विजय घाटगे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या आत्मकथनाचा हा पहिला भाग प्रसिद्ध झाल्यानंतर भारतात हे पुस्तक ज्या कारणामुळे चर्चेत आले, त्याहूनही त्यातल्या अध्यक्षीय काळातील ओबामांच्या निरीक्षणांची संदर्भचौकट व्यापक आहे..

‘अ प्रॉमिस्ड् लॅण्ड’ हे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचे आत्मचरित्र भारतात अधिक चर्चेत आले ते त्यातील काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी आणि डॉ. मनमोहन सिंग यांच्याविषयीच्या उल्लेखामुळे. त्याचा राजकीय प्रचारासाठी धूर्त उपयोग काहींनी केला खरा; पण ओबामा यांनी या भारतीय नेत्यांचा केलेला उल्लेख त्यांच्या राजकीय जीवनातील सौजन्यास साजेसाच आहे. या पुस्तकात भारतीय व्यक्तीचा सर्वप्रथम उल्लेख पृष्ठ क्र. २२ वर आला आहे. ओबामा लिहितात, ‘राजकारणी हे अपवाद वगळता दोन चेहऱ्यांचे असतात. एकीकडे ते जनकल्याण, सत्यनिष्ठेचे गोडवे जनतेपुढे गातील, तर आतून ते बडे भांडवलदार, कंपन्या यांची तळी उचलून धरतील.’ ते म्हणतात, ‘अशा प्रकारचा लोकनेता होणे मला आवडणार नाही.’ त्यामुळे आपले आदर्श महात्मा गांधी, लेक वॉलेसा, नेल्सन मंडेला, डॉ. मार्टिन किंग हे असल्याचे ओबामांनी नमूद केले आहे.

भारताबद्दलचे उल्लेख पुस्तकात ठिकठिकाणी येतात. उदा. अल् कायदा संघटना कार्यरत ठेवण्यास आणि अफगाणिस्तानातील हमीद करझाई सरकार अस्थिर ठेवण्यात पाकिस्तान सक्रिय असल्याचे स्पष्ट करताना, ओबामा लिहितात, पाकिस्तानला भारत-अफगाण मैत्री कायम राहणे नको आहे, म्हणून पाकिस्तान अफगाणिस्तानबाबत आत्मघातकी पाऊल उचलत आहे.

भारत ज्या ब्रिक्स राष्ट्रसमूहाचा सदस्य आहे, त्याबद्दलही ओबामा यांनी टिप्पणी केली आहे. त्यांच्या मते, ब्राझील, रशिया, भारत, चीन व दक्षिण आफ्रिका हे ब्रिक्स देश आकाराने मोठे आहेत. बराच काळ विपन्नावस्थेत राहून ते आता प्रगती साधत आहेत. जगाची सुमारे ४० टक्के लोकसंख्या सामावलेल्या या देशांना जागतिक बँक वा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीत मर्यादित स्थान असले तरी, या देशांनी त्यांच्या अर्थव्यवस्थेत लक्षणीय प्रगती केली आहे. ओबामा यांच्या या म्हणण्यास त्यांच्या अध्यक्षीय काळाचा (२००८ ते २०१६) संदर्भ आहे, हे इथे लक्षात घ्यावे लागेल. मात्र, ओबामा यांनी ब्रिक्स देशांच्या राजकीय मानसिकतेवर ताशेरे ओढले आहेत. ते लिहितात, ही राष्ट्रे वेगवेगळ्या धोरणांची पाठराखण करतात खरी; पण एखादी बाब गैरसोयीची असेल, स्वहिताची नसेल तर सरळ हात वर करतात. या राष्ट्रांनी अन्य एखाद्या राष्ट्रास मदत केली तरी त्या राष्ट्राकडून काय पदरात पाडून घेता येईल याचा प्रथम विचार करतील. असे असले तरी ब्रिक्स देशांचा जागतिक व्यवस्थेत महत्त्वाचा वाटा राहील, हे मात्र ओबामा मान्य करतात.

ओबामा यांना २००९ साली शांततेचे नोबेल जाहीर झाले. त्याबद्दलही त्यांनी या पुस्तकात लिहिले आहे. नोबेल जाहीर होण्याबद्दल त्यांच्या साहाय्यकाने सकाळी ६ वाजता झोपेतून उठवून त्यांना कळवले. अशा अवेळी फोन आल्यामुळे, आता काय ऐकायला मिळणार याची ओबामांच्या मनात धाकधूक होती. फोनवर नोबेल पुरस्काराविषयी कळताच, त्यांची पहिली प्रतिक्रिया होती- ‘पण कशासाठी?’ ओबामा लिहितात, ‘पुरस्कार वितरण समारंभात हजर राहताना अपराधी वाटत होते.’ अमेरिकेचे तब्बल दीड लाख सैन्य तेव्हा अफगाणिस्तानात होते. त्यात आणखी वाढ करायची होती. अशा स्थितीत पुरस्कार स्वीकारायचा होता. त्यामुळे तिथे करावयाच्या भाषणाचा मसुदा खुद्द ओबामा यांनीच तयार केला. भाषणात रेन्हॉल्ड नेबर आणि महात्मा गांधी यांचे विचार त्यांनी जाणीवपूर्वक उद्धृत केले.

२००५ साली अस्तित्वात आलेल्या ‘क्योटो प्रोटोकॉल’ या हवामानबदलविषयक बहुदेशीय कराराबद्दलही ओबामा यांनी पुस्तकात लिहिले आहे. इथेही त्यांनी ब्रिक्स देशांवर टीका केली असून, पर्यावरण संरक्षणाबाबत ब्रिक्स देशांचे धोरण काठावर राहण्याचे असून त्यांना कोणतेही बंधन नको आहे, असे निरीक्षण ओबामा मांडतात. २००९ साली कोपनहेगन येथे झालेल्या पर्यावरण परिषदेत भारताचे तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग आणि ओबामा यांच्यात चर्चा झाली. पर्यावरणात होणारा धोकादायक बदल रोखणे ही प्रत्येक देशाची जबाबदारी आहे यावर कोपनहेगन परिषदेत एकवाक्यता झाली, हादेखील ओबामा यांना मोठा दिलासा वाटतो.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून ओबामांनी केलेला भारताचा दौरा ही त्यांची पहिली भारतभेट. त्याआधी ते भारतात कधीच आले नव्हते. येथील विविध धार्मिक समूह, भाषा, भौगोलिक विस्तार, लोकसंख्या यांविषयी त्यांना आकर्षण वाटते. ओबामा पूर्वी इंडोनेशियात राहिले आहेत; तेथे त्यांनी रामायण-महाभारतावर आधारित कथा ऐकल्या आहेत. पौर्वात्यांच्या धर्माबाबत त्यांना औत्सुक्य आहे. महात्मा गांधींच्या चरित्राचा त्यांनी अभ्यास केला आहे. त्याविषयी ओबामा व्यक्त झाले आहेत.

आधुनिक भारत ही ओबामा यांना एक यशोगाथा वाटते. नव्वदच्या दशकात बाजाराभिमुख झालेल्या भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाटचालीबद्दल ओबामा यांनी विचार मांडले आहेत. ते म्हणतात, ‘या व्यवस्थेचे डॉ. मनमोहन सिंग हे खरेखुरे मानचिन्ह आहेत. अर्थतज्ज्ञ आणि ध्येयनिष्ठ असलेल्या या व्यक्तीने भारतीयांची मने जिंकली, पण त्यासाठी त्यांच्या भावनांना कोठेही हात घातला नाही.’ डॉ. मनमोहन सिंग यांच्या पंतप्रधान काळातील परराष्ट्र धोरणाविषयी ओबामा लिहितात, ‘परराष्ट्र धोरणाबाबत डॉ. सिंग नोकरशाहीच्या कलानेच निर्णय घेत. ही भारतीय नोकरशाही अमेरिकेच्या विरोधी असते.’ मात्र, डॉ. सिंग यांचे मृदुभाषी, विचारी आणि प्रामाणिक असणे भावल्याचे ओबामा नमूद करतात. ते लिहितात, २००८ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर कठोर कारवाई करावी, यासाठी जनभावनेचा प्रचंड दबाव असतानाही त्यास डॉ. मनमोहन सिंग यांनी समंजसपणे नकार दिला.

ओबामांना भारतभेटीत राजशिष्टाचारानुसार पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी मेजवानी दिली. याप्रसंगी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, तसेच राहुल गांधी उपस्थित होते. त्या वेळची आपली निरीक्षणे ओबामा यांनी मांडली आहेत. पुस्तकातील हाच भाग भारतात मोडतोड स्वरूपात अधिक चर्चिला गेला, हे अलाहिदा. तर.. बराच वेळ लांबलेल्या या मेजवानीत, तेव्हा ७० वर्षांचे असलेले पंतप्रधान डॉ. सिंग हे पेंगुळले आहेत हे ओबामांच्या ध्यानात आले. ओबामा लिहितात, ‘तेव्हा मनात विचार आला की, मनमोहन सिंग यांनी खुर्ची सोडल्यावर या देशाचे नक्की काय होईल?’ ते डॉ. सिंग यांना दोष देत नाहीत; ओबामा म्हणतात, डॉ. सिंग यांनी आपले काम चोख बजावले आहे. बहुभाषिक, बहुवांशिक लोकशाही व्यवस्थेत इतकेच अपेक्षित आहे : कोणतेही क्रांतिकारी पाऊल नाही, मोठा सांस्कृतिक बदल नाही, कोणत्याही समस्येवर टोकाचा उपाय नाही.

पुस्तकात ओबामांनी काही तात्त्विक, गंभीर प्रश्नही प्रांजळपणे उपस्थित केले आहेत. ते म्हणतात, हिंसा, लालसा, भ्रष्टाचार, राष्ट्रवाद, वांशिकता, धार्मिक असहिष्णुता, अस्थिरपण व स्वत:चा नगण्यपणा लपवण्यासाठी दुसऱ्यास कमी लेखणे, कुरघोडी करणे हे अवगुण खरोखरच इतके मोठे आहेत का, की ज्यांचे लोकशाही नियंत्रणच करू शकत नाही? या व अशा अनेक समस्या, जेव्हा विकासदर खुंटतो, भौगोलिक सीमा बदलतात किंवा एखादा प्रखर नेता लोकभावनांच्या प्रवाहावर आरूढ होतो तेव्हाच डोके वर काढतात, याविषयी ओबामा खंत व्यक्त करतात. या समस्यांची उकल करण्यासाठी महात्मा गांधी हयात हवे होते, अशी भावनाही ते मांडतात.

हे पुस्तक म्हणजे ओबामांच्या अध्यक्षीय काळातील आत्मकथनाचा पहिला भाग आहे. पुस्तकात भारताबद्दलचे उल्लेख वर नमूद केले, तेवढय़ापुरतेच आहेत. ओबामांच्या बालपणीची, कुटुंबाबरोबरची तसेच अध्यक्षीय काळातील छायाचित्रेही पुस्तकात आहेत. ओबामांच्या भारतभेटीच्या वेळी पंतप्रधानांकडील मेजवानी प्रसंगाचे एक छायाचित्र पुस्तकात आहे, पण त्यात ओबामांसह डॉ. मनमोहन सिंग दाम्पत्य व राष्ट्रपती प्रतिभा पाटील हेच दिसतात.

ओबामा यांनी आपले पालक, शालेय जीवन यांविषयी या पुस्तकात अगदीच त्रोटक लिहिले आहे. कायद्याचे पदवीधर, विद्यापीठाच्या ‘लॉ रिव्ह्य़ू पॅनल’चे पहिले कृष्णवर्णीय अध्यक्ष, मिशेल यांच्याशी मैत्री-विवाह, इलिनॉइसचे सिनेटर ते थेट राष्ट्राध्यक्ष असा त्यांचा प्रवास आहे. बँकांना जीवदान देणे, ओबामा केअर ही आरोग्यविषयक कायदेशीर योजना, पर्यावरण संरक्षणविषयक बैठका, समुद्रातील तेलगळती समस्या, निर्वासितांचे प्रश्न, लिबिया आक्रमण, विदेश दौरे हे ओबामांच्या पहिल्या चार वर्षांच्या (२००८ ते २०१२) कारकीर्दीतील महत्त्वाचे घटक असून त्यांविषयी ओबामांनी या पुस्तकात सविस्तर लिहिले आहे. पुस्तकाची अखेर ओसामा बिन लादेनच्या खात्म्याने झाली आहे.

बिगर-अमेरिकी, विशेषत: भारतीय वाचकाला अमेरिकी कायदे, व्हाइट हाऊसच्या चर्चा, तेथील उखाळ्यापाखाळ्या यांत रस नसेलही कदाचित; पण ओबामा यांच्यासारख्या सभ्य, सुसंस्कृत, अभ्यासू आणि अमेरिकेच्या पहिल्या कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्षाने कोणताही आडपडदा न ठेवता हे आत्मचरित्र वाचकांसमोर आणले आहे. ओबामांच्या या आत्मकथनातील निवडक भाग उचलून राजकीय प्रचाराचे आख्यान रचण्याचा प्रयत्न आपल्याकडे झाला असला, तरी भारतीय वाचकांनी ते मुळातूनच वाचायला हवे; तरच आख्यानापल्याडचे हे आत्मकथन गवसेल.

vijayghatage79@gmail.com

 

मराठीतील सर्व बुकमार्क बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A promised land barack obama book review abn
First published on: 06-02-2021 at 00:02 IST