लेखकाचा मृत्यू खरे तर त्याचे लेखन संपल्यावर होतो. त्याच्या पुस्तकांमधून उरतो तो त्याच्या आयुष्याचा एक भाग जो पुसता येत नाही, पण तरी कालगतीच्या बुलडोझरखाली तीन-चार पिढय़ांनंतर लेखक न वाचला गेल्याने बाद होतो, हेच खरे. एकोणिसाव्या शतकातील सगळेच अभिजात म्हणवले गेलेले लेखक हल्ली बुकशेल्फची शोभा वाढविण्यासाठी ठेवले जातात. बंडखोरीच्या जागतिक लाटेवर स्वार झालेल्या साठोत्तरी लेखकांच्या लोकप्रियतेच्या बेडक्या नव्वदोत्तरीचे उत्तराधुनिक साहित्याने फोडल्या आणि आज कोलाहलयुगात ‘साहित्याधारित पुस्तके (ललित साहित्य) वाचल्याने जगण्याची वयोमर्यादा सुमारे दोन ते चार वर्षांनी विस्तारते,’ असे संशोधन वृत्तपत्रीय बातम्यांमधून प्रसारित होणे नित्यनेमाचे बनले आहे. तरी वाचन कमी झाल्याची ओरड आणि पुस्तकांच्या लाखभर आवृत्त्या खपल्या जाण्याचे कौतुक एकाच काळातील समाजाचे लक्षण आहे. लिहिणाऱ्यांच्या मनात पोटशूळ उठविणाऱ्या रकमेची पुस्तक-हक्कविक्री बातम्यांचा विषय असू शकते आणि आंतरराष्ट्रीय ‘लिटरेचर फेस्टिवल’सारखे दोन-चार वार्षिक महोत्सव लेखकांना सेलिब्रेटीपदाचा सोस पुरविण्यासाठी महत्त्वाचे ठरतात. ‘लेखक कट्टा’ आणि ‘लेखक गप्पा’ उगी साहित्य चळवळ चालविल्याचा आव ताणत गल्लोगल्ली भरतात. या अशा वातावरणात खरोखरीच्या दिग्गज लेखकाच्या मृत्यूला वाचक आणि अवाचक अशा जगात काय महत्त्व असते, हे दर्शविणाऱ्या घटना गेल्या आठवडय़ात घडल्या..
..महाश्वेता देवी यांच्या मृत्यूची वार्ता देशातील सर्व वृत्तपत्रांच्या अग्रपानी होती. तरीही वाचकपणाची शेखी मिरविणाऱ्या कोलकातावासीयांनी त्यांच्या अंत्ययात्रेकडे घाऊकरीत्या पाठ फिरवून आज जनमानसात उरलेला ‘लेखकानुबंध’ किती आहे, हे सिद्ध केले. याच्या बरोबर उलट आणखी एक घटना समाजमाध्यमांवर घडली. कादंबरीकार हारुकी मुराकामी यांच्या मृत्यूची बातमी त्यांच्या जपानी प्रकाशनाने जाहीर केली. लवकरच त्याबाबत अधिकृत निवेदन दिले जाणार असल्याचेही या वार्तेमध्ये म्हटले होते. या वृत्ताचे पडसाद तीव्र होते. ट्विटरवासनाछबूंनी मुराकामींवर शाब्दिक अंत्यसंस्काराच्या चादरी चढवण्यास सुरुवात केली. त्या अल्पावधीत इतक्या झाल्या की त्यांची बहुतांश इंग्रजी पुस्तके प्रकाशित करणाऱ्या पेंग्विन-रॅण्डम हाऊसला मुराकामी जिवंत असल्याचे आणि त्यांच्या मृत्यूची अफवा उठल्याचे अधिकृत निवेदनाद्वारे जाहीर करावे लागले. पण तोवर भल्या-भल्या ‘श्रद्धांजली आतुरां’नी त्यांच्या साहित्येची आणि व्यक्तिरेखेची समीक्षा करून ठेवली होती.
कादंबरी आणि कथाकार म्हणून गेल्या दशकभरात अमेरिकी पुस्तक व्यवहार यंत्रणेद्वारे जपानी लेखक हारुकी मुराकामी यांच्या लोकप्रियतेचे गारूड (आणि त्याच्या ‘ट्रिव्हिया’चे भारूडही) जगभरातील वाचकांना माहिती आहे. त्यांच्या दीड-दोन डझन पुस्तकांमधील गोष्ट सांगण्याची हातोटी यांनी प्रभावित होऊन कित्येक लेखक घडले आहेतच, पण गेल्या काही वर्षांत साहित्याचे नोबेल पारितोषिक जाहीर होण्याआधीच्या काही दिवसांत अनेक सट्टेबाजदेखील मुराकामींमुळे नकळत का होईना ‘घडले’ आहेत. त्यांना साहित्याचे नोबेल दरवर्षी मिळत नाही, परंतु ‘यंदा मुराकामींनाच नोबेल’ यावर लागलेल्या सर्वाधिक बोलींमुळे सट्टेबाज हमखास नफ्यात राहतात. हारुकी मुराकामी इतके आंतरराष्ट्रीय सेलेब्रिटी आहेत की, त्यांच्याबाबत सारखीच कोणती ना कोणती बातमी येत असते. उदाहरणार्थ त्यांचे रेस्तराँ, त्यांचा धावण्याचा छंद, त्यांचा प्रवास, त्यांचे पाश्चात्त्य देशांतील स्वागत.. मग त्यांच्या जपानी प्रकाशकाला त्यांच्या मृत्यूची बातमी पसरविण्याचा आणि इंग्रजी प्रकाशनाला ते जिवंत असल्याचा खात्रीसंदेश देण्याचा इतका सोस का होता, याचे कोडेच मुराकामीच्या चाहत्यांभोवती राहिले.
याचे एक संभाव्य कारण असे : मुराकामींचा नवा कथासंग्रह २०१४ साली जपानीत प्रकाशित झाला. तो इंग्रजीत ‘मेन विदाऊट विमेन’ (हेमिंग्वेच्या कादंबरीचेच शीर्षक) नावाने लवकरच येणे अपेक्षित आहे. (यातल्या शीर्षककथा वगळता बहुतांश कथा न्यू यॉर्कर साप्ताहिकाच्या अर्काइव्हमधे वाचायला उपलब्ध आहेत.) तर त्या पुस्तकासोबत मुराकामींच्या अन्य (जुन्या) पुस्तकांना पुन्हा बाजारातून वेगात उठाव मिळविण्यासाठी त्यांच्या निधनाच्या वार्तेची क्लृप्ती लढविली गेली का, असा कयास काढला जात आहे.
पण गंमत म्हणजे पुस्तक खपण्यासाठी कसलीही शक्कल लढविण्याची गरज नसल्यासारखे त्यांच्याभोवती ‘प्रसिद्धीचिलखती’ आवरण आहे. लोक त्यांच्या पुस्तकप्रतींसाठी दुकानाबाहेर आदल्या रात्रीपासून लांबलचक रांगा लावतात. आंतरराष्ट्रीय बाजारात पुस्तकाची मागणी पुरविताना प्रकाशकांची दमछाक होते. ऑनलाइन मार्केट, पायरसीचा पुस्तकांचा आणि ई-बुकांचा बाजारही मुराकामीच्या पुस्तकांनी व्यापला आहे. त्यामुळे त्यांच्या आगामी इंग्रजी पुस्तकाचीही विक्रमी विक्री होईल, यात शंका नाही. आपल्या अनेक कथा, कादंबऱ्यांमधून मृत्यू आणि अध्यात्माची संकल्पना चर्चेला घेणाऱ्या मुराकामी यांच्या मृत्युअफवेचा आधार ‘प्रसिद्धीसाठी’ कोणी घेणे, हा मुराकामींच्या साहित्याचाच पराभव म्हणावा का?
– कमल राजे
हारुकी मुराकामी यांचे ‘मेन विदाउट विमेन’ हे आगामी इंग्रजी पुस्तक ज्यावरून अनुवादित झालेले असणार आहे, ते हे मूळ जपानी पुस्तक!