळ माध्यमप्रतिबिंबाने खडबडून जागे झालेल्या महाविकास आघाडीने मग आपली बाजू मांडली. ही वेळ आली याचे कारण माध्यम-समाजमाध्यमांच्या काळात नेतृत्व करणाऱ्यांच्या सक्रिय अस्तित्वाची पोकळी. आपले सरकार जे काही करीत आहे ते सांगण्याइतकी क्रियाशीलता महाविकास आघाडीने आधीच दाखवली असती तर ही वेळ आली नसती. ज्यांनी काही करावयाचे तेच जर हातातील पेल्यात आपली सक्रियता ओतत नसतील, तर पेल्यात वादळ निर्माण केले गेले याचा दोष देता येणार नाही. हा याचा धडा.