चित्रकार सैय्यद हैदर रझा गेल्या वर्षीच्या जुलैमध्ये निवर्तले. परंतु त्यांच्या हयातीतच त्यांनी रझा फाऊंडेशनची स्थापना केलेली. ही संस्था कलाविषयक उपक्रम गंभीरपणे राबवणारी म्हणून सुरुवातीपासूनच ओळखली जाते. संस्थेच्या सर्वच उपक्रमांमध्ये रझांच्या कलाविचारांचा प्रभाव जाणवतोच. संस्थेकडून प्रकाशित केली जाणारी ‘अरूप’, ‘समास’, ‘स्वरमुद्रा’ ही तीन नियतकालिके तर कलेच्या प्रांतातील आणि त्याविषयी आस्था वाटणाऱ्यांनी वाचायलाच हवीत. यातले पीडीएफ स्वरूपातील काही अंक www.therazafoundation.org या संकेतस्थळावर वाचायला मिळतील.
रझा फाऊंडेशनच्या या कलाविषयक उपक्रमांत आणखी एका महत्त्वाच्या उपक्रमाची भर या आठवडय़ात पडत आहे. बातमी त्याचीच आहे. ती म्हणजे, कालपासून (शुक्रवार, ७ एप्रिल) सुरू झालेला आणि रविवार, ९ एप्रिलपर्यंत चालू राहणारा ‘वाक् – द रझा बिएनाले ऑफ इंडियन पोएट्री’ हा भारतीय कवितेचा पहिला बिएनाले. या पहिल्या काव्य द्वैवार्षिकीचा पहिला दिवस काल पार पडला. त्यात ओरिया, आसामी, मणिपुरी, तमिळ, काश्मिरी या भाषांतील कवींनी कविता सादर केल्या, तर आज (शनिवार) काव्यवाचनाबरोबरच ‘कविता आणि स्वातंत्र्य’ व ‘कविता आणि स्मृती’ या विषयांवर परिसंवाद पार पडणार आहेत. त्यात केकी दारूवाला, अनन्या वाजपेयी, के. सत्चिदानंद, कृष्णकुमार, अपूर्वानंद आदी सहभागी होणार आहेत, तर उद्या होणाऱ्या समारोपात कवितावाचन व ‘कविता आणि जाणीव’ या विषयावर परिसंवाद होणार आहे. या तीनदिवसीय काव्यमेळ्यात १५ भाषांतील ४५ कवी सहभागी होत आहेत.
या काव्यमेळ्याला बिएनाले असे म्हटले असल्याने आता दर दोन वर्षांनी तो भरणार हे नक्की आहे. यंदाचा बिएनाले समकालीन भारतीय कवितेवर केंद्रित केला आहे, तर यापुढचा (२०१९) आशियाई कवितेवर, तर त्यानंतरचा (२०२१) काव्यमेळा जागतिक कवितेवर आधारित असणार आहे.
जाता जाता, आणखी एक बातमी- यंदाच्या या काव्यमेळ्यात सहभागी झालेल्या कवींच्या कवितांचा समावेश असणारा आणि कवी अशोक वाजपेयी व कलासमीक्षक श्रुती आयजॅक यांनी संपादित केलेला ‘वाक् ’ हा संग्रहही प्रकाशित होणार आहे.