थोर साहित्यिक रवींद्रनाथ टागोर यांनी दोनदा इटलीला भेटी दिल्या होत्या. त्या भेटी इटलीच्या सांस्कृतिक प्रेमातून होत्या. त्यांचा दुसरा दौरा हा मुसोलिनीच्या निमंत्रणानुसार झाल्यामुळे टागोर हे फॅसिझमचे समर्थक होते असा त्याचा अर्थ लावला गेला; पण तो चुकीचा होता..
इतिहासात ज्या व्यक्तिरेखा असतात त्यांना नेहमी काही ना काही वाद चिकटलेले असतात. साहित्यातील भारतीय नोबेल विजेते साहित्यिक रवींद्रनाथ टागोर यांच्या संदर्भात एक वाद आपल्या सर्वानाच ऐकून माहिती असेल तो म्हणजे पंचम जॉर्जच्या स्वागताकरिता त्यांनी लिहिलेले जन-गण-मन हे गीत नंतर २४ जानेवारी १९५० रोजी ते राष्ट्रगीत म्हणून जाहीर करण्यात आले. त्यातील ‘अधिनायक’ या शब्दाला राजस्थानचे राज्यपाल कल्याणसिंह यांनी अलीकडेच आक्षेप घेतला होता. टागोरांवरील आणखी एक आक्षेप सर्वाना माहीत असण्याचे कारण नाही तो म्हणजे त्यांनी इटलीचा हुकूमशहा बेनिटो मुसोलिनी याची स्तुती केली होती. त्याचबरोबर फॅसिझमचेही समर्थन केले होते. इटलीच्या दोन दौऱ्यांमुळे त्यांना चिकटवलेला हा आरोप होता. टागोर हे फॅसिझमचे समर्थक होते असा चुकीचा अर्थ लावला गेला आहे, तो खोडून काढणारे अनेक पुरावे देत या आक्षेपाचे पूर्ण निराकरण ‘मीटिंग विथ मुसोलिनी – टागोर्स टूर्स इन इटली (१९२५ अ‍ॅण्ड १९२६)’ या कल्याण कुंडू यांनी लिहिलेल्या पुस्तकात केले आहे. टागोरांचा पहिला इटली दौरा १९२५ मध्ये, तर दुसरा १९२६ मध्ये झाला. पहिला दौरा त्यांनी स्वत:हून केला होता व नंतरचा दौरा त्यांनी मुसोलिनीचे पाहुणे म्हणून केला होता असे सांगितले जाते. इथे एक गोष्ट लेखक कल्याण कुंडू यांनी नमूद केली आहे ती म्हणजे टागोर हे जसे साहित्यिक होते तसेच ते उत्तम चित्रकार, गीतकार, नाटककार व तत्त्वचिंतक होते. त्यांचे हे पुस्तक म्हणजे इतिहास ग्रंथ कसा लिहावा याचा उत्तम नमुना आहे. कुंडू यांचा त्यातील अधिकारही मोठा आहे, कारण ब्रिटनमधील टागोर केंद्राचे ते अध्यक्ष आहेत. त्यामुळे त्यांना टागोरांवरील हा ग्रंथ लिहिण्यासाठी अनेक कागदपत्रे उपलब्ध होणेही सोपे गेले आहे. टागोरांबाबतच्या कागदपत्रांचा मोठा संग्रह ब्रिटनमध्ये या केंद्रात आहे. पंडित जवाहरलाल नेहरू यांना चीन व चाऊ एन लाय यांच्याविषयी आकर्षण होते, तर टागोरांना इटली व मुसोलिनीचे आकर्षण होते हे खरे आहे, पण त्याचा अर्थ त्यांनी या दोघा व्यक्तींच्या विचारसरणीला पािठबा दिला असा होत नाही. पण तसा चुकीचा समज करून घेतल्याने टागोर व नेहरू हे दोघेही इतिहासात खलनायक ठरल्याची शोकांतिका बघायला मिळते. मुसोलिनीचा टागोरांना बोलावण्याचा हेतू हा त्यांच्यासारखा थोर साहित्यिक इटलीला भेट देतो व त्यामुळे आपोआप फॅसिझमचा डाग पुसला जाईल, इतर देशांच्या इटलीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल असा असू शकतो, कारण टागोर जेव्हा इटलीला गेले तेव्हा त्यांना मुसोलिनीच्या एकाही विरोधकाला भेटता आले नव्हते. टागोर जेव्हा इटलीनंतर स्वित्र्झलडला गेले तेव्हा इटालीयन विद्वान साल्वादोरी यांनी त्यांना तुम्ही इटलीत असताना फॅसिझमचे समर्थन का केलेत, असा प्रश्न विचारला होता. साल्वादोरी आजारी असताना त्यांच्या वतीने त्यांची पत्नी टागोरांना भेटायला आली व त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली, तेव्हा टागोरांनी त्यांच्या इटली-भेटीचे समर्थन करताना असे म्हटले आहे की, आपल्याला फॅसिझमबाबत काही माहिती नव्हते, पण आपण त्याचे समर्थन कधीच केलेले नाही. शिवाय मुसोलिनीविरोधक आपल्या सान्निध्यात कधीच आले नाहीत. टागोरांनी स्वत: खुलाशाचे पत्र लिहून श्रीमती साल्वादोरी यांना दिले, पण तरीही त्यांच्या पतीचे त्या उत्तराने समाधान झालेले दिसत नाही. टागोरांनी असे स्पष्ट म्हटले आहे की, ‘आपण फॅसिझमचा कधीही पुरस्कार केला नाही, आपण मुसोलिनीचे कौतुक राज्यकर्ता म्हणून केले नाही तर तो चांगला कलाकार होता त्यामुळे केले. आपण एक कलाकार म्हणून बोलत आहोत याचे भान इटलीतील प्रत्येक भाषणात त्यांनी ठेवले होते. फॅसिझमने इटलीला आíथक पेचप्रसंगातून वाचवले असे इटली-भेटीत जे लोक आपल्याला भेटले त्यांनी सांगितले होते, पण त्यावर आपण काही भाष्य केले नव्हते.’ टागोरांना इटलीच्या प्राचीन संस्कृतीचे प्रेम होते. तेथील पुस्तकांचे, विद्वानांचे आकर्षण होते. इटलीच्या संस्कृतीविषयीची पुस्तके शांतिनिकेतनमध्ये नव्हती ती कुठून मिळवावीत या विवंचनेत असताना इटालीयन विद्वान फॉर्मिची यांनी त्यांना ती मुसोलिनीकडून फुकट मिळवून दिली होती. टागोरांनी मुसोलिनीला स्पष्टपणे सांगितले की, तुम्ही जी प्रगती करीत आहात ती भौतिक प्रगती आहे. त्यामुळे कधीच देश खऱ्या अर्थाने मोठा होत नसतो. त्यामुळे ते मुसोलिनीविरोधात एक शब्दही न बोलता निघून आले अशातला भाग नाही. जग माणसांमुळे चालते, यंत्रांमुळे नाही असे टागोरांचे मत होते. टागोरांनी मुसोलिनीला त्यांच्या भेटीनंतर चार वर्षांनी प्रा. फॉर्मिची यांच्या आग्रहास्तव आभाराचे पत्र लिहिले होते ते मात्र चुकीचे होते.पण ते पत्र प्रत्यक्ष टपालाने टाकण्यात आले नव्हते.टागोरांचे मुसोलिनी-प्रेम खऱ्या अर्थाने १९३० मध्ये संपले, कारण तेव्हा त्याने अबसिनिया म्हणजे आताच्या इथिओपियावर आक्रमण केले होते. शरम आणणारे अमानवी कृत्य असे त्याचे वर्णन टागोरांनी ‘आफ्रिका’ नावाच्या कवितेत केले आहे. आता यातील काही ठिकाणी टागोरांचे इटली प्रेम जास्तच ओसंडून वाहिले असे आपण म्हटले तर खुद्द अिहसेचे प्रवर्तक महात्मा गांधी यांनीही इटलीला भेट दिल्यानंतर मुसोलिनीच्या सामाजिक व आíथक सुधारणांचे कौतुक केलेले दिसते. महात्मा गांधींची इटली भेट टागोरांच्या नंतर चार वर्षांनी झाली तरी त्यांचे मुसोलिनीबाबतचे मत काहीसे अनुकूल होते, पण गांधींवर कधी त्याबाबत टीका झालेली नाही. टागोर व गांधी यांच्या इटली भेटीत एकच फरक होता तो म्हणजे टागोरांप्रमाणे गांधीजी मुसोलिनीचे पाहुणे म्हणून इटलीत गेले नव्हते. टागोरांची मुसोलिनीशी दुसरी भेट झाली तेव्हा तो म्हणाला की, काही वेळा ऐतिहासिक क्षण असे येतात जेव्हा शांतता व सुव्यवस्थेसाठी हुकूमशाही राजवट अपरिहार्य असते. स्वातंत्र्य बाजूला ठेवावे लागते, पण तो काळ तात्पुरता असतो. त्यावर टागोरांनी त्याला दोनच गोष्टी सांगितल्या. ते म्हणाले की, क्रूरता व खोटेपणा यावर कधीच तडजोड करता येत नसते. एका हुकूमशहासमोर एवढे बोलण्याची िहमत टागोरांनी दाखवली होती.टागोरांचा फॅसिझमविषयी जो गोंधळ झालेला दिसतो त्याबाबत आणखी एक कारण सांगितले जाते ते म्हणजे इटलीतील फॅसिझममध्ये वसाहतवादविरोधी चळवळीची बीजे आहेत असे त्यांना वाटत होते व त्या वेळी भारतात ब्रिटिशांचा वसाहतवाद ऐन भरात होता. एक कलावंत, साहित्यिक व दुसरा हुकुमशहा अशा दोन टोकाच्या व्यक्तिमत्त्वांची भेट, इटलीतील त्या वेळचे वातावरण, मुसोलिनी-टागोर भेटीने निर्माण केलेला वाद यात आपण बोध एवढाच घेऊ शकतो की, माणूस कितीही मोठा असला तरी त्याच्या हातून काही चुका होऊ शकतात. फक्त त्याचे न्याय्य परिशीलन झाले तर काही गरसमज दूर होतात.
loksatta@expressindia.com

मीटिंग विथ मुसोलिनी-टागोर्स टूर्स इन इटली १९२५ अ‍ॅण्ड १९२६
लेखक- कल्याण कुंडू
प्रकाशक- ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस
पृष्ठे- २५०, किंमत- ७५० रुपये