‘भ्रष्टाचार शिरोमणी’ शरद पवार विकासपुरुष कसे? राज्यात विरोध करणारे पवार दिल्लीत मवाळ कसे? अशासारख्या प्रश्नांची उत्तरे ‘राजकीय गणिता’तील त्रराशिक मांडले की मिळू लागतात..

उद्योग, वाणिज्य, कृषी आणि कृषीआधारित उद्योग आदी क्षेत्रांचे जागतिक परिमाणासह मोल जाणणाऱ्या काही मोजक्या व्यक्तींत शरद पवार यांचा समावेश अव्वल क्रमांकाने होतो. महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातीलही या आणि अशा विषयांचे आकलन पवार यांच्याइतके कोणालाही नाही, ही वस्तुस्थिती आहे. पुणे परिसरातून होणारी मोगऱ्याची निर्यात असो वा मॅक्डोनल्ड ते नेस्ले यांच्यासारख्या वैश्विक कंपन्यांना राज्यातून पुरवले जाणारे दुग्धजन्य पदार्थ असोत. त्यामागे पवार यांची दूरदृष्टी आहे. देशात स्वातंत्र्यापासून पंतप्रधानांचे म्हणून ओळखले जाणारे रायबरेली, अमेठी आदी मतदारसंघ सर्वकाळ कुपोषितच आहेत. उत्तर प्रदेशातील अन्य दरिद्री मतदारसंघांत आणि या गांधी घराण्यांच्या मतदारसंघांत तसूभरही काही फरक नाही. त्या तुलनेत बारामती आणि परिसराचा विकास हा दृष्ट लागावी असाच आहे. ही अर्थातच पवार यांची मतदारसंघास केलेली परतफेड. महाराष्ट्रात, विशेषत: प. महाराष्ट्र आणि नगर जिल्ह्य़ाचा काही भाग येथे अशी प्रगतीची बेटे आढळतात. त्या त्या परिसरातील नेत्यांनी आपापल्या मतदारसंघांच्या प्रगतीसाठी घेतलेल्या कष्टांचे प्रतििबब त्यात दिसते. अशा काही विकासबेटांतील उल्लेखनीय शहर म्हणजे बारामती. तेव्हा बारामतीची यशोगाथा ही काही महाराष्ट्रातील जनतेसाठी नवीन आणि आश्चर्य वाटावी अशी निश्चितच नाही.
आश्चर्य आहे ते भाजपला ती आता उमगू लागली याचे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यंदाच्या फेब्रुवारी महिन्यात जातीने बारामतीस पायधूळ झाडून गेले. पवार हे आपल्यासाठी किती मोठे मार्गदर्शक आहेत आणि कोणत्याही महत्त्वाच्या प्रश्नावर आपण त्यांचा सल्ला कसा घेतो, असे बारामतीच्या भूमीत मोदी म्हणाले. आता अर्थमंत्री अरुण जेटली यांची पाळी होती. बारामतीत विविध कार्यक्रमांत पवार गुणगौरव करून ते परत जाते झाले. मोदी हे बारामतीत येऊन गेले त्याही वेळी आम्ही त्याचे स्वागतच केले होते. आताही जेटली यांनी केले ते योग्यच असेच आमचे मत आहे. मोदी सरकारची कार्यपद्धती लक्षात घेता उद्याच्या बारामती दर्शन यादीत पहिले नाव अमित शहा यांचे असल्यास आश्चर्य वाटावयास नको. एकाशी बोलताना दुसऱ्याशी हातमिळवणी करून तिसऱ्यास कसा संदेश द्यावयाचा हे समजून घेण्यासाठी मी बारामतीत आलो होतो, असे शहा बारामती यात्रेनंतर म्हणणारच नाहीत असे नाही. तेव्हा सत्ताधाऱ्याने विरोधी नेत्यांशी संवाद साधण्यात आणि संधान बांधण्यात काहीही गर नाही, किंबहुना तसे करणे आवश्यकच आहे असेच आमचे मत आहे. आम्हास शंका आहे ती पंतप्रधान मोदी यांच्या आपण पवार यांच्याकडून सल्ला घेतो, या विधानाबाबत. तसा तो ते खरोखरच घेत असते तर गोमांस बंदी आणि रास्व संघ परिवारातील शेपटाकडच्या संघटनांना कसे हाताळावे यासाठी एखादा कानमंत्र पवार यांनी त्यांना निश्चितच दिला असता. मोदी यांना हे माहीतच असेल की विश्वनाथ प्रताप सिंग यांना राजकारणातला रा देखील कळत नव्हता त्या काळी १९७८ साली महाराष्ट्रात पवार यांनी संघीय आणि समाजवादी अशा दोन बाजूच्या दोन रिद्धिसिद्धींना घेऊन सरकार स्थापले होते आणि तरीही ते पुरोगामी होते आणि पवारही आहेत. तेव्हा शक्यता अशी की मोदी हे पवार यांच्याकडून ज्या विषयांचा हवा त्याच विषयांचा सल्ला घेत नसावेत. नपेक्षा त्यांची अशी अवस्था होती ना. आताही बारामतीत येऊन जेटली हे विकासाचे प्रारूप बारामतीसारखे असावे असे सांगून गेले. ते योग्यच. बारामतीसारखी अनेक शहरे देशात तयार व्हायला हवीत, हे जेटली यांचे मत तर अगदीच योग्य आहे. असे विकासकाम करणाऱ्या नेत्यास स्थानिक जनतेचा रास्त पािठबा मिळतो. पवार कुटुंबीय आणि बारामती हे त्याचेच सर्वोत्कृष्ट उदाहरण. जनता अशा विकासाभिमुख नेत्यांच्या मागे वारंवार उभी राहते आणि परिणामस्वरूप असे नेते निवडणुकांत सलग विजय मिळवीत राहतात. हे कळणे काही फार अवघड आहे असे नाही. भाजपतील जेटली वा अन्य बुद्धिमान नेत्यांसाठी तर ते तसे नाहीच नाही. तरीही याच बारामतीत दस्तुरखुद्द मोदी यांनी नागरिकांना गतसाली पवार यांचे वेठबिगार ठरवले होते. पवार यांच्या तावडीतून बारामतीची सुटका करावी असे आवाहन याच मोदी यांनी नागरिकांना केले होते, याचे स्मरण या प्रसंगी करून देणे अनुचित ठरणार नाही. तेव्हा प्रश्न असा की बारामती ही पवार कुटुंबीयांची बटीक आहे ही भूमिका खरी की पवार यांच्यामुळे बारामतीचा चौरस विकास झाला, हे विधान खरे? सामान्यज्ञान असे सांगते की ही दोन्ही विधाने एकाच वेळी खरी असू शकत नाहीत. भाजपच्या वकिली चाणक्यांचे चातुर्य लक्षात घेता ही दोन्ही विधाने खरी आहेत असे ते सांगू शकतात. परंतु प्रश्न हा वकिली बुद्धिमत्ताधारकांचा नाही. तो सर्वसामान्य विचारी जनांचा आहे. तेव्हा त्यांच्यासाठी भाजपने यातील एक काय ते खरे असे जाहीर करावे. दुसरे असे की निवडणुकीपर्यंत नरेंद्र मोदी यांच्या मते शरद पवार हे भ्रष्टाचार शिरोमणी होते. परंतु नंतर मात्र ते अचानक विकासपुरुष बनले. हे कसे? याचेही स्पष्टीकरण कधी तरी आपणास द्यावे लागेल, याचा विचार भाजपने करावा. तसे न झाल्यास मनमोहन सिंग सरकारच्या काळात सोनिया आणि कंपू गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मागे हात धुऊन लागलेले असताना पवार यांनी काँग्रेसला मोदींवर कारवाई करण्यापासून रोखले आणि त्या कृतज्ञतेपोटीच मोदी सरकारसाठी बारामती हे तीर्थक्षेत्र झाले ही वदंता विश्वासार्ह आणि ताíकक वाटू शकेल. ती तशी नसेल तर राज्यात विरोध आणि दिल्लीत तुझ्या गळा माझ्या गळा.. याची संगती कशी लावणार? याचा अर्थ इतकाच की भाजप नेत्यांना अलीकडे वारंवार बारामती प्रेमाची जी उबळ येऊ लागली आहे तिच्यामागील कारणे वेगळी आहेत.
आणि त्यातील अत्यंत महत्त्वाचे म्हणजे काँग्रेसविरोध. शत्रूच्या शत्रूस आपला मित्र करावा या तत्त्वानुसार भाजप आणि राष्ट्रवादी यांचे हे प्रणयाराधन सुरू आहे. ही सारी आगामी राजकारणाची गरज. मोदी आणि कंपनीस २०१९ सालोत्तर सत्तेवर राहावयाचे असेल तर नवनव्या भिडूंची निवड त्यांना आताच सुरू करावी लागणार आहे. गत निवडणुकांत भाजपस उत्तर प्रदेशातील ८० पकी ७२ जागांवरील विजयाने आधार दिला. ते आता होणारे नाही. तेव्हा त्यास अन्य मोठय़ा राज्यांच्या पािठब्याची गरज आहे. तसे पर्याय दोनच. एक बिहार आणि दुसरा महाराष्ट्र. यातील बिहार हा पूर्णपणे भाजप हाती नाही. राहता राहिला महाराष्ट्र. या राज्यातील ४८ पकी जास्तीत जास्त जागा पदरात पाडावयाच्या असतील तर जास्तीत जास्त ठिकाणी काँग्रेस पराभूत होणे गरजेचे आहे. त्यासाठी थोरल्या पवार यांच्याइतकी अधिकारी व्यक्ती दुसरी नाही. खेरीज, काँग्रेसला खालून छाटत नेणे पवार यांच्या राष्ट्रवादी धोरणांसाठीही आवश्यक ठरते. तेव्हा अशा तऱ्हेने यात उभयतांचे हित गुंतलेले आहे. त्यात त्यांना फावेल अशी स्थिती म्हणजे मेंदूआळसाने ग्रस्त काँग्रेसजन हे कळून घेण्याच्या शारीरिक आणि बौद्धिक अवस्थेत नाहीत. पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारखा एखादा सोडला तर अन्य कोणा काँग्रेस जनांना हे कळण्याची कुवत नाही. परंतु पृथ्वीराज यांना कळूनही तसा काहीच उपयोग नाही. कारण ते राजकीय पातळीवर पायाखालून पंगू आहेत. राहून राहिली शिवसेना. भाजप नेत्यांच्या बारामती भेटीमागे शिवसेनेला इशारा देण्याचा हेतू आहे, असे काही पत्रपंडितांना वाटते. त्यामागे बावळटपणाखेरीज अन्य काही नाही. कारण भाजप आणि/वा राष्ट्रवादी यांना धरून राहण्याखेरीज सेनेस पर्याय नाही. तेव्हा सेनेची फिकीर अर्थातच या दोन्ही पक्षांना नाही.
भाजपच्या ताज्या बारामती प्रेमामागे आहे ते हे राजकारण. सत्ताधाऱ्यांची मती सध्या बारामतीभोवती का रुंजी घालते, ते त्यावरून कळावे.