दिल्लीच्या ‘प्रगती मैदान’ या व्यापारमेळा-संकुलात सात जानेवारीच्या शनिवारपासून पुढल्या आठवडाभरात एखादा पुस्तकप्रेमी गेला, तर किती पाहू आणि किती नको असं होऊन जाईल आणि दिवसभर फिरता-फिरता पाय दुखू लागतील! दक्षिण आशियातला सर्वात मोठा मानला जाणारा ‘नवी दिल्ली आंतरराष्ट्रीय ग्रंथ मेळा’ यंदा ७ ते १५ जानेवारी या काळात सुरू राहणार आहे. इथल्या तब्बल दहा मोठमोठय़ा दालनांमध्ये मांडलेले पुस्तकांचे- म्हणजे प्रकाशनगृहांचे- स्टॉल किमान दोन हजार. प्रकाशक किमान आठशे ते नऊशे. धार्मिक पुस्तकं, लहान मुलांची पुस्तकं, शालेय- महाविद्यालयीन पाठय़पुस्तकं, कलाविषयक, पाककृतींना वाहिलेली अशी पुस्तकं.. यांतून वाट काढत कथा-कादंबऱ्या आणि ललितेतर गद्य या आपल्याला माहीत असलेल्या प्रकारांमधली लाखो पुस्तकं इथं नेहमीच असतात. १९७२ मध्ये हा मेळा सुरू झाला आणि दर वर्षांआड दिल्लीत भरू लागला. मग ‘यूपीए-२’ सरकारच्या काळात, तेव्हाचे मनुष्यबळ विकासमंत्री कपिल सिब्बल यांनी २०१२ पर्यंत ‘द्वैवार्षिक’ असलेला हा मेळा यापुढे ‘वार्षिक’ असेल, अशी घोषणा केली आणि २०१३ पासून तो दरवर्षीच भरू लागला. दरवर्षी एवढे प्रकाशक कसे काय येणार अशी जी काही चिंता व्यक्त झाली होती; ती गेल्या पाच वर्षांत (गेल्या वर्षीचा अपवाद वगळता) खोटी ठरत गेली.
ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस, पेंग्विन-रँडम हाउस, सेज, केम्ब्रिज युनिव्हर्सिटी प्रेस, ओरिएंट लाँगमन, फेबर, रूपा पब्लिकेशन्स, वेस्टलँड.. असे एरवीही आपल्यापर्यंत पोहोचणारे प्रकाशक तर इथं आठदहा स्टॉलगाळे एकत्र जोडून आपलं ग्रंथप्रस्थ मांडत असतातच, पण सहसा महाराष्ट्रातल्या शहरांत ज्यांची पुस्तकं मिळत नाहीत, अशा ‘मनोहर’, ‘ग्यान बुक्स’, ‘विवा बुक्स’ आदी प्रकाशकांचेही स्टॉल मोठे असतात. मराठी प्रकाशकांचा एक गाळा इथं असतोच, पण मराठीखेरीज इंग्रजीतही पुस्तकं काढणारे पॉप्युलर प्रकाशन, ज्योत्स्ना प्रकाशन यांचेही स्टॉल असतात. लहान मुलांसाठीच्या पुस्तक-दालनात मध्य प्रदेशच्या ‘एकलव्य’चा स्टॉल एकदा तरी भेट द्यावी, असा असतो.. ग्रामीण मुलांसाठी त्यांच्या भाषेत आणि त्यांच्या भावविश्वाशी सुसंगत अशी पुस्तकं तसंच शैक्षणिक खेळणी यांसाठी ‘एकलव्य’ प्रसिद्ध आहे. सरकारी प्रकाशनांची लयलूटही इथं असतेच. ‘नॅशनल बुक ट्रस्ट’ हे या मेळय़ाचे आयोजक असल्यानं त्यांचा स्टॉलही मोठा असतो.
अनोळखी पुस्तकांची ओळख करून घेण्यासाठी कुणाही ग्रंथप्रेमीनं जरूर जावं, असा हा आठ दिवसांचा सोहळा प्रकाशकांसाठी निराळय़ा अर्थानं महत्त्वाचा असतो. अनेक मराठी प्रकाशक, इंग्रजी पुस्तकांच्या अनुवादांचे हक्क इथं याच मेळय़ात मिळवतात. मेळय़ाच्या केंद्रस्थानी एक विषय व त्यावरलं प्रदर्शनही असतं, तो विषय यंदा ‘महिलांची पुस्तकं’ असा आहे. मनुष्यबळ विकासमंत्री उद्घाटनालाच येतात, हा पायंडा यंदा बदलणार असून त्याऐवजी या प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यासाठी या खात्याचे मंत्री प्रकाश जावडेकर हे १० तारखेला येणार आहेत. पण अर्थात, ही माहिती काही पुस्तकप्रेमींसाठी महत्त्वाची नाही..
पुस्तकं पाहाता पाहाता पाय दुखतील.. (पण मन भरणार नाही).. हेच महत्त्वाचं!