सुविख्यात अभिनेता शाहरूख खान याने देशातील वाढत्या असहिष्णुतेबद्दल वक्तव्य केल्यामुळेच त्याला ऐन दिवाळीत सक्तवसुली संचालनालयाच्या कारवाईला सामोरे जावे लागले असा आरोप काँग्रेसने केला आहे. शाहरूख खान याला सक्तवसुली संचालनालयाची (ईडी) नोटीस आल्यानेच त्याने असहिष्णुतेबाबत वक्तव्य केले हा भाजपच्या बोलभांड खासदार मीनाक्षी लेखी यांचा आरोप जेवढा अर्धवटपणाचा होता तेवढाच काँग्रेसचा हा आरोप मूर्खपणाचा आहे. लेखी म्हणतात त्याप्रमाणे नोटीस येताच शाहरूखला देशातील वातावरण एकदम असहिष्णू वाटू लागले हे खरे मानल्यास त्याच न्यायाने शाहरूख तसे बोलला म्हणून ऐन सणाच्या दिवशी त्याचा मानसिक छळ करण्यात आला हा काँग्रेसचा तर्क खरा मानावा लागेल. वस्तुत: हे सगळेच राजकीय वायबार आहेत. त्याकडे दुर्लक्ष करणेच योग्य ठरले असते, परंतु अशा राजकारणामुळे वाढत्या असहिष्णुतेचा वाद भरकटण्याची शक्यता असल्याने त्याची दखल घेणे आवश्यक आहे. शाहरूखची ज्या प्रकरणावरून ईडीने चौकशी केली ते २००८-०९ मधील आहे. नाइट रायडर्स स्पोर्ट्स ही मॉरिशसमधील नोंदणीकृत कंपनी असून, तिची मालकी शाहरूखची रेड चिली कंपनी आणि अभिनेत्री जुही चावला व तिचा पती जय मेहता यांच्याकडे आहे. २००८-०९ मध्ये शाहरूखने या कंपनीचे काही समभाग आपल्याच भागीदाराला स्वस्तात विकले. एक समभाग ७० ते ८६ रुपयांना विकायला हवा होता, तो त्याने जय मेहताच्या सी आयलंड इन्व्हेस्टमेन्ट या कंपनीला दहा रुपयांना विकला. या गरप्रकाराच्या चौकशीसाठी ईडीने गेल्या मे महिन्यात शाहरूखला समन्स पाठविले होते. तेव्हा तो उपस्थित न राहिल्याने ऑक्टोबरमध्ये पुन्हा समन्स पाठविण्यात आले. त्यानुसार तो हजर झाला. काँग्रेसचे म्हणणे असे की त्याला मुद्दामहून दिवाळीच्या दिवशी बोलावण्यात आले. असाच प्रकार हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री वीरभद्रसिंह यांच्याबाबतीतही घडला होता. भ्रष्टाचाराच्या आरोपांप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने त्यांच्या घरावर छापा टाकला, तो नेमका त्यांच्या मुलीच्या विवाहाच्या दिवशी. हा सूड उगविण्याचा प्रकार असून, सीबीआय आणि ईडीसारख्या संस्थांचा त्यासाठी वापर करण्यात येत असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते रणजीत सुरजेवाल यांनी केला आहे. ज्या काँग्रेसने आपल्या विरोधकांना नमण्यासाठी यापूर्वी अनेकदा सीबीआयचा वापर केला त्यांनीच वर नाक करून असे बोलावे हेच हास्यास्पद आहे. दुसरी गोष्ट म्हणजे एखाद्या व्यक्तीवर गुन्ह्य़ाचा आरोप किंवा संशय असेल तर सणसुदी पाहून त्याची चौकशी करावी असे काँग्रेसला वाटते काय? शाहरूखवर आíथक गरव्यवहाराचा आरोप आहे. त्याला यापूर्वी पाचारण करण्यात आले होते. तेव्हा तो गेला नाही. तेव्हा आता दिवाळीच्या दिवशी त्याला बोलावण्यात आले तर त्यात कटकारस्थान मानण्याचे काहीही कारण नाही. यापूर्वीही इतरांच्या बाबतीत अशा घटना घडल्या आहेत. २००४ मध्ये कांचीचे शंकराचार्य जयेंद्र सरस्वती यांना एका मंदिराच्या व्यवस्थापकाच्या हत्येप्रकरणी ऐन दिवाळीत जयललिता सरकारने अटक केली होती. त्या वेळी मुद्दामहून दिवाळीत अटक झाली म्हणून ओरडणारा भाजप आज नेमका तशाच आरोपांचा धनी होत आहे. तेव्हा भाजपचे ओरडणे जेवढे चूक होते, तेवढेच आज काँग्रेसचे चूक आहे. त्याने गाय मारली म्हणून आपण वासरू मारण्याचा हा प्रकार आहे. त्यातून सारेच हास्यास्पद ठरतात हे काँग्रेसने आता तरी लक्षात घ्यायला हवे.
संग्रहित लेख, दिनांक 16th Nov 2015 रोजी प्रकाशित
हास्यास्पद आरोप
असहिष्णुतेबद्दल वक्तव्य केल्यामुळेच त्याला ऐन दिवाळीत सक्तवसुली संचालनालयाच्या कारवाईला सामोरे जावे लागले असा आरोप काँग्रेसने केला आहे.
Written by रत्नाकर पवार

First published on: 16-11-2015 at 02:04 IST
मराठीतील सर्व अन्वयार्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Allegation on shahrukh