अभिनेत्री रेखा हिच्या या चरित्रशोधालाही, तिच्या नकारामुळे ‘दुसरेपणा’ येतो..
‘रेखाजींच्या आयुष्याचं खरंखुरं चित्र रेखाटणारं पुस्तक लिहितोय मी. त्याचसाठी त्यांची एक मुलाखत हवीये, असे मी रेखाजींची सचिव फरझाना यांना फोनवर सांगितलं. त्यांनी माझं म्हणणं शांतपणे ऐकून घेतलं. मी तुम्हाला नंतर फोन करते, असं त्या मला म्हणाल्या. पण त्यांचा फोन कधीच आला नाही.. ’
‘रेखा- द अनटोल्ड स्टोरी’चे लेखक यासिर उस्मान यांनी या पुस्तकाच्या प्रारंभी लेखकाचे चार शब्द या मजकुरात वरील उल्लेख केला आहे. उस्मान यांना रेखाला भेटण्याची संधी मिळाली असती तर हे पुस्तक आत्ता जसे आहे तसेच झाले असते की त्यात काही बदल झाले असते, हे समजायला मार्ग नाही. त्याविषयी मनातल्या मनात अटकळी बांधताना आत्ता जे पुस्तक समोर आहे त्याचा धांडोळा घेणे क्रमप्राप्त ठरते.
‘रेखा द अनटोल्ड स्टोरी’चे लेखक यासिर उस्मान हे दूरचित्रवाणी निर्माते-पत्रकार. तशी ओळख त्यांनी स्वत:च पुस्तकाच्या प्रारंभी करून दिली आहे. तर, या दूरचित्रवाणी निर्माता-पत्रकार अशा भूमिकेतून, नजरेतून त्यांनी रेखाकडे कसे पाहिले हे सांगणे म्हणजे हे पुस्तक.
पुस्तकाच्या मुखपृष्ठावर रेखाचे जे छायाचित्र आहे, त्याशेजारचे शब्द पुढीलप्रमाणे..
‘शी वॉज सेक्सी अॅण्ड बोल्ड. अॅण्ड अॅन अनसेटल्ड बॉलीवूड ट्राइड टू टेम हर.. ’
या शब्दांच्या भावार्थाशी काही प्रमाणात इमान राखणारे असेच रेखाचे त्या शेजारचे छायाचित्र. तर, मलपृष्ठावरील रेखाचे छायाचित्र ‘उमराव जान’ या चित्रपटातील वेशभूषेतले. या रचनेतून रेखाच्या आयुष्याचा पट कसा बदलला याचे सूचन करण्याची पुस्तककर्त्यांची इच्छा आहे की त्यामागे अन्य काही हेतू आहे, याची कल्पना नाही.
मात्र पुस्तकाच्या मुखपृष्ठावरील रेखाच्या छायाचित्राशेजारचे इंग्रजी शब्द म्हणजे या पुस्तकाचे आणि म्हणूनच रेखाच्या वैयक्तिक आयुष्याचेही बऱ्याच प्रमाणातील सारस्वरूप आहे, एवढे नक्की म्हणता येईल.
रेखाच्या आयुष्यातील.. अगदी जन्मापासून ते आत्ताआत्तापर्यंतच्या.. महत्त्वाच्या घटनांचा पट या २३० पानी पुस्तकातून उलगडला जातो. त्याचसोबत समोर येतो तो भानुरेखा गणेशन ते रेखा असा असंख्य वाटावळणांचा, आडवळणांचा प्रवास. रेखाची आई पुष्पवल्ली. १९४०-५०च्या दशकातील तामिळ चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री. रामस्वामी गणेशन म्हणजेच जेमिनी गणेशन हे त्याच काळातले अभिनेते. दाक्षिणात्य प्रेक्षकांच्या चालीरीतींची अमाप लोकप्रियता त्यांच्या वाटय़ाला आलेली. जेमिनी गणेशन व पुष्पवल्ली यांची मुलगी भानुरेखा.. म्हणजेच रेखा. मात्र, कायदेशीरदृष्टय़ा जेमिनी गणेशन व पुष्पवल्ली हे पती-पत्नी नव्हते. जेमिनींच्या आयुष्यात पुष्पवल्ली यांचे स्थान दुसरेपणाचे होते. जन्माचे अनौरसपण आणि आईप्रमाणेच वाटय़ास आलेले दुसरेपण या गोष्टी रेखाला जन्मास पुरून उरल्या, त्या कशा ते हे पुस्तक सांगते.
वयाच्या १४व्या वर्षी, हिंदी भाषेचा गंध नसताना मुंबईच्या हिंदी चित्रपटसृष्टीत नाइलाजाने टाकावे लागलेले पाऊल, वर्ण आणि भाषेवरून दीर्घ काळ झालेली अवहेलना, बिनधास्त-मात्र भोवतालाची बारकाईने जाण नसलेल्या आणि विपरीत परिस्थितीने जखडलेल्या या मुलीचा चित्रपटसृष्टीने बुऱ्या रीतीने करून घेतलेला वापर याबाबतचा पुस्तकातील भाग झगमगत्या चित्रपटसृष्टीची काळी बाजू दर्शवितो.
पुस्तकाचा मोठा भाग व्यापला आहे, तो रेखाच्या आयुष्यात आलेल्या पुरुषांबाबतच्या कहाण्यांनी. उद्योगपती मुकेश अग्रवाल याच्याशी झालेला विवाह, काही काळातच आपण एकमेकांना अनुरूप नसल्याची दोघांना झालेली जाणीव, लग्नानंतर सातच महिन्यांत मुकेश अग्रवालने केलेली आत्महत्या, अभिनेता विनोद मेहराशी झालेला ‘कथित’ विवाह (‘कथित’ यासाठी की नंतर काही काळाने खुद्द रेखानेच, विनोद मेहराशी माझा विवाह झाला नव्हता, असे सांगितले होते), त्यातील अपयश या सगळ्याचे वर्णन पुस्तकातून येते. त्याशिवाय, जितेंद्र, किरणकुमार.. अगदी अक्षयकुमार अशा अनेकांसोबत रेखाचे नाव जोडले गेले, त्याचे किस्से पुस्तकात आहेत. आणि अर्थातच या सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे तो रेखा-अमिताभ यांच्यातील संबंधांचा. या संबंधांबाबत अमिताभने अगदी क्वचितच काही भाष्य केले, तर, रेखाने त्या संबंधांचा आब राखत त्यांची कधी थेट, तर कधी आडवळणाने कबुली दिली. या अनुषंगाने दोघांच्या आयुष्यात आलेली वादळे, वादंग याच्यावरील बराच मजकूर पुस्तकात आहे. रेखाच्या बिनधास्त व मनस्वी व्यक्तित्वाचा वेध पुस्तक घेते. याच संदर्भाने रेखाच्या मनात असलेली दुसरेपणाची दुखरी भावना समोर येते. तिने बाह्य़करणी ही भावना लपवलेली असली तरी ती अधोरेखित होतेच. कालपरत्वे, संगतीच्या व्यक्तिपरत्वे रेखाच्या व्यक्तिमत्त्वात, तिच्या अभिनयात होत गेलेला बदल, वाढत गेलेली समज याचा आलेखही हे पुस्तक मांडते. हा भाग विशेष वाचनीय.
पुस्तकाच्या लिखाणाची शैली नि:संशय चटपटीत, स्मार्ट आहे. घटनांच्या नांदी नाटय़मय रीतीने करण्यात आलेल्या आहेत. प्रकरणांचे विराम पुढील प्रकरणाबाबतची उत्कंठा वाढवतील, अशा पद्धतीने करण्यात आले आहेत. त्या आधारे रेखा या व्यक्तीचे आणि अभिनेत्रीचे आयुष्य डोळ्यांसमोर उभे करण्यात हे पुस्तक यशस्वी होते. मात्र, रेखाने जर या पुस्तकाचे लेखक यासिर उस्मान यांना एखादी मुलाखत दिली असती, त्यांच्याशी चर्चा केली असती तर पुस्तकाचे मूल्य व खोली अधिक वाढली असती, असे राहून राहून वाटते. त्यातील प्रमुख मुद्दा वादग्रस्त विषयांचा. अनेक पुरुषांशी रेखाचे जोडले गेलेले नाव हा मुद्दा नि:संशय वाचकांचे लक्ष आकर्षित करणारा आहे. या अशा विषयाबाबतचे कालही लोकांना आकर्षण होते आणि आजही आहे. पण त्याबाबत रेखाने आज काही भाष्य केले असते तर ते समजून घेणे लोकांना नक्कीच भावले असते. रेखा व तिची सचिव फरझाना यांच्यात काही संबंध आहेत, असे हे पुस्तक सुचवते, मात्र त्यासाठी लेखक आधार घेतो ते इतर कुणी तरी काही सांगतेय याचा.
वादग्रस्त विषयांना हळूच इतरांच्या नकळत स्पर्श करायचा, आणि, अमक्याने ढकलल्याने माझा स्पर्श झाला, असे म्हणायचे, अशी ही रीत झाली. असो हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक वर्षे एक दंतकथा बनून राहिलेल्या एका अभिनेत्रीचे जेवढय़ास तेवढे गंभीर, वाचनीय, रंजक पुस्तक असा या पुस्तकाचा लसावि काढता येईल.
- रेखा- द अनटोल्ड स्टोरी
- लेखक : यासीर उस्मान
- प्रकाशक : जगरनॉट, दिल्ली
- पृष्ठे: २३०, किंमत : ४९९ रु. (जगरनॉट अॅपवरील
- ईपुस्तक: १२० रु.)
राजीव काळे
rajiv.kale@expressindia.com