‘बहुतेक लेखकांची अशी कल्पना असते की, ते भवतालच्या जगातून ‘गोष्ट’ मिळवत असतात. परंतु मला आता वाटू लागले आहे की, असा विचार आत्ममग्नतेतूनच येत असावा. कारण यात आणखी एक शक्यता आहे. ती म्हणजे गोष्टीनेच लेखकाला निवडण्याची. गोष्ट स्वत:च तिचे अस्तित्व आपल्याला जाणवून देते.. त्यामुळे फिक्शन आणि नॉनफिक्शन या केवळ ‘गोष्ट सांगण्याच्या’ दोन पद्धती आहेत..’
अरुंधती रॉय यांच्या ‘गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज’ या कादंबरीतलं हे चिंतन. रॉय यांची ही पहिलीच कादंबरी. प्रकाशन साल १९९७. तेव्हा त्या वयाच्या तिशीत होत्या. हा काळ भारताच्या स्वातंत्र्याच्या पन्नाशीचा. त्याच सुमारास आक्रमक राष्ट्रावादाच्या वाऱ्यांना ऊर्जितावस्था मिळाली होती. नव्या आर्थिक धोरणांच्या दृश्य परिणामांच्या त्या पहाटकाळात चंगळवाद फोफावण्यास नुकती कुठे सुरुवात झाली होती. प्रकाशनानंतर बघता बघता काही दिवसांतच या कादंबरीने जगभरातील वाचकांचे लक्ष वेधून घेतले. अल्पावधीतच न्यूयॉर्क टाईम्सच्या बहुविक्या पुस्तकांच्या यादीत या तिला स्थान मिळाले. आणि त्याच वर्षीचा (१९९७) ‘मॅन बुकर’ पुरस्कारही या कादंबरीला मिळाला. या पहिल्याच कादंबरीने मान्यता आणि प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचलेल्या अरुंधती रॉय या भारतातील नवमध्यमवर्गाच्या ‘ब्रॅण्ड आयकॉन’ बनल्या.
इथपर्यंत सर्व ठीक चालले होते. त्यानंतर मात्र त्यांनी कादंबरीलेखन केले नाही. या दोन दशकांच्या काळात रॉय यांचे लेखनच प्रकाशित झाले नाही, असेही नाही. लेख, मुलाखती, प्रस्तावना अशा स्वरूपात त्यांचे भरपूर लेखन प्रसिद्ध झाले आहे. म्हणजे ‘फिक्शन’कडून ‘नॉन फिक्शन’कडे जाणारा हा प्रवास. रॉय यांच्यासाठी या ‘गोष्ट सांगण्याच्या केवळ दोन पद्धती’आहेत. परंतु वाचकांमध्ये मात्र या दोन प्रकारांतील लेखनामुळे रॉय यांच्या दोन भिन्न प्रतिमा निर्माण झाल्या आहेत. कादंबरीमुळे ‘ब्रॅण्ड आयकॉन’ बनलेल्या रॉय त्यांच्या नॉन फिक्शनमुळे काहींसाठी अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या कडव्या समर्थक, कार्यकर्त्यां – बंडखोर लेखिका बनल्या, तर काहींनी त्यांना स्वैराचारी, देशद्रोही, नक्षलसमर्थक ठरवले. या साऱ्याची सुरुवात झाली १९९८ च्या ‘द एण्ड ऑफ इमॅजिनेशन’ या निबंधाने. तत्कालीन भाजप सरकारने केलेल्या अणुचाचण्यांना या निबंधातून त्यांनी विरोध केला होता. या निबंधातील विचारांनी आधीचा रॉय यांचा चाहता असलेला वर्ग दुखावला गेला, तेवढेच नवे वाचक-समर्थकही त्यांना मिळाले. दोन दशकांतील या १६ ललितेतर गद्य पुस्तकांपैकी ‘वॉकिंग विथ द कॉमरेडस’ या पुस्तकावर बंदी येते की काय अशी परिस्थिती आली , तर ‘ब्रोकन रिपब्लिक’ला २००६ मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. परंतु रॉय यांच्या कादंबरीलेखनाच्या प्रेमात असेलेले वाचक मात्र त्यांच्या पुढील कादंबरीचीच वाट पाहत होते. .
रॉय यांच्या नव्या कादंबरीची नुकतीच झालेली घोषणा, ही अशा वाचकांना सुखावणारी बातमी आहे! ‘द मिनिस्ट्री ऑफ अटमोस्ट हॅपिनेस’ हे तिचे नाव. हॅमिश हॅमिल्टन आणि पेंग्विन इंडिया यांच्याकडून पुढील वर्षी (२०१७) ही कादंबरी प्रकाशित होत आहे. ‘या कादंबरीसाठी वाचकांना वीस वर्षे वाट पाहावी लागली असली तरी हे वाट पाहणे इष्ट ठरवेल अशी ही नवी कादंबरी आहे. आणि हे फक्त अरुंधतीच लिहू शकली असती’, असे रॉय यांचे प्रकाशन साहायक डेविड गॉडविन यांचे म्हणणे आहे. अशा शब्दांत या कादंबरीची स्तुती केल्यानंतर सर्वानाच तिच्या कथेविषयी उत्सुकता आहे.
रॉय यांनी पहिल्या कादंबरीतून आळवलेला वसाहतवादविरोधी सूर, नंतरच्या त्यांच्या नॉन फिक्शनमधून घेतलेल्या व्यवस्थाविरोधी आणि रोखठोक भूमिका या पाश्र्वभूमीवर ही कादंबरी येत आहे. या वीस वर्षांत पुलाखालून बरेच पाणी गेले आहे. या नव्या कादंबरीच्या घोषणेनंतर अनेकांनी तिच्या कथेबद्दल अंदाज वर्तवण्यास सुरुवात केली असली तरी तूर्त लेखिका व प्रकाशकांकडून या कथेबद्दल गुप्तता ठेवण्यात आली आहे. अशावेळी पुन्हा ‘गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज’ मधील गोष्टीविषयीचे चिंतन आळवण्यावाचून वाचकांना पर्याय नाही. ते म्हणजे- ‘महान कथांमागील रहस्य म्हणजे त्यांच्यात कोणतेच रहस्य नसते. आपण त्या वाचलेल्या असोत किंवा नसोत त्यांचा शेवट काय होईल हे आपल्याला माहीत असते. तिच्यात कोण जगते-मरते, कोणाला प्रेम मिळते किंवा कोणाला नाही हेही आपल्याला माहीत असते. तरीही त्यांच्याबद्दल आपल्याला पुन: पुन्हा जाणून घ्यावेसे वाटते.’