‘स्फोटक जिलेटिन कसे तयार कराल’, ‘शॉटगनचे रूपांतर ग्रेनेड लाँचरमध्ये असे करा’, ‘घरीच बनवा अश्रुधूर नळकांडे’ अशी स्फोटकच माहिती असलेलं एक पुस्तक अमेरिकेत मिळतं. त्याची ‘पीडीएफ’ प्रत महाजालावर मोफत वाचताही येते. या पुस्तकाचं नाव : ‘द अ‍ॅनार्किस्ट कुकबुक’- अर्थात अराजकतावादी पदार्थाची मार्गदर्शिका! १६० पानांच्या या पुस्तकात पहिली २५ पानं अभ्यासू प्रस्तावना, पुढली दोन पानं खुलासावजा निवेदन आणि पुढे १११ आकृत्यांसकट चार प्रकरणं, असा ऐवज आहे; पण बातमी ही नाही.. कारण पुस्तक तर १९७१चंच आहे. त्याच्या अनेक आवृत्त्याही निघाल्या आहेत. इतकंच काय, गाजलेल्या अटलांटा बॉम्बहल्ल्यात (१९९५) हेच पुस्तक उपयोगी पडल्याचे पुरावे उपलब्ध झाले होते.. त्या पुस्तकाचे लेखक विल्यम पॉवेल हे वयाच्या ६६ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्यानं वारले, तेही ११ जुलै २०१६ रोजीच.. मग बातमी काय?

बातमी अशी की, पाऊण वर्षांपूर्वीच्या त्या निधनाची माहिती ३० मार्च २०१७ रोजी पहिल्यांदाच माध्यमांपर्यंत पोहोचली. तीही, हे पुस्तक आणि विल्यम पॉवेल यांच्याबद्दलचा ‘अमेरिकन अ‍ॅनार्किस्ट’ नामक लघुपट (तोही १ तास २० मिनिटांचा) जाहीररीत्या परवाच प्रकाशित झाल्यामुळे. त्या चित्रपटाच्या अखेरीस, पॉवेल निवर्तल्याची सविस्तर नोंद वाचता येत होती.. म्हणून ते वारल्याचं लोकांना कळलं तरी! नाही तर, कॅनडाच्या ताब्यातलं अटलांटिक बेट असलेल्या नोव्हा स्कॉटियात ते वारल्याची माहिती कुटुंबीयांनी कुणाला सांगितलीच नव्हती.

‘अराजकतावादावर विश्वास असला तरी आता हिंसेवर नाही’ असे खुलासे पॉवेल यांनी सन २००० नंतर मन:पूर्वक केले. पुस्तकावर तसे इशारे छापलेही गेले. पॉवेल यांचा अहिंसकपणा निर्विवाद मान्य झाला. तरीही मुळात, ‘हिंसा कुणालाही- अगदी कुणालाही करता येते आणि येईल..’ हे याच पुस्तकानं जगाला दाखवून दिलं. त्या ‘मारक’ भाकिताचा दुवा ‘अनसेरिमोनियसली’ म्हणतात तसा- अवमानग्रस्तरीत्याच- निखळला.