नव्या वर्षांतही पुस्तकं तर येतच राहतील, पण  ग्रंथ-व्यापार मेळे, ‘लिटफेस्ट’ यांनी २०१७ चा पहिलाच महिना गजबजणार आहे..  दिल्लीच्या प्रगती मैदानावरती किमान सहा-सात प्रशस्त दालनं अडवणारा ‘नवी दिल्ली वर्ल्ड बुक फेअर’ येत्या सात जानेवारीपासून १५ जानेवारीपर्यंत असेल. लागोपाठ जयपूरच्या ‘डिग्गी पॅलेस’मध्ये १९ ते २३ जानेवारी असा ‘जयपूर लिटफेस्ट’ पार पडेल. ‘लिटफेस्ट’ची कल्पना भारताच्या अनेक शहरांत रुजवणाऱ्या जयपूरच्या या उपक्रमाचं यंदा दहावं वर्ष आहे. कोलकात्याचा ‘बोईमेला’ – (बोई म्हणजे पुस्तक) आता पूर्वीसारखा राहिला नाही असं कितीही जरी म्हटलं, तरी यंदा ‘मिलन फेअर ग्राउंड’मध्ये २५ जानेवारी ते पाच फेब्रुवारीपर्यंत होणारा हा कोलकाता पुस्तकमेळादेखील प्रचंड मोठाच असेल. या सर्वच ठिकाणी पुस्तक-प्रकाशकांचे व्यवहारही मोठय़ा प्रमाणावर होतात. त्यातून पुढल्या काही महिन्यांतली पुस्तकं कोणती असणार, हेही ठरत असतं. दिल्ली आणि कोलकात्याच्या पुस्तकमेळ्यांमध्ये ‘राष्ट्रीय पुस्तक न्यासा’तर्फे प्रकाशकांसाठी निराळं ‘राइट्स टेबल’ आयोजित केलं जातं, तर आता जयपुरात ‘जयपूर बुक-मार्क’ या उपक्रमातून नवलेखक आणि प्रकाशक यांची थेट भेट घडवली जाणार आहे.

नव्या वर्षांत ‘वादग्रस्त’ ठरणारी, किंवा खरोखरच साहित्यगुण असणारी पुस्तकं कोणती असतील, याच्या अटकळी आताच बांधता येणं कठीण आहे. राजकीय आत्मकथनवजा जी पुस्तकं ऐन पदार्पणाच्या वेळीच वाद आणि पाठोपाठ प्रसिद्धी मिळवणारी ठरतात, ती काही सांगून येत नसतात. काँग्रेसचे नेते आणि माजी केंद्रीय वन-पर्यावरणमंत्री जयराम रमेश यांची पुस्तकं तुलनेनं अभ्यासू म्हणावीत अशी असतात, त्यांचं इंदिरा गांधींच्या कारकीर्दीत सरकारी धोरणांतून पर्यावरण-रक्षण कसं होत गेलं, याबद्दलचं पुस्तक २०१७ मध्ये येत आहे.. ते मात्र कदाचित वादग्रस्त ठरू शकेल! पण, इंदिरा गांधी यांच्या काळात पर्यावरणाचा ऱ्हासच कसा सुरू झाला, याचा शोध काँग्रेसविरोधकांनी घेतला आणि तशी वक्तव्यं केली, तरच.

महिलाविषयक पुस्तकं काढणारं ‘जुबान बुक्स’, डाव्या विचारांचं ‘लेफ्टवर्ड’, दलित-बहुजन केंद्री ‘नवायन’ या जगाचं लक्ष वेधणाऱ्या- पण तुलनेनं छोटय़ा- भारतीय प्रकाशनगृहांनी आपली नव्या वर्षांतली यादी जाहीर केलेली नाही. ‘तूलिका बुक्स’ हीदेखील याच तिघांची मोठी बहीण शोभेल अशी कला आणि समाजशास्त्र विषयक प्रकाशनसंस्था. तिची पुस्तकं २०१७ मध्ये अमेरिकेतल्या ‘कोलंबिया युनिव्हर्सिटी प्रेस’मार्फतही निघणार आहे (जगभरात वितरणासाठी) म्हणून कोलंबिया विद्यापीठानं आगामी तीन ‘तूलिका’ पुस्तकांची माहिती दिली आहे. एरवी, नव्या वर्षांतल्या आगामी पुस्तकांचा गवगवा करणारे नेहमीचेच बडे आणि यशस्वी प्रकाशक! पेंग्विन-रँडम हाऊस, सायमन अ‍ॅण्ड शूस्टर, पॅन मॅकमिलन या तर बहुराष्ट्रीय कंपन्याच. त्यांपैकी पॅन मॅकमिलनतर्फे येत्या फेब्रुवारीत प्रकाशित-वितरित होणारं, अमेरिकन-भारतीय लेखिका शीलाह कोल्हटकर यांचं ‘ब्लॅक एज्’ हे पुस्तक भारतातही येऊ शकेल. ‘वॉल स्ट्रीट’चा बडा वित्त-भांडवलदार स्टीव्हन कोहेन याच्याविषयी माहिती खोदून काढणारं ते पुस्तक आहे. पेंग्विननं रहस्यकथाकार जेम्स पॅटरसन आणि भारतीय लेखक अश्विन सांघी यांची जोडी जमवून गेल्याच वर्षी ‘प्रायव्हेट इंडिया’ ही डिटेक्टिव्ह-कादंबरी काढली होती, तर यंदा पॅटरसन-सांघी यांचंच ‘प्रायव्हेट दिल्ली’ हे पुस्तक येतं आहे. ते भारतातही गाजवलं जाईल. सुदीप नगरकर हे. सरत्या वर्षांतल्या  ‘ऑल राइट्स रिझव्‍‌र्हड फॉर यू’नंतर २०१७ सालातही पेंग्विनचेच लेखक असतील. राणा अयूब, स्वाती चतुर्वेदी  या पत्रकारांची पुस्तक सरत्या वर्षांत गाजली, तर येत्या वर्षी, पत्रकार प्रियंका दुबे यांनी लिहिलेलं ‘नो नेशन फॉर विमेन : ग्राउंड रिपोर्ताज ऑन रेप फ्रॉम द वर्ल्ड्स लार्जेस्ट डेमोक्रसी’ हे पुस्तक येतं आहे!

याखेरीज अर्थातच, कैक पुस्तकं येतीलच.. तेव्हा, वाचत राहा!

डॅन ब्राऊनचे ओरिजिन

संकेतचिन्हे, प्राचीन वास्तुशिल्पे, कला, धार्मिक रूढी यांची सांगड घालून चार ‘बेस्टसेलर’ थरार कादंबऱ्या रचणारा अमेरिकन लेखक डॅन ब्राऊन हा नवीन वर्षांत अशाच प्रकारची नवीन कादंबरी घेऊन येणार आहे. ब्राऊनची ‘ओरिजिन’ ही कादंबरी सप्टेंबर महिन्यात पुस्तक तसेच ईबुक रूपात साहित्यविश्वात दाखल होईल. ‘दा विंची कोड’, ‘एंजिल्स अ‍ॅण्ड डेमन्स’, ‘द लॉस्ट सिम्बॉल’ आणि ‘इन्फनरे’ या कादंबऱ्यांतून डॅन ब्राऊनने वाचकांना खिळवून ठेवणारी कथा गुंफली. या सर्व कादंबऱ्यांचा नायक असलेला चिन्हतज्ज्ञ रॉबर्ट लँगडन हाच ‘ओरिजिन’मध्ये नायकाच्या रूपात वाचायला मिळेल. त्यामुळे ब्राऊनची ही कादंबरीदेखील प्राचीन वास्तू, पुस्तके, चिन्हे यांतील कथित/कल्पित रहस्यांचा वेध घेईल, अशी शक्यता आहे. ही कादंबरी अमेरिकेत ‘डबल्सडे’कडून तर ब्रिटनमध्ये ‘पेंग्विन रँडम हाऊस’च्या ‘ट्रान्सवर्ल्ड पब्लिशर्स’कडून प्रकाशित होणार आहे.

आजच्या क्रोधयुगाची बखर!

‘पेंग्विन’ आणि रॅण्डम हाउस समूहातर्फे पंकज मिश्रा यांचं ‘द एज ऑफ अँगर : अ हिस्टरी ऑफ द प्रेझेंट’ हे जानेवारीत प्रकाशित होणारं पुस्तक सध्या चर्चेत आहे. घडत्या काळाचा ‘इतिहास’ लिहून त्याला ‘क्रोधयुग’ म्हणणारे पंकज मिश्रा हे अनेक गाजलेल्या पुस्तकांचे लेखक. भारताच्या वाढत्या शहरांबद्दलचा ‘बटर चिकन इन लुधियाना’ (१९९५) हा लेखसंग्रह असो की, परक्या संस्कृतीत ‘निर्वाण’ शोधणाऱ्यांबद्दलची ‘रोमॅन्टिक्स’ (२०००) ही कादंबरी; २००४ सालचं ‘बुद्धा इन द वर्ल्ड’ असो की २००७ मधलं ‘टेम्प्टेशन्स ऑफ द वेस्ट : हाउ टु बी मॉडर्न इन इंडिया, पाकिस्तान, तिबेट अ‍ॅण्ड बियॉण्ड’ किंवा ‘द ग्रेट क्लॅमर : एन्काउंटर्स विथ चायना अ‍ॅण्ड इट्स नेबर्स’ आणि २०१३ सालचं ‘फ्रॉम द रुइन्स ऑफ एम्पायर : रिव्होल्ट अगेन्स्ट द वेस्ट अ‍ॅण्ड द रीमेकिंग ऑफ एशिया’ अशी पुस्तकं लिहिणारे पंकज मिश्रा हे विद्यमान संस्कृतीची दुखणीखुपणी ओळखणारे लेखक आहेत, हे अनेकदा सिद्ध झालं आहे. प्रशस्तिपत्र आणि दीड लाख अमेरिकी डॉलर रोख या स्वरूपाचं ‘येल युनिव्हर्सिटी प्राइझ’ त्यांना मिळाल्यामुळे त्यावर शिक्कामोर्तबही झालं आहे. आता यापुढलं ‘द एज ऑफ अँगर’ हे प्रामुख्यानं अमेरिकेच्या वास्तव्यातल्या अनुभवांवर आधारित आहे.. ट्रम्प यांचा उदयकाळ हाच सीरिया-लिबियातल्या दहशतवाद्यांची ‘आयसिस’ वाढते आहे आणि आपण काहीही करू शकत नाही याची जाणीव अमेरिकनांना होण्याचा काळ होता. त्या क्रुद्धकाळाबद्दलची ही टिपणं आहेत.

कधी येणार? : २६ जानेवारी २०१६