नवजीवन ट्रस्टने प्रकाशित केलेली पुस्तके अनेकांनी वाचलेली असतील. तसे असल्यास या वाचकांना हे ठाऊक असेल, की नवजीवनकडून महात्मा गांधींच्या विचारांचा प्रसार करणारे साहित्य प्रकाशित केले जाते. महात्मा गांधींचे आत्मचरित्र असो किंवा त्यांच्या समग्र साहित्याचे खंड असोत, प्रकाशित साहित्यामार्फत गांधीविचारांचा प्रसार-प्रचार करण्याचे व्रत नवजीवन ट्रस्टने गेल्या सुमारे नऊ दशकांपासून पाळले आहे. त्याला देशभरातील गांधीवादी वर्तुळातील अभ्यासक-लेखकांपासून सामान्य वाचकांचीही साथ लाभली; परंतु आता संस्थेच्या विश्वस्तांनी नवजीवनला नवे वळण देण्याचे ठरवले आहे. बातमी त्याविषयीच आहे. आजवर केवळ गांधीविचारांचे साहित्य प्रकाशित करणाऱ्या नवजीवनने आता इतर विषयांवरील साहित्यही प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला आहे.
काजल ओझा-वैद्य या गुजराती कादंबरीकार. त्यांचे ‘ब्लू बुक्स’ हे द्विखंडात्मक पुस्तक नवजीवनने नुकतेच प्रकाशित केले आहे. गुणवंत शहा हे आणखी एक गुजराती लेखक. २००४ सालच्या इशरत जहान चकमक प्रकरणात वादग्रस्त झालेले पोलीस अधिकारी डी. जी. वंझारा यांचे समर्थन करत त्यांची महाभारतातील भीम या पात्राशी तुलना केल्याने शहा हे गेल्या वर्षी चर्चेत आले होते. त्यांच्या एका हिंदी पुस्तकाचे प्रकाशन नवजीवन करणार असल्याचे सांगितले जात आहे. याशिवाय विनोदी लेखक विनोद भट्ट, गझलकार मरीझ यांचेही साहित्य नवजीवनकडून प्रकाशित होणार आहे. हे असे विविध स्वरूपाचे लेखन प्रकाशित करण्याचा निर्णय घेतल्याने नवजीवनच्या पारंपरिक वाचकांच्या मात्र भुवया उंचावल्या आहेत.
१९२९ साली अहमदाबाद येथे खुद्द म. गांधी यांनी स्थापन केलेल्या नवजीवन ट्रस्टने आजवर गांधीविचारांवरील सुमारे ८०० पुस्तकांचे प्रकाशन केले आहे. गुजराती, हिंदी, इंग्रजी व इतर काही भारतीय भाषांमधून ही पुस्तके प्रकाशित करून माफक किमतीत वाचकांना उपलब्ध करून दिली जातात. असे असताना गांधीविचारविरोधी शक्तींचा प्रचारधडाका सुरू असण्याच्या सध्याच्या वातावरणात नवजीवनचा प्रकाशन अवकाश इतर विषयांवरील पुस्तकांनी व्यापणे, हे अनेकांना खटकणारेच आहे. त्यामुळेच नवजीवनचे हे नवे वळण चर्चेत आले आहे.