पुस्तक गाजवण्यासाठी त्यातल्या एखाद्याच वाक्याची मोठ्ठी बातमी करण्याचं तंत्र परवाच शिवशंकर मेनन यांच्या पुस्तकाबद्दल वापरलं गेलं. ‘मुंबईवर २००८ साली झालेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानात ‘सर्जिकल स्ट्राइक’ करण्याचा विचार तेव्हाच्या (पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या) सरकारनं केला होता’ हे ते वाक्य. त्याची बातमी वगैरे. पण म्हणून पुस्तक कसं आहे कळलं का?

नाहीच कळणार. पुस्तक २५ नोव्हेंबरखेरीज पेंग्विन-रँडम हाउसतर्फे प्रकाशित होणार नाही, असंच इंटरनेटवरली विक्रीस्थळं सांगताहेत. पण त्यापूर्वी मुळात, असल्या सनसनाटी माहित्या देणं किंवा गौप्यस्फोट करणं वगैरे या पुस्तकाचं काम नाही, हे कळण्यासाठी पुस्तकाचे मूळ प्रकाशक ‘ब्रूकिंग्ज इन्स्टिटय़ूट’ यांच्या संकेतस्थळावर जावं लागेल. तिथं या पुस्तकाची रूपरेषा भारत आणि शेजारी, तसंच भारत आणि आण्विक शांतता यांवर भर देणारी कशी आहे, हे सांगणारी अनुक्रमणिका आणि पहिलं- चीनबद्दलचं- अख्खं २७ पानी प्रकरण ‘पीडीएफ’ स्वरूपात तुम्हाला डाउनलोड करून वाचता येईल. ते वाचलंत, तर या पुस्तकाची सखोलता लक्षात येईल. हे प्रकरण महत्त्वाचंच, याची कारणं दोन : चीन हाच भारतापुढला मोठा प्रश्न आहे हे पहिलं, मेनन हे चीन आणि पूर्व-शेजाऱ्यांविषयीचे तज्ज्ञ म्हणून परराष्ट्र खात्यात (विशेषत: १९९२ पासून दिल्लीत) होते, हे दुसरं. ते दिल्लीत असतानाच, ७ सप्टेंबर १९९३ रोजी झालेला भारत-चीन शांतता-करार पुढे या दोघा देशांचे व्यापारी संबंध वाढवणारा ठरला. राजीव गांधींनी १९८८ मध्ये सुरू केलेल्या प्रक्रियेमुळे आता अगदी झोपाळ्यापर्यंत संबंधवृद्धी झाली. पण त्याआधी, मेनन जपानी दूतावासात असताना तिथं पंतप्रधान पी व्ही नरसिंह रावांसह आलेले तत्कालीन परराष्ट्र सचिव जे. एन. दीक्षित यांनी सहज विचारल्यासारखा ‘चीनशी शत्रुत्व घ्यावं काय?’ हा प्रश्न महत्त्वाचा होता. त्याचं मेनन यांनी दिलेलं उत्तरच, त्यांना दिल्लीत ‘तज्ज्ञा’ची जागा देणारं ठरलं. आज मेनन भारत-चीन संबंधांकडे १९५० पाहातात, तेव्हा ‘चीन एकटा पडतो आहे. पण त्या देशानं अनेकदा, अनेकांबाबत धक्कातंत्र वापरलं आहे. भारताचं सामथ्र्य, तसंच चीनच्या अन्य शेजाऱ्यांची वाढती क्षमता विचारात घेण्यास चीनला भाग कसं पाडावं, हा प्रश्न आजही आहे’ असा सल्लावजा निष्कर्ष काढतात. पुस्तक बाजारात येईपर्यंत हे प्रकरण तरी https://www.brookings.edu/wp-content/uploads/2016/07/chapter-one-_-choices-9780815729105.pdf  या पत्त्यावर नक्की वाचावं. त्यात १९५० पासूनची माहिती आहे, पण माहिती देण्यापेक्षाही ‘राजनैतिक विचार कसा केला जातो’ याची गुरुकिल्ली देणारं हे पुस्तक आहे, हे वाचकाच्या लक्षात असलेलं बरं. चीनचा विचार करताना ‘त्या- त्या वेळच्या जागतिक परिस्थितीचाही विचार करायचा’ म्हणजे नेमकं काय करायचं, याचा वस्तुपाठ या प्रकरणात १९९२-९३ बद्दल नक्की सापडेल. आणि  ‘१९९३ मधल्या त्या शांति-करारामुळेच भारत-चीनचा सीमातंटा कायमचा सोडवण्याच्या शक्यता दुरावताहेत, असं तर होत नाही ना?’ हा मेनन यांनीच उपस्थित केलेला महत्त्वाचा प्रश्न, ‘राष्ट्रहित’ ओळखायचं म्हणजे काय करायचं, हे लक्षात आणून देईल.  त्यासाठी फक्त, या पुस्तकाविषयीच्या ‘स्ट्राइक’खोर बातमीदारीवर न विसंबता मोफत उपलब्ध असणारं प्रकरण वाचायला हवं!