ब्रिटिश राजपुत्र हॅरी आणि त्याची पत्नी मेगन मार्कल यांनी राजघराण्याचा त्याग करण्याविषयी घेतलेला निर्णय बराचसा अपेक्षित होता. हे जोडपे असा काही निर्णय घेईल, हे सर्वप्रथम गेल्या वर्षी एका मुलाखतीअंती स्पष्ट झाले होते. गेल्या वर्षी हॅरी आणि मेगन दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर होते, त्या वेळी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मेगन म्हणाली होती की, निव्वळ दिवस ढकलत राहण्यात काहीच गंमत नसते. तुम्हाला भोवतालचा आनंद लुटता आला पाहिजे. ब्रिटिश शिष्टाचार पाळण्याचा मी खूप मनापासून प्रयत्न केला. पण त्यापायी होणारे नुकसान अपरिमित आहे! ब्रिटनच्या विद्यमान सम्राज्ञी एलिझाबेथ दुसऱ्या, त्यांचा ज्येष्ठ मुलगा राजपुत्र चार्ल्स, चार्ल्स यांचा ज्येष्ठ मुलगा राजपुत्र विल्यम, राजपुत्र विल्यमचा मोठा मुलगा सहा वर्षांचा राजपुत्र जॉर्ज असे ब्रिटिश सिंहासनाचे मानकरी ओळीने ठरलेले आहेत. राजपुत्र विल्यमचा धाकटा भाऊ राजपुत्र हॅरी याला बहुधा तहहयात राजघराण्यातच काहीशा दुय्यम भूमिकेतच वावरावे लागणार होते. बकिंगहॅम किंवा तत्सम राजप्रासादासारख्या बंदिस्त सोनेरी पिंजऱ्याचे शिष्टाचारी कोरडे जीवन हॅरीसारख्या महत्त्वाकांक्षी तरुणाला मानवणार नव्हते, याचेही पुरावे गेले काही महिने मिळू लागले होते. हॅरी आणि विल्यम यांच्यात फार सख्य राहिले नव्हते. तशात हॅरीची पत्नी मेगन हिच्या मिश्रवर्णी असण्याचे विशेष उल्लेख ब्रिटनमधील टॅब्लॉइड वृत्तपत्रे बिनदिक्कतपणे करू लागली होती. राजघराण्यामध्ये मिश्रवर्णी चालतील का, असा प्रश्न उपस्थित करण्यापर्यंत काहींची मजल गेली होती. मेगन हिची आई आफ्रिकन अमेरिकन आहे. याविषयी ‘द सन’सारख्या टॅब्लॉइड दैनिकांनी नको इतका पाठपुरावा केला, ज्यामुळे हॅरी संतप्त झाला होता. ‘माझ्या आईप्रमाणेच (युवराज्ञी डायना) माझ्या पत्नीचेही जीवन ही मंडळी उद्ध्वस्त करू पाहात आहेत,’ असे त्याने एकदा उद्वेगाने म्हटले होते. स्वत:चे भविष्य आणि स्वत:ला हवा तसा अवकाश घडवण्याचे स्वातंत्र्य हे विशेषत: ‘मिलेनियल’ म्हणवल्या जाणाऱ्या नवीन पिढीचे वैशिष्टय़ आहे. या आकांक्षेला राजघराण्याच्या चौकटीत बंदिस्त करण्यास हॅरी आणि मेगन हे दोघेही तयार नव्हते. म्हणायला हे पती-पत्नी म्हणजे डय़ूक आणि डचेस ऑफ ससेक्स. परंतु कवायती राजशिष्टाचार आणि थोडेफार धर्मादाय कार्य यांच्या पलीकडे त्यांच्याकडे करण्यासारखे काहीच नव्हते. मेगन ही अमेरिकी दूरचित्रवाणीवर अभिनेत्री होती. हॅरी हा प्रशिक्षित हेलिकॉप्टर वैमानिक. शिवाय राजघराण्याचा वारसा म्हणूनही उत्तर अमेरिकेत – अमेरिका किंवा कॅनडा – स्वत:चे नवीन जीवन सुरू करता येईल, असा या दोघांना विश्वास वाटतो. तूर्त त्यांच्या मिळकतीपैकी ५ टक्के सरकारी तनख्याच्या (सॉव्हरीन ग्रँट) रूपाने आणि उर्वरित ९५ टक्के रक्कम वडिलांकडून – म्हणजे राजपुत्र चार्ल्स यांच्याकडून येते. राजघराण्याचा त्याग करायचा झाल्यास, इतर मानमरातबाप्रमाणेच या मिळकतीवरही पाणी सोडावे लागणार याची दोघांना पूर्ण कल्पना आहे. मध्यंतरी चार्ल्स यांनी राजघराण्यातील व्यक्तींच्या संख्येत कपात करण्याची घोषणा केली होती. ते स्वत: जेव्हा ब्रिटनचे सम्राट होतील, त्या वेळेपासून हा निर्णय अमलात येणार आहे. तशा परिस्थितीत आपण अधिकच बिनचेहऱ्याचे बनू, अशी रास्त भीती हॅरीला वाटणे स्वाभाविक आहे. आई डायना हिच्याकडून त्याला मोठी इस्टेट मिळालेली असल्यामुळे तूर्त तरी हॅरीसमोर खर्चाची भ्रांत नाही. अमेरिका किंवा कॅनडा येथे गेल्यानंतरही त्याच्याभोवतीचे राजघराण्याचे वलय कायम राहणारच आहे. पण त्या वलयामध्ये आपण किंवा आपली पत्नी किंवा या दोघांचा मुलगा आर्ची गुदमरून जाणार नाही, याची काळजी हॅरीने घेतलेली आहे. सोन्याचा पिंजरा सोडण्याच्या या धाडसाबद्दल तो नक्कीच कौतुकपात्र ठरतो.
संग्रहित लेख, दिनांक 21st Jan 2020 रोजी प्रकाशित
..सोडी सोन्याचा पिंजरा
ब्रिटिश शिष्टाचार पाळण्याचा मी खूप मनापासून प्रयत्न केला.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 21-01-2020 at 00:00 IST
मराठीतील सर्व अन्वयार्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: British prince tour to africa prince harry and meghan markle akp