इतर दहशतवादी संघटनांप्रमाणे आयसिसचीही मनुष्यबळ भरतीसाठीची स्वत:ची यंत्रणा आहे. ही यंत्रणा कोणते मार्ग किती निर्घृणतेने अवलंबते याचा वेध घेण्याचा अफलातून प्रयत्न अ‍ॅना अर्ली या तरुण फ्रेंच महिला पत्रकाराने या पुस्तकात केला आहे. तो स्वानुभवावर आधारित असल्याने थरारक ठरला आहे.
इस्लामिक स्टेट वा आयसिस या दहशतवादी संघटनेचे नाव आता अपरिचित राहिलेले नाही. तिचे धागेदोरे पार मुंब्रा-कल्याणपर्यंत पोचले आहेत. या संघटनेच्या जाळ्यात अडकलेल्या वा तिच्याकडे आकर्षित झालेल्या तरुणांच्या बातम्या अधूनमधून ठळकपणे प्रसिद्ध होत असतात. कधी आपला मुलगा आयसिसपायी प्रदीर्घ काळ बेपत्ता असल्याचा टाहो पालक फोडत असतात. क्वचित या संघटनेच्या कराल तावडीतून सुटलेल्या तरुणांचे अनुभव वाचायला मिळतात. आयसिसबद्दल जगभरातील तरुणांमध्ये विशेषत: मुस्लीम तरुणांमध्ये सुप्त आकर्षण असल्याची बाब स्पष्टपणे समोर आलेली आहे.
तरुणांबरोबरच तरुणींनाही भुरळ पाडून आपल्या जाळ्यात ओढण्याचे आयसिसचे प्रयत्न चालू असतात. यासाठी प्रामुख्याने सोशल मीडियाचा वापर प्रभावीपणे केला जातो. जगभरात इस्लामची सत्ता स्थापन करण्याचे, शरियत कायदा लागू करण्याचे या संघटनेचे जाहीर उद्दिष्ट आहे. विरोधाभास म्हणजे कर्मठ, कडवे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अत्याधुनिक माध्यमांचा वापर संघटनेकडून शस्त्राप्रमाणे केला जात आहे. इतर दहशतवादी संघटनांप्रमाणे आयसिसचीही मनुष्यबळ भरतीसाठीची स्वत:ची यंत्रणा आहे. तिचे काम बिनबोभाटपणे चालू असते. ही यंत्रणा कोणते मार्ग किती निर्घृणतेने अवलंबते याचा वेध घेण्याचा अफलातून प्रयत्न अ‍ॅना अर्ली या तरुण फ्रेंच महिला पत्रकाराने केला आहे. तो स्वानुभवावर आधारित असल्याने थरारक ठरला आहे. यासाठी तिला जीव धोक्यात घालावा लागला आहे. तिच्या जिवाला असलेला धोका अद्याप टळलेला नाही.
अस्वस्थ, भरकटलेल्या तरुणींनाही आयसिसकडून लक्ष्य केले जाते, असे अनुभव आल्यानंतर अ‍ॅनामधील पत्रकार या प्रश्नी सक्रिय झाली. तिने या विषयाला भिडायचा निर्णय घेतला आणि ‘मेलडी’ हे काल्पनिक पात्र फेसबुक अकाउंटद्वारे निर्माण केले. मेलडी ही वीस वर्षांची तरुणी असून, ख्रिस्ती धर्मातून बाहेर पडून इस्लामचा स्वीकार केला असल्याची बतावणी तिने केली. या पात्राद्वारे तपास करताना तिला अर्थातच काही भयावह अनुभवांना सामोरे जावे लागले. अवघ्या ४८ तासांत तिच्याशी बिलेल असे नाव सांगणाऱ्या सीरियामधील दहशतवाद्याने स्काइपद्वारे संपर्क साधला. त्याने तिला लग्नाचे तसेच सुखी आयुष्याचे आमिष दाखवून सीरियातील जिहादमध्ये सहभागी होण्याचे आर्जव केले. स्काइपद्वारा या दोघांमधील संभाषणाचे सत्र महिनाभर चालू होते. त्यात अनेक चढउतार आले. या घडामोडी २०१४ मध्ये घडल्या. निश्चित काळ म्हणजे इस्लामिक स्टेटने मोसूल या इराकमधील दुसऱ्या सर्वात मोठय़ा शहराचा ताबा घेतला, त्याआधीच्या एप्रिल-मे या दोन महिन्यांचा.
मेलडीद्वारे या संघटनेचे अंतरंग जाणून घेण्याचा प्रयत्न अ‍ॅना करीत होती. अचानक मेलडीला बिलेलशी विवाहबद्ध होण्याच्या प्रस्तावाला सामोरे जावे लागले. बिलेल हा आयसिसमधील साधासुधा असामी नव्हता. तो सीरियातील अमीर होता. मुख्य म्हणजे अबू बक्र अल-बगदादी या जगातील सर्वाधिक धोकादायक दहशतवाद्याचा तो उजवा हात असल्याचे मेलडीला मिळालेल्या माहितीतून निष्पन्न झाले. दरम्यान, मेलडीने सीरियात यावे, येथे तिला स्वर्गसुख मिळेल, असा तगादा बिलेलने लावला होता. मेलडीच्या म्हणजेच अ‍ॅनाच्या धैर्याची आणि तिच्या प्रतिकारक्षमतेची ही कसोटी होती. त्या कसोटीला ती उतरली का, हे पुस्तकाच्या वाचनातूनच अनुभवणे श्रेयस्कर.
एक बेल्जियन तरुणी आयसिसकडे आकर्षित होऊन सीरियाला रवाना झाली आणि बेपत्ता झाली. तिच्या आईचे दुख जाणून घेतल्यानंतर अ‍ॅनाने जिहादच्या ऑनलाइन जगताचा मागोवा घेण्यास सुरुवात केली. तिचा हा प्रयत्न अद्याप सुरू असून, जिवाला धोका असल्याने ती आपली खरी ओळख सांगू शकत नाही. या प्रयत्नांची तिने केलेली नोंद म्हणजे हे पुस्तक. त्यातून तिची जिहादबद्दलची मतेही आपल्यापर्यंत पोहोचतात. खुल्या फ्रेंच संस्कृतीत वाढलेल्या एका युरोपीय आधुनिक तरुणीची पाशवी, धर्माध अशा संघटनेबद्दलची चीड ती व्यक्त करते. स्काइपद्वारा बिलेलशी होणाऱ्या संवादातून तिची मानसिक आंदोलनेही जाणवतात. हा संवाद लांबल्याने काहीसा रसभंग जरूर होतो. या संवादानंतर वेगवान घडामोडी घडतात. त्यामुळे कथनाला ओघवतेपणा येतो. मात्र, आयसिसच्या कार्यप्रणालीवर झगझगीत प्रकाश पाडण्यात हे पुस्तक कमी पडते. आयसिसच्या ताब्यात इराक, सीरियातील तेलक्षेत्रे आहेत. यामुळे आर्थिकदृष्टय़ा ही संघटना प्रबळ आहे. या संघटनेचे कामकाज कसे चालते हे जाणून घेण्याची उत्सुकता अ‍ॅनाची ‘इनसाइड स्टोरी’ निर्माण करते. अ‍ॅनाच्या हालचालींचा माग ठेवून फ्रान्सच्या पोलिसांनी दहशतवाद्यांची काही कारस्थाने हाणून पाडली. ही या पुस्तकाची जमेची बाजू म्हणावी लागेल.
फक्त बिलेल या स्रोताकडूनच मेलडी ऊर्फ अ‍ॅनाला माहिती मिळत असल्याने तिच्या इनसाइड स्टोरीला मर्यादा पडली असावी. आयसिसमध्ये ८० देशांमधील सुमारे १५००० दहशतवादी सामील असल्याची आकडेवारी पुस्तकाच्या शेवटच्या पानावर देण्यात आली आहे. दहशतवाद हा नुसता आकडेवारीतून समजून घेण्याचा विषय नाही. त्याची दाहक अनुभूती आल्याशिवाय वा घेतल्याशिवाय तो ज्ञात होणार नाही. अशी अनुभूती घेण्याचा प्रयत्न एका महिला पत्रकाराने केला आणि त्याची वेधक नोंद केली. ती अर्थातच वाचनीय ठरली आहे. मूळच्या फ्रेंच पुस्तकाचा एरिन पॉटर यांनी उत्तम अनुवाद केला आहे.
अखेरीस अनेक प्रश्न अनुत्तरित ठेवून ही कहाणी स्वल्पविराम घेते.. आपली जिज्ञासा कायम ठेवून!

संजय डोंगरे
sanjay.dongare@expressindia.com

इन द स्किन ऑफ अ जिहादिस्ट –
इनसाइड इस्लामिक स्टेट्स रिक्रूटमेंट नेटवर्क्‍स
लेखिका : अ‍ॅना अर्ली
प्रकाशक : हार्पर कॉलिन्स पब्लिशर्स
पृष्ठे : २३०, किंमत : ३५० रुपये